मराठी ज्ञानकोशाचे स्मृतीस्थळ
एरंडवण्यातील कमला नेहरू उद्यानाच्या मागील बाजूस, डाव्या कोपऱ्यात शांतपणे उभे असलेले एक छोटेसे ग्रॅनाइटचे स्मारक अनेकांना सहज नजरेतही भरत नाही. पण ही साधी वाटणारी वास्तू म्हणजे मराठी भाषेला अमूल्य ठेवा देणाऱ्या मराठी ज्ञानकोशाचे निर्माता व संपादक ज्ञानकोशकार डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे हे स्मृतिस्थळ आहे. दरवर्षी १० एप्रिल रोजी, त्यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी येथे येऊन आदरांजली वाहतात. पण तरीही हे स्थान आजही अनेकांसाठी अपरिचितच आहे.
२ फेब्रुवारी १८८४ रोजी रायपूर येथे जन्मलेले डॉ. केतकर हे अत्यंत विद्वान संशोधक होते. मुंबईतील शिक्षणानंतर ते अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात गेले आणि तेथे ‘हिंदुस्थानातील जाती-जमातींचा इतिहास’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी अध्यापनाची वाट निवडली, पण त्यांची खरी ओढ होती संशोधनाची. त्यातूनच त्यांनी एक मोठा संकल्प केला, मराठी भाषेत ज्ञानकोश निर्माण करण्याचा!
इ.स. १९१७ साली नागपूर येथे सुरू झालेल्या या कार्याने पुढे पुण्यात मूळ धरले. इ.स. १९२० ते इ.स. १९२७ या अवघ्या सात वर्षांत त्यांनी ३३ भागांचा भव्य ज्ञानकोश तयार केला, तेही कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय!
ज्ञानकोश विक्रीसाठी ते स्वतः पुस्तके घेऊन पुण्यात घरोघरी फिरत असत. आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही त्यांनी कोणतीही देणगी स्वीकारली नाही. इतकी की, दुपारच्या जेवणाऐवजी खिशात ठेवलेला कांद्याचा भजीचा तुकडा खाऊन ते काम करत असत, असे त्यांच्या चरित्रातून समजते. त्यांच्या या ध्येयवेड्या कार्यात त्यांची पत्नी शीलवती (एडिथ कोहेन) यांनीही खंबीर साथ दिली.
ज्ञानकोशाचे काम सुरू असतानाच केतकरांचे कादंबरी लेखनही चालू होते. गोंडवनातील प्रियवंदा, परागंदा, आशावादी, ब्राह्मणकन्या, गावसासू, विचक्षणा इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. इ.स.१९३१ साली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. आपले संपूर्ण आयुष्य ज्ञानसेवेसाठी अर्पण करणाऱ्या या महान विद्वानाचा शेवट मात्र अत्यंत साध्या आणि कठीण परिस्थितीत झाला. मधुमेहाच्या आजारामुळे १० एप्रिल १९३७ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
पुण्यातील वाडे आणि वास्तू – डॉ. एच. वाय. कुलकर्णी
आठवणी_इतिहासाच्या
Written By: आठवणी इतिहासाच्या