महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,48,359

आरमार | शिवरायांची बलस्थाने भाग ६

By Discover Maharashtra Views: 2885 11 Min Read

आरमार | शिवरायांची बलस्थाने भाग ६ –

“आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे… तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र… याकरीता आरमार अवश्यमेव करावे.” अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे ‘बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते.’

मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडीत झालेली परंपरा सुरु केली ती शिवरायांनी. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरीत ओळखला होता. एका पत्रात ते म्हणतात,”सावकारांमध्ये फिरंगी (पोर्तुगीझ), इंग्रज, फरांसीस (फ्रेंच), डिंगमारांदी (डच?) टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतात्से हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाहीं यैसें काय घडो पाहाते?” हिच दूरदृष्टी इतर सत्तांनी दाखवली असती तर इतिहास आज वेगळा असता.. खुद्द मराठ्यांच्या उत्तराधिकाऱ्यान्ना हे कितपत उमगले माहीत नाही. नाहीतर त्यांनीच मराठ्यांचे आरमार उध्वस्त केले नसते.

कोकणात शिरून स्थावर व्हायची संधी राजे शोधत होते. ती संधी त्यांना १६५६ च्या जानेवारीमध्ये मिळाली. औरंगजेब बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. तिकडे विजापुरला अली आदिलशाह मरण पावला होता. योग्य संधीचे सोने करत राजांनी जावळी मारली. मोरेचा पाठलाग करत थेट कोकणात उतरून रायरी काबीज केली. राजांसाठी कोकणद्वार खुले झाले. उत्तरकोकणचा आदिलशाही भूभाग विजापुरपासून जावळीमुळे विभागला गेला. आता राजे १६५७ मध्ये उत्तर कोकणात उतरले आणि त्यांनी कल्याण, भिवंडी आणि माहुली परिसर जिंकून घेतला. याशिवाय सुधागड़, सरसगड़, तळागड़, सुरगड़ हे किल्ले सुद्धा मराठ्यान्नी सहज जिंकून घेतले. या भागाची जमीनीकड्ची बाजू आधीपासूनच मराठ्यांच्या ताब्यात होती.

आता गरज होती ती तिची पश्चिम म्हणजे सागरीबाजू संभाळण्याची. सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्याच्या इतकेच बलवान आरमार हवे हे ओळखायला राजांना वेळ लागला नाही. तशी तयारी १६५७ पासून दुर्गाड़ी येथे सुरू झाली. विविध प्रकारच्या युद्धनौका बांधायला निष्णात तंत्रज्ञ आणि तसेच कुशल कारागीर लागणार म्हणून राजांनी पोर्तुगीझांकडे मदत मागितली. ते आधी तयार झाले मात्र नंतर हेच आरमार आपल्या अंगावर शेकेल ह्या भीतीने त्यांनी मदत करायला नकार दिला. पण म्हणून राजे थोडीच स्वस्थ बसणार होते. त्यांनी जहाज बांधणीचा उद्योग सुरूच ठेवला. राज्याचे एक नवे अंग सजू लागले.

१६५९ पासून आरमाराचे काम अजून जोरात सुरु झाले. कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले. मराठ्यांना सिद्दीला पाण्यात मात देणे सोपे नव्हते कारण त्याच्यापाशी प्रबळ आरमार होते शिवाय तो म्हणेल तेंव्हा मुघल किंवा विजापूर त्याला मदत करील असत. अगदीच जीवावर आले तर तो मुंबईला माझगाव येथे इंग्रजांच्या आश्रयाला जाई. विशेष करून पावसाळ्यात त्याचे संपूर्ण आरमार मुंबई येथे सुरक्षितरित्या नांगरलेले असे.

१६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग, रत्नदुर्ग आणि सर्वात मात्तबर असा ‘शिवलंका सिंधुदुर्ग’ असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. (सिंधू नदी जिथे सागराला मिळते त्याला ‘सिंधू सागर’ असे नाव होते. म्हणून राजांनी ह्या जलदुर्गाला ‘सिंधुदुर्ग’ असे नाव ठेविले. आज मात्र त्याचे नाव अरबी समुद्र असे झालेले आहे.) कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते.

आधी कोकणच्या किनारपट्टीवर फेऱ्या मारणारे हे आरमार १६६५ मध्ये मालवण बंदरातून निघून बसनूर (सध्या कर्नाटक) येथे पोचले. पोर्तुगीझांशी झालेल्या तहामुळे आरमार गोव्याहून जाताना त्यांनी काहीच आडकाठी केली नाही. ही मोहीम भलतीच यशस्वी झाली. आदिलशहाची प्रचंड लुट मराठ्यांनी मारलीच त्याशिवाय आरमाराचा दबदबा सर्वत्र बसवण्यात त्यांना यश आले होते. खुद्द शिवरायांनी या सागरी मोहिमेचे नेतृत्व केले होते. १६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. नाही म्हणायला जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे – वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच.

१६६६ नंतर राजे मोठ्या प्रमाणात मुघलांशी लढण्यात व्यस्त होते. त्यांनी सिद्दीला जंजिरापुरते सीमित केले होते. सिद्दी मात्र कधी इंग्रज तर कधी पोर्तुगीझ यांची मदत घेऊन मराठ्यांना हानी पोचवायच्या मागे होता. त्याला सर्वात जास्त मदत करण्यात इंग्रजांना आनंद होत असे. अखेर राजांनी जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईमधले इंग्रज यांच्या बरोबरमध्ये असणाऱ्या खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरु केले. खुद्द शिवराय या बेटाची पाहणी करण्याकरता २००० फौज घेऊन इकडे आले होते. अर्थात सिद्दी आणि इंग्रज असे दोघांचेही धाबे दणाणले आणि त्यांनी ह्याला विरोध करत खांदेरीवर हल्ला चढवला. अर्थात तो परतवला गेला आणि मराठ्यांनी किल्ला बांधून पुर्ण केला. खांदेरीची संपूर्ण कहाणीच मोठी रोमांचकारी आहे. कुलाबा किल्ला बांधण्याचा आदेश तर शिवाजी महाराजांनी मृत्युच्या अवघे १२ दिवस आधी दिलेला आहे. हे दोन्ही किल्ले पुढे मराठा आरमाराच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले. कुलाबा उर्फ अलिबाग किला तर आंग्रे काळात राजधानी बनला.

मराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा ‘वाऱ्यावीण प्रयोजन नाही’ अश्या ‘फरगात’ (फ्रीगेट्स) न बनवता ‘गुराबे’ आणि ‘गलबते’ बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. ह्यासोबत तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल असे नौकांचे प्रकार आज्ञापत्रात आढळतात.

गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.

गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.

मराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून आता खुल्या समुद्रात संचार करू लागली होती. गनीम समोर आल्यावर काय करावे कसे वागावे ह्याबाबत स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते. भर समुद्रात गनीम समोर आला तर एकत्र येऊन कस्त करून त्याच्याशी झुंजायचे, मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास गानिमाशी गाठ न घालिता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात,”तरांडीयास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनीम घ्यावा.”

बरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो तेंव्हा लगेचच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये, किंवा गनिमाला सुद्धा जवळ बोलावू नये, असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे असे स्पष्ट आदेश सरखेलांना होते.

वर्षाचे ८ महिने आरमार खुल्या समुद्रात असले तरी पावसाळ्याचे ४ महिने मात्र ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित करून ठेवावे लागे. याबाबत आज्ञापत्र सांगते की, समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधीच आरमाराची छावणी योग्य ठिकाणी करणे आवश्यक असते. खुल्या उथळ समुद्रात किंवा कुठल्याही जलदुर्गाच्या खाली ते उघड्यावर नांगरून ठेवता येत नाही. छावणी सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्याकिल्ल्यांच्या सानिध्यात बंदरात करावी म्हणजे दरवर्षी त्याच बंदराच्या आसपासच्या गावांना तोशीस पडत नाही. जिथे गनीम सहज सहजी पोचू शकत नाही अश्या ठिकाणी छावणी असावी असे आज्ञापत्र सांगते. आरमाराच्या सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद होती की खाडी किनारी दिवस-रात्र गस्त घालून आरमार सुरक्षित राहील याची चाकरी करावी. खुद्द त्या भागाच्या सुभेदारांना २ महिन्याकरता संपूर्ण कुटुंब-कबिला घेऊन आरमाराची व्यवस्था बघण्याकरता आसपास जाऊन राहावे लागे इतके चोख आणि कडक नियम या बाबतीत राजांनी बनवले होते.

जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते.

मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

शून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता टोपीकरांना आणि सिद्दीला आव्हान देण्यास सज्ज झाले होते.

संदर्भ :

सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय – पत्ररूप व्यक्तीदर्शन – डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर)

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment