प्रथम रघुजीराजां सोबत नागपुरात आलेली सरदार मंडळी…

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 1
4 Min Read

प्रथम रघुजीराजां सोबत नागपुरात आलेली सरदार मंडळी…

मराठ्यांचा विदर्भाशी संबंध शिवछत्रपती पासून काही प्रमाणात येऊ लागला होता. पुढे राजाराम छत्रपतींच्या काळात मराठे वऱ्हाड आणि विदर्भावर स्वाऱ्या करू लागले. प्रथम रघुजीराजांच्या वेळेस कित्येक मराठे सरदार पहिल्यांदा विदर्भ प्रांतात स्थायिक झाले. नवीन भाषा, नवीन प्रांत, नवीन वातावरण, नवीन खाद्य, नवीन भूप्रदेश आणि गोंड संस्कृती यांच्या सोबत मराठ्यांचा जेव्हा संपर्क आला असेल तेव्हा एक संस्कृतीक मिश्रता येथे निर्माण झाली असेल हे इतिहास आणि वर्तमान पाहता सहज लक्षात येते.

प्रथम रघुजीराजांसोबत आलेले सरदारांची यादी नागपूरकर भोसल्यांच्या बखरीत आली आहे ती पुढीलप्रमाणे :-

मराठे सरदार :-
१. रघूजी करांडे :- याच्या मुलाचे नाव बापू करांडे म्हणून येते. सन १७५८ च्या जानोजीराजे आणि निजामअली यांच्यात झालेल्या लढ्यात रघुजी करांडेला वऱ्हाड भागाच्या बंदोबस्ताची जबाबदारी दिली होती. जानोजीराजे व मुधोजीराजे या दोघा भावांच्या भांडणात रघुजी करांडेने मुधोजीराजांची बाजू घेतली. दोघा भावांची लढाई अमरावती जवळ रहाटगाव येथे झाली. लढाई ऐन रंगात आली असता मुधोजीकडील सरदार रघुजी करांडे याच्या बसत्या घोड्यासारखा एक घोडा बिन स्वाराचा मोकाट सुटला. तो पाहून बातमी उठली की रघुजी करांडे पडला. ते पाहून सर्व फौज म्हणू लागली की मुधोजीराजांचा मोड झाला. यात मुधोजीराजांचा फडणवीस मोरोपंत जानोजीराजांच्या ताब्यात सापडला. परंतु रघुजी करांडे यांनी फौज सावरून पुन्हा लढाई दिली व मोरोपंतास सोडवून आणले. पण या लढाईत मुधोजीराजांची फौज मागे हटली. पुढे तह होऊन दोघा भावांमध्ये तंटा होऊ नये म्हणून रघुजी करांडेने मध्यस्थी राहावे असे ठरले. १७६० च्या दरम्यान निजामाने बुऱ्हाणपूर भागात प्रचंड धुमाकूळ घातला होता. कित्येकांनी निजामाच्या धाकाने पोटात कट्यार खुपसून आत्महत्या केली, गावचे गाव उध्वस्त झाले होते. साहूकार लुटल्या गेले होते. अश्यावेळी रघुजी करांडेने मोगलांच्या फौजेशी दोन लढाया देऊन त्यांचे बरेच लोक मारले.
२. आनंदराव वाघ
३. बाबाजी घाडगे झुंजारराव
४. संभाजी शिरके
५. जानराव गुजर
६. नऱ्होजी जाचक :- नऱ्होजी जाचक हा ओरिसातील बाराभाटीच्या किल्ल्यावर पहिला किल्लेदार होता. या जाचक घराण्यातील बरेचसे गृहस्थ ओरिसा प्रांतात लष्करी अंमलदार म्हणून होते. दारकुजी जाचक, हैबतराव जाचक हे बाराभाटीच्या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून होऊन गेले.
७. गिरमाजी खंडेराव
८. बिंबाजी वंजाळ
९. त्रिंबकजी गव्हाणे

ब्राह्मण सरदार –
१ तुळजोराम
२ भास्करराम कोल्हटकर :- कोल्हटकर घराणे हे कोकणातील नेवाऱ्याचे राहणारे होते. भास्करराम आणि कोन्हेरराम हे दोन बंधु रामाजीपंत कोल्हटकर यांचे पुत्र होते. भास्करराम हे रघुजीराजांचे दोन हजार स्वारांचे सरदार होते. बंगालच्या स्वारीत ते मुख्य सेनापती होते. १७४४ साली अलीवर्दीने त्यांना कपटाने मारले. नागपूरच्या अव्वल पराक्रमी सरदारांमध्ये भास्कररामांची गणना केली पाहिजे.
३ शिवाजी केशव टाळकुटे

मुत्सद्दी –
१ कान्हेरराम कोल्हटकर. :- हे रघुजीराजांचे मुजुमदार होते. राज्याचा संपूर्ण आर्थिक भार यांच्याच खांद्यावर होता. रघुजीराजांच्या दुसऱ्या बंगाल स्वारीत हे राजांच्या सोबत होते. रानी दिघीच्या लढाईत ते घायाळ झाले. त्यांना बंदुकीची गोळी, तलवारीचे व काट्यारीचे वार लागले होते.
२ व्यंकाजी व राघो बक्षी
३ रघुनाथभट
४ झिपरे पटवर्धन (शिक्केनवीस)

प्रभु- सरदार –
१ काशीराव लक्ष्मण
२ दिनकर विनायक
३ शिवाजी विनायक व उमाजी विनायक बंधु

मुत्सद्दी –
१ रखमाजी गणेश (चिटणीस)
२ नरसिंगराव तिमाजी (चिटणीसाचे हाताखाली)
३ यशवंतराव पोतनीस
४ महादजीपंत फडणीस
५ विश्वंभर वैद्य

संदर्भ :- 1) नागपूरकर भोसल्यांचा इतिहास :- या. मा. काळे
2) नागपूर दरबारचे सरदार आणि मुत्सद्दी :- डॉ. प्रभाकर गद्रे
3) काशीराव राजेश्वर गुप्ते विरचित :- नागपूरकर भोसल्यांची बखर

© पृथ्वीराज धवड

Written By: Pruthvi Dhawad

Leave a Comment