महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पासोड्या विठोबा मंदिर, पुणे | Pasodya Vitthoba Temple, Pune

By Discover Maharashtra Views: 1225 3 Min Read

पासोड्या विठोबा मंदिर, पुणे | Pasodya Vitthoba Temple, Pune –

फरासखान्याजवळील हुतात्मा स्मारक चौकातून सरळ इलेक्ट्रिक मार्केटकडे जाताना रस्त्याच्या मधोमध एक मंदिर दिसते. ते पासोड्या विठोबा मंदिर. काही वर्षांपूर्वीपर्यंत हा रस्ता आणि आजूबाजूचा परिसर कापडगंज किंवा कापडआळी म्हणून ओळखला जात असे. कापड आळीच्या रविवार पेठेच्या तोंडाजवळ पासोड्या विकणारी दुकाने होती. सध्याच्या काळात पासोड्या हा वस्त्रप्रकार अस्तित्वात नाही, परंतु पूर्वीं पासोडी हे अंगावर पांघरायचे उबदार वस्त्र म्हणून प्रचलित होते. त्या काळची गरीब किंवा मध्यमवर्गियांची पांघरुणे म्हणजे घोंगडी किंवा तिच्यापेक्षा उजवी ती पासोडी. त्या काळी नारायणगावच्या पासोड्या प्रसिद्ध होत्या. त्या विकणारी मंडळी बऱ्याच वेळा रस्त्यावर दुकान मांडून बसत. त्यामुळे शेजारी असलेल्या मारुतीला पासोड्या_मारुती नाव पडले, आणि पासोड्या मारुतीजवळचे मंदिर म्हणून ह्या मंदिराला पासोड्या विठोबा मंदिर हे नाव मिळाले.(Pasodya Vitthoba Temple, Pune)

या ठिकाणी पूर्वी एक प्राचीन शिवलिंग असलेली घुमटी होती. समोर एक वृक्ष, पार व पाण्याचा सार्वजनिक हौदही होता. या मंदिरात छत्रपती शिवाजीमहाराज श्री तुकोबारायांच्या कीर्तनास आले होते. त्या प्रसंगी मोगलांच्या वेढ्यातून त्यांनी आपली सुटका करून घेतली होती. अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

इ.स. १८१० मध्ये पुण्यातील देवस्थानांची यादी केली गेली. त्यात सदर मारुतीची नोंद ‘नारायणगावी पासोड्या विकावयास कापडआळीत बसतात तेथे’ अशी केलेली आहे. तथापि, या यादीत पासोडया विठोबाची नोंद नाही. याच यादीतील नोंदीत कापडआळीतील महादेवापुढे एक रुपया ठेवल्याची नोंद आढळते आणि त्यावरून हे स्थान पेशवाईतील शिवमंदिर होते हाही उलगडा होतो. इ.स. १८७२ मध्ये इंग्रजांनी केलेल्या पुणे शहराच्या सव्हें नकाशातही या जागी मंदिराऐवजी घुमटी, पार आणि हौद स्पष्ट दर्शवलेले दिसतात. म्हणजेच, नंतरच्या काळात इंग्रजी अमलातच या स्थानी विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमांची स्थापना झाली असणार; परंतु तसा निश्चित उल्लेख असलेला कागदोपत्री पुरावा उपलब्ध न झाल्याने ती निश्चित कधी झाली, हे सांगणे कठीण आहे.

इ.स. १९०४ मध्ये जुन्या मंदिराचा प्राथमिक जीर्णोद्धार झाला आणि इ.स. १९२८ मध्ये या मंदिराचे दुमजली बांधकाम करण्यात आले. या मंदिराचा कळस केडगावचे दत्तावतारी सत्पुरुष नारायण महाराज यांच्या हस्ते बसवण्यात आला. तेव्हापासून या मंदिरात अखंड नामस्मरणाची प्रथा चालू झाली, ती आजतागायत कायम आहे

मंदिर छोटेसे असून दुमजली आहे. मंदिराला छोटासा सभामंडप आहे. त्यात गाभाऱ्यासमोर संगमरवरी नंदीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणीच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. मुख्य मूर्तीच्या शेजारी गणपती आणि देवी यांच्या छोट्या संगमरवरी मूर्ती आहेत. खाली शिवलिंग आहे.

संदर्भ:
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोवनी
पुणे शहराचा ज्ञानकोश – डॉ. शां. ग. महाजन
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता : https://maps.app.goo.gl/5BDJDXvAsbbZx8Q26

आठवणी इतिहासाच्या

Leave a comment