कलात्मक वीरगळ

By Discover Maharashtra Views: 1266 3 Min Read

कलात्मक वीरगळ –

एखाद्या विराच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्याच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान म्हणून वीरगळ उभारण्याची प्रथा सुरू झाली. तत्कालीन स्थापत्य कला तसेच, विराचे शौर्य, त्याचे समाजातील किंवा लष्करीतल पद, आणि लढाईचे महत्व या सर्वांचा परिणाम हा तयार होणाऱ्या विरगळीवर पडत असतो.  आज आपण पाहणार आहोत ती अशीच एक कलात्मक दृष्ट्या अतिशय सुंदर अशी वीरगळ आहे.

सदर वीरगळ तीन भागात विभागली आहे. सर्वात खालच्या भागात आपल्याला युद्ध प्रसंग पहायला मिळतो. शत्रूने खंजीराने केलेला हल्ला विराने आपल्या डाव्या हाताने रोखून धरलेला आहे, तर विराच्या उजव्या हातात खंजीर असून तो शत्रूवर वार करण्याच्या तयारीत दिसत आहे.. या दोघांशिवाय अजून एक सैनिक खाली पडलेला दाखवला आहे.  विराच्या दंडावर अंगद, तर मनगटावर कंकण(कडा), कानात कर्णकुंडल सदृश्य अलंकार दिसतात, कमरेला गुडघ्यापर्यंत येणारे कटीवस्त्र असून त्यावर मेखला आहे. कटीवस्त्राचा घोळ/सोगा विराच्या दोन पायांच्या मध्ये दिसतो. विराच्या मागे एक ध्वज असून त्यावर गरुडसदृश्य पक्षी दाखवलेला आहे.

मधल्या भागात दोन अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन जात असल्याचा म्हणजेच स्वर्गारोहणाचा प्रसंग आहे. या दोन्ही अप्सरांच्या हातात चवरी दाखवलेली असून यांना चवरीधारी अप्सरा असेही म्हणता येईल. विराचे शस्त्र म्हणजेच त्याचा खंजीर त्याच्या कमरेला दिसतो, अप्सरा आणि वीर यांच्या गळ्यात माळ सुद्धा बघायला मिळते. दुसऱ्या भागाच्या वर महिरपी आकाराचे तोरण आणि त्यावर नक्षीकाम केलेले आहे.

सर्वात वरच्या भागात वीर नमस्कार मुद्रेत शिवलिंगाच्या समोर बसलेला आहे. तर समोरच्या बाजूला पुजारी स्थानक मुद्रेत म्हणजेच उभा असलेला पाहायला मिळते, पुजाऱ्यांच्या एक हातात घंटी असून दुसरा हात शिवलिंगाच्या दिशेने, शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी किंवा फुले वाहण्यासाठी उंचावलेला आहे.

शिवलिंग तसेच त्या वरच्या भागात सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. विरगळीच्या सर्वात वरच्या भागात  कलशासारखी आकृती कोरलेली आहे. कलश हा मोक्षप्राप्तीचे प्रतीक असल्याने वीराला मोक्ष मिळाला असल्याचे यातून निदर्शीत होते.

विराच्या पाठीमागे आपल्याला गरुडाचे चिन्ह असलेला ध्वज दिसत आहे. सुवर्ण गरुड हे शिलाहार राजांचे चिन्ह अस अंदाज लावला तर ही वीरगळ शिलाहार कालीन म्हणजेच इसवीच्या नववे शतक ते तेरावे शतक या कालखंडातील असावी.

सोबतच राजचिन्ह असलेला ध्वज, विराच्या अंगावर असलेली ऐश्वर्यसूचक अलंकार, विरगळीवर केलेली कलाकुसर हे सगळं पाहता ही वीरगळ राजघराण्यातील कोण्या व्यक्तीची असावी असाही एक तर्क मांडता येतो.

पण शिलालेख किंवा इतर प्राथमिक साधनांच्या अभावामुळे हा फक्त तर्कच राहून जातो. कदाचित म्हणूनच विरगळींना इतिहासाचे मूक साक्षीदार म्हटले जात असावे..

© श्रद्धा घनश्याम हांडे

Pc – Abhijeet Shinde

Leave a comment