महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,550

आग्र्याहून सुटका | खाफीखानाच्या मुन्तखबुल्लूबाब मधील काही विलक्षण नोंदी भाग १

By Discover Maharashtra Views: 1318 6 Min Read

आग्र्याहून सुटका : खाफीखानाच्या मुन्तखबुल्लूबाब मधील काही विलक्षण नोंदी भाग १ –

क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेब याच्या कचाट्यातून निसटून स्वराज्यात सुखरूप परत येणे ही शिवछत्रपतींच्या आयुष्यातील एक अत्यंत विलक्षण आणि गूढ घटना ! औरंगजेबासारख्या कपटी आणि संशयी माणसाला देखील हातोहात फसवून आपण शेरास सव्वाशेर आहोत हे शिवछत्रपतींनी जगाला दाखवून दिले. शिवछत्रपती आग्रा येथील कैदैतून कसे निसटले आग्र्याहून सुटका याबद्दल समकालीन राजस्थानी पत्रांमध्ये आणि काही इतर साधनांमध्ये त्रोटक उल्लेख मिळतात, परंतु त्यांचा प्रवास नेमका कोणत्या मार्गाने आणि कसा झाला याबद्दल मात्र इतिहास मौन आहे, त्यामुळे हा प्रवास कसा झाला असेल याबद्दल आज आपण फक्त तर्क आणि अंदाजच व्यक्त करू शकतो.

** खाफी खानाचा मुन्तखबुल्लूबाब **

मुघलांच्या  सेवेत  असलेल्या मुहंमद हाशिम खाफी खान याच्या मुन्तखबुल्लूबाब या महत्वाच्या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटके विषयी काही महत्वाची आणि अपरिचित माहिती आली आहे. “ मी माझ्या या ग्रंथासाठी फिरिश्ता , बाबर आणि जहांगीर यांची आत्मचरित्रे  आणि आलमगीरनामा आणि मआसिर-ए-आलमगिरी या सारख्या ग्रंथांचा वापर केला आहे. ” असे खाफीखान आपल्या पुस्तकात सांगतो, तसेच काही गोष्टी मुघलांच्या सेवेत असलेल्या माझ्या भावाने आणि मुघलांच्या सेवेत असलेल्या काही जुन्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या आहेत असे देखील तो लिहितो.औरंगजेबाच्या कारकिर्दीतील घटनांच्या नोंदी त्या घटना घडल्या त्याच वेळी खाफी खानाने ठेवल्या असतील असे वाटत नाही, कारण आपल्या ग्रंथात, “ मी हे सर्व स्मरणाने लिहीत आहे” असे तो अनेक ठिकाणी म्हणतो. माणसाच्या आठवणींमध्ये चूक होऊ शकते, त्यामुळे त्याने नमूद केलेल्या घटना तंतोतंत तशाच घडल्या असे ठामपणे म्हणता येत नाही, पण तरी देखील त्याने आपल्या आठवणींमधून लिहिलेला काही भाग तरी खरा असावा, किंवा निदान त्या घटनेच्या तपशिलांमध्ये तर्कांसाठी एक महत्वाचे ‘बीज’ आहे असे म्हणायला हरकत नाही.

आग्र्याहून सुटके सारख्या घटनांची इतर साधनांमध्ये फारच त्रोटक माहिती उपलब्ध असताना, या स्मरणरूपी हकीगतीतून का होईना, पण एक वेगळी आणि अधिक तपशीलवार माहिती आपल्यासमोर येते.आग्र्याहून सुटका.

आग्र्याहून निसटल्यानंतर शिवाजी महाराज पुढे कुठे आणि कसे गेले याबद्दल खाफीखानाने मुन्तखबुल्लूबाब या ग्रंथाच्या दुसऱ्या भागातील पृ.क्रमांक  २१७ पासून पुढे  माहिती  दिली  आहे , ती पुढील प्रमाणे :-

** मूळ फारसीचे  मराठी  लिप्यांतर**

अलहाल चंद कलमा अज़ अहवाल ए सिवा ए  खुसरान मआल, के बाद ए फरार अज़ हुजूर, कार ए आन बद सिगाल ब-कुजा रसीद , ब-जबान ए कलम मी दहद. की बादा की आन काफिर मुहिल अज़ मतहरा तघईर ए लिबास नमूदा, रिश ओ बरुत तराशीदा, हमराह ए संभा, पिसर ए  खुर्दसाल व करीब चेहेल ओ पंजा  नफर अज़ हरकार हा  व दीगर वाबिस्तहा, की हमा ख़ाकस्तर ब रु मालिदा खुदहा रा ब-सूरत ए फ़क़ीराने हुनुद साख्ता, ऑंचे अज़ जीनस ए जवाहिर  ए बेशकीमत दाश्त व  कदरी अज़ अशरफी व होन की तवानिस्त  बर्दाशते दर चौब ए दस्तहा की मजूफ साख्ता बूद , अंदाख्ता सर आन्हा कायम करदा  व कदरी जेर ए कफशहा ए कोना दोख्ता से फिरका ए मुखतलिफ अलवजाए बैरागी व गुसाइयान व् उदासी शुदे राह ए अलाहाबाद व बनारस पेश गिरफ्ता मरहला  पैमा गरदीदंद व यक दाना ए अलमास ए बेशकीमत ब-चंद दाना ए याकूत दर मोम गिरफ़्ता  दर रख्त ए पोशीश ए हरकारा  ए दोख्ता व दर दहान ए बअज़ी ए हमराहान दादे, तय मूसाफ़त मी नमूद. ता ब-मकानी रसीद के ,ब-अली कुली नाम फौजदार ए ऑंजा अज़ निविष्ता ए वकील क़ब्ल  अज़ रसीदन, गुर्ज़बरदारान मा अहकाम ए खबर ए फ़रार ए सिवा व ताइन फर्मूदन गुर्ज़बरदारान रसीदा बूद. फौजदार अज़ शुनीदन ए खबर ए फरार ए सिवा, व रसीदन ए हरसए गिरोह ए फ़कीरान फर्मूद  की हमा रा मकैद साजंद व पाये तफ्तीश.

** मराठी भाषांतर **

“ आता मी (खाफीखान) शिवाचा कैदेतून पळून गेल्यानंतरचा वृतांत देतो. त्या काफराने लबाडीने मथुरा येथे वेषांतर केले, आणि  त्याने आपली दाढी आणि मिश्या काढून टाकल्या, नंतर त्याने आपला अल्पवयीन पुत्र संभा, आणि ४० किंवा ५० हरकाऱ्यांना आणि इतर अनुयायांसह स्वत:च्या चेहऱ्यावर राख (भस्म) फासली आणि हिंदू फकिरांचा वेश घेतला. त्यांनी बैरागी, गोसावी आणि उदासी अशा तीन गटात स्वत;ला विभागून अलाहाबाद आणि बनारसचा रस्ता धरला. शिवाने त्याच्याकडील उपलब्ध मौल्यवान रत्ने व यासोबत काही प्रमाणांत अशर्फी आणि होन, पोकळ केलेल्या काठ्यांमध्ये (चोब) ठेऊन त्या काठ्यांची तोंडे बंद केली, त्याने काही मौल्यवान वस्तू पेहरावाच्या आत शिवून घेतल्या.

प्रवासा दरम्यान, त्याने एक अत्यंत मौल्यवान हिरा आणि काही माणके मेणात लपवून आपल्या हरकाऱ्यांच्या कपड्यांत आणि बरोबरच्या सामानात शिवून घेतले, याशिवाय त्याने आपल्या सहकाऱ्यांना काही रत्ने तोंडात लपवायला सांगितली. अशा प्रकारे ते मार्गक्रमण करत एके जागी पोहोचले, त्या ठिकाणचा फौजदार, ज्याचे नाव अली कुली होते, त्याला शिवाच्या पलायनाविषयीचा हुकुम घेऊन येणाऱ्या गुर्जबरदाराच्या  आगमनापूर्वी त्याच्या (दरबारातील) वकिलाकडून गुर्जबरदाराच्या नेमणुकीची आणि शिवाच्या पलायनाची बातमी पत्राद्वारे कळली होती. शिवाच्या पलायनाची बातमी माहित झाल्याने अली कुली याने फकिरांच्या गटांना अटक करण्याची आणि  त्यांची  चौकशी करण्याची  आज्ञा दिली. “

अली कुली ने या फकीरांच्या तांड्याला पकडले का? त्यांचे पुढे काय झाले? पाहूया पुढील भागात.

भाग १ समाप्त.

क्रमश :आग्र्याहून सुटका.

अभ्यासक:-
श्री.अमोल बनकर
श्री.सत्येन सुभाष वेलणकर
पुणे

संदर्भ:-
१)) मुन्तखबुल्लूबाब, भाग २, मूळ फारसी.
2) Aurangzeb in Muntakhab-Al-Lubab, Anees Jahan Syed

Leave a comment