मराठा आरमार दिन

मराठा आरमार दिन

मराठा आरमार दिन…

भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.(मराठा आरमार दिन)

मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले. एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली. आणि… आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत. समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत. मोगलांची हि स्थिती तर आपली काय ? त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती. मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.

शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो-

” देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी

बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी

जहाजे आरमार भर जलधि दुष्टांसी शिक्षा करी

बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी ”

हा झाला आपला इतिहास, मात्र आपण तो कदापी विसरता कामा नये.

शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये जावळी काबीज केली. जावळीमध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला. ४ नोव्हेंबर १६५६ पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या. ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ या कालावधीत शिवरायांनी १०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला. मिळविलेल्या या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते. त्यासाठी योग्य अशी जागा / तळ असणे गरजेचे होते.  ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत. लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी हि जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते.

आणि अखेर तो दिवस उजाडला….. दि. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन कल्याण, भिवंडी काबीज केली. आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली, म्हणून ‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’ किंवा ‘भारतीय आरमार दिन’ म्हणून आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करूयात …….

स्वतंत्र्य आणि सार्वभौम आरमारनिर्मिती हा हिंदवी स्वराज्याचा ठळक विशेष होय.तीन बाजूंनी सागराने वेढलेल्या हिंदुस्थानचे संरक्षण करण्यासाठी आरमार(नौदल) हे अत्यंत महत्वाचे अंग असल्याचे महाराजांनी ओळखले होते.विशेष म्हणजे ज्या काळात मुघल साम्राज्याजवळ सार्वभौम आरमार नव्हते,त्या काळात महाराजांनी स्वतंत्र्य आरमाराची उभारणी जाणीवपुर्वक केलेली आहे.पश्चिम किनार्यावरील सागरी संरक्षणाचे कार्य औरंगजेबाने जंजिरेकर सिद्दीवर सोपवले होते.पुर्व किनार्यावर मुघल आरमार होते पण ती जहाजे चालवणारी खलाशी फिरंगी असत व त्यासाठी वार्षीक चौदा लक्ष रुपये खर्च करी.अशाप्रकारे मुघली आरमार परावलंबी होते.मात्र महाराजांनी गलबते स्वत: बांधुन त्यावर आपलेच खलाशी ठेवले.हाच मुघली व मराठी आरमारातील ठळक फरक होता.

मराठ्यांच्या आरमाराची सरकाररित्या संस्थापना छत्रपती शिवरायांनी केली.महाराजांनी स्वतंत्र्य आरमार उभारण्याचा हुकुम दिला.असा उल्लेख “मराठे व इंग्रज” या ग्रंथात आहे.दिसामासाने वाढणारे स्वराज्याची सिमा समुद्र किनार्यालाही लागून आहे.किनारपट्टीवर सत्ता अधिकार प्राप्त करुन घेतल्याशिवाय आपली कोकणपट्टी सुरक्षित नाही,याची खात्रीही पटली होती.बसरुरच्या मोहिमेनंतर आलेल्या अनुभवाने शिवरायांना आरमारी प्रतीकारासाठी काही नवीन उपाययोजना करण्याची निकड वाटली.

शिवाजी महाराजांनी परदेशी पोर्तुगिज अभियंत्यांना जहाज बांधणीसाठी कामास ठेवले.

“लैतांव व्हियेगस” व त्याचा मुलगा “फेर्नांव व्हियेगस” यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांनी पहिली वीस लढाई गलबते बांधण्यास सुरुवात केली.हा जो “लैतांव व्हियेगस” होता त्याच्या हाताखाली जवळपास ४०० माणसे होती. शिवरायांमध्ये हे एक चाणाक्ष नौसेनानी होण्याचा सर्व गुण होते आणि ह्या आरमारापासुन आपल्याला भविष्यात धोका निर्माण होणार हे पोर्तुगिज विजरई पु्र्ण पणे जाणुन होता त्यामुळे आरमार पुर्ण बांधुन होण्यापुर्वीच त्याने एक जाहिरनामा काढला की शिवरायांच्या आरमारात नौकरीस असलेल्या सर्व पोर्तुगिज लोकांनी स्वदेशी परत जावे.त्यामुळे एके दिवशी सर्व कारागीर महाराजांची नौकरी सोडुन गुप्तपणे पळुन गेले.

शिवरायांचे आरमार दिवसेंदिवस वाढत होते.इतके की पोर्तुगिजांना मराठी नौदलाची भिती वाटत होता. महाराजांच्या आरमाराविषयी सन १६६७ च्या अखेरीस पोर्तुगालच्या राजास “विजरई कौंदि द सांव्हिसेंति” याने कळविले होते.विजरई लिहितो की, “शिवाजीचे नौदल मला भितीदायक वाटते.कारण त्याच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीपासुनच कारवाई न केल्यामुळे त्याने किनार्यावर किल्ले बांधिले आणि त्याच्या जवळ पुष्कळ तारवे आहेत,पण ती तारवे मोठी नाहित. शिवाजीराजे व संभाजीराजेंनी यांनी स्थानिक लोकांच्या कर्तबगारीचा सदुपयोग करुन पाश्चात्यांच्या मोठ्या आरमाराला तोंड दिले व आपल्या लोकांच्या समुद्रपर्यटनाबाबतच्या धार्मिक समजुतीत मोठी क्रांती घडवुन आणून त्यांना दर्यावर्दीपणात व आरमारी युद्धकलेत अल्प कालावधीत आघाडीवर नेऊन बसविले.

पोस्ट आभार :- Aniket dada

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here