यादव राजा सिंघणदेव दुसरा याचा गणेगाव खालसा येथील १२ व्या शतकातील भूमी दान शिलालेख !!!
उपलब्धी व स्थळ:- गणेगाव खालसा येथील १२ व्या शतकातील भूमी दान शिलालेख पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे गणेगाव खालसा येथील रोकडोबा महादेव मंदिराच्या समोर दीपमाळे शेजारी ठेवलेल्या एका मोकळ्या सुट्ट्या शिळेवर कोरलेला आहे. शिलालेखाची मापे उभी लांबी.१६ इंच आडवी रुंदी.२१ इंच. आहे सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून ९ ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी संस्कृत मिश्र स्वरूपात आहे लेखाच्या शीर्षभागी मोठ्या आकारात सूर्य चंद्र असून वरील भाग खंडित आहे. लेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील अनेक अक्षरे पूर्णपणे पुसट झाली आहेत. शिवाय लेखावर चुना आणि रंग दिल्यामुळे त्यावरील मजकूर मुजुन गेला आहे. शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर अथक प्रयत्न आणि परिश्रम घेऊन वाचता येतो.
वाचन:-
१. सकु ११२४ दुंदुभी संवछर माघ माघ सुध दा[दी]व
२. द्वारावतीपुरवरा(धीश्वर) ज[जा]दववंसोद्भवु श्री
३. सिंघणदेव तव ना[नि]रु[रो]पि(त) रवुल दता स्व[स्वि]क्री[कृ]ती[ति]
४. देस वरुणार्थ भूमि वाहीली हस्तोदक । स्व-
५. दता[त्ता]च प(र)दता[त्ता]च प्राहरेच[च्च] वसुंधरा तु । षष्टि
६. वर्ष सहस्राणि विष्ठायां जायते क[कृ]मी[मिः] । ब-
७. हुवि[भि]व[र्व]सुधा भुक्ता राजा(भिः)च सगरादिभिः य-
८. स्य यस्य यदा भूमि[मिः] तस्य तस्य तदा फलं
९. मंगल मह[हा]स्री
अर्थ :
शालिवाहन शक ११२४, दुंदुभी नाम संवत्सर, माघ शुद्ध द्वादशी, म्हणजेच १० फेब्रुवारी १२०३, सोमवार या दिवशी हा दान शिलालेख कोरण्यात आला. असून या लेखात द्वारावतीपुरावधेश्वर”द्वारावती या श्रेष्ठ राजधानीचा अधिपती आणि यादववंशात जन्मलेले सम्राट श्री सिंघणदेव (यादव दुसरे)” असा होतो. पुढे हा दानव्यवहार श्री सिंघणदेव यांच्या आज्ञेने अथवा त्यांच्या आदेशानुसार पार पडल्याचे नमूद केले आहे.
त्यानंतर राऊळ (रवळ) दत्त या अधिकाऱ्याने किंवा दानकर्त्याने स्वेच्छेने (स्वीकृतीपूर्वक) स्थानिक देवस्थानाच्या उपयोगासाठी भूमी दान दिल्याची नोंद आहे. हे भूमिदान हस्तोदक विधीने करण्यात आले. हस्तोदक म्हणजे दान देताना पाण्याला साक्षी ठेवून धर्मशास्त्रानुसार आणि कायदेशीर पद्धतीने दानाची पूर्तता करण्याची प्राचीन विधी होय.
यानंतर भूमिदान अबाधित राहावे आणि त्याचे पावित्र्य जपले जावे या उद्देशाने भारतीय दानपरंपरेतील प्रसिद्ध धर्मशास्त्रीय शाप–आशीर्वादपर श्लोक कोरले आहेत. त्यानुसार, स्वतःने दिलेली किंवा दुसऱ्याने दिलेली भूमी जो कोणी बळकावेल, तो साठ हजार वर्षे विष्ठेत कृमी (किडा) म्हणून जन्म घेत राहील, असा इशारा देण्यात आला आहे. पुढे ही पृथ्वी सगरादी अनेक राजांनी उपभोगलेली आहे; परंतु ज्या काळात ज्या व्यक्तीकडे भूमी असेल, त्या त्या व्यक्तीलाच त्या भूमीच्या दानाचे किंवा उपभोगाचे फळ प्राप्त होते, असा धर्मशास्त्रीय सिद्धांत मांडण्यात आला आहे.
शेवटी “मंगल महाश्री” या शुभसमाप्तीच्या शब्दांनी शिलालेखाची सांगता करण्यात आली आहे.
लेखाचे महत्त्व :
हा शिलालेख यादवकालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि प्रशासकीय इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा पुराभिलेख आहे. शालिवाहन शक ११२४ (इ.स. १२०३) मधील हा लेख यादव सम्राट सिंघणदेव (यादव द्वितीय) यांच्या राज्यकाळातील असल्यामुळे तत्कालीन राज्यव्यवस्था, राजकीय अधिकार आणि प्रशासनाची मौल्यवान माहिती उपलब्ध करून देतो. लेखात “द्वारावतीपुरवराधीश्वर, यादववंशोत्पन्न श्री सिंघणदेव” ही बिरुदावली आढळत असल्याने यादव राजांची सार्वभौम सत्ता, त्यांची राजकीय प्रतिष्ठा आणि राजकीय वैधता अधोरेखित होते.
या शिलालेखातून राजाच्या आज्ञेने स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत भूमिदानाची अंमलबजावणी केली जात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे केंद्रातील राजसत्ता आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील परस्परसंबंध, तसेच दानविषयक प्रशासकीय प्रक्रिया यांचा अभ्यास करण्यासाठी हा लेख महत्त्वपूर्ण ठरतो.
या लेखातील भूमिदानाची नोंद तत्कालीन आर्थिक आणि धार्मिक व्यवस्थेवरही प्रकाश टाकते. देवस्थानांच्या देखभालीसाठी, धार्मिक विधींच्या सातत्यासाठी आणि मंदिरांच्या आर्थिक स्थैर्यासाठी भूमिदान ही एक प्रभावी व्यवस्था होती. त्यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्रातील देवस्थानांची आर्थिक रचना, त्यांची उत्पन्नव्यवस्था आणि समाजातील त्यांचे स्थान समजून घेण्यासाठी हा शिलालेख अत्यंत उपयुक्त आहे.
लेखात उल्लेखिलेला हस्तोदक विधी हा भूमिदानाच्या कायदेशीर आणि धर्मशास्त्रोक्त मान्यतेचा महत्त्वाचा पुरावा आहे. पाण्याला साक्षी ठेवून केलेले दान हे अंतिम, पवित्र आणि अविचल मानले जात असे. त्यामुळे त्या काळातील दानविधी, धर्मशास्त्रीय परंपरा आणि कायदेशीर व्यवहार यांचा अभ्यास करण्यासाठी हा उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे.
शिलालेखातील “स्वदत्तां परदत्तां वा…” आणि “बहुभिर्वसुधा भुक्ता…” हे धर्मशास्त्रीय श्लोक भारतीय भूमिदान परंपरेतील अत्यंत प्राचीन आणि प्रचलित सूत्रे आहेत. या श्लोकांमधून दान केलेल्या भूमीचे संरक्षण, दानकर्त्याच्या पुण्याची संकल्पना, तसेच भूमीचा अपहार करणाऱ्यावरील धार्मिक दंड यांचा उल्लेख आढळतो. यावरून तत्कालीन समाजात धर्मशास्त्राचा सामाजिक आणि कायदेशीर जीवनावर असलेला प्रभाव स्पष्ट होतो.
भाषिक आणि अभिलेखीय दृष्टीनेही हा लेख महत्त्वाचा आहे. संस्कृतप्रचुर भाषा, नागरी लिपी, राजबिरुदे, दानविषयक संज्ञा आणि धर्मशास्त्रीय वाक्यरचना यांच्या अभ्यासासाठी हा शिलालेख महत्त्वपूर्ण स्रोत आहे. तसेच शक, संवत्सर, तिथी आणि वार यांचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे कालगणनेची पडताळणी करून इतिहासातील घटनांचा अचूक कालक्रम निश्चित करण्यास मदत होते. एकूणच, हा शिलालेख यादवकालीन राजकीय सत्ता, भूमिदान व्यवस्था, मंदिरांची आर्थिक रचना, धर्मशास्त्रीय परंपरा, प्रशासन, भाषा, लिपी आणि सामाजिक जीवन यांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत विश्वसनीय व मौल्यवान पुराभिलेख असून, मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पुनर्रचनेसाठी तो एक महत्त्वाचा प्राथमिक ऐतिहासिक स्रोत आहे.
गावाचे नाव :- मु. पो . गणेगाव खालसा ता. शिरूर जिल्हा- पुणे
जी.पी.एस. :N-१८.७५६५७०,E..७४.१८३०२०
शिलालेखाचे स्थान : – रोकडोबा मंदिराच्या समोर दीपमाळेपाशी मोकळ्या सुट्ट्या शिळेवर कोरलेला आहे.
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे ..
लिपी व भाषा :- देवनागरी लिपी, मराठी- संस्कृत भाषा
प्रयोजन : मंदिराच्या धार्मिक विधीसाठी प्रदेशातील जमीन भूमी दान दिल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :- शके ११२४ दुंदुभी नाम संवत्सरे . माघ वद्य द्वादशी
काळ वर्ष : विसावे शतक – सन १२फेब्रुवारी १२०३ सोमवार
राजा /कारकीर्द:. यादव राजा सिंघणदेव
ग्राम नाम:-
देवता नामः
व्यक्तीनामःसिंघणदेव यादव, रेउळ देव
शिलालेखाचे संशोधक :- श्री. अनिल किसन दुधाणे.
शिलालेखाचे वाचक :- श्री अथर्व पिंगळे,श्री. अनिल किसन दुधाणे.
संक्षेप :-
संदर्भ:- IEIV- ८
©माहिती व संकलन :- श्री अनिल किसन दुधाणे.
टीप : सदर शिलालेख संशोधन वाचन कार्यात , डॉ. श्री शैलेंद्र भांडारे, देवेश शहा यांची विशेष मदत झाली आहे. अजित गोसावी अजय सोनवणे याचे सहकार्य लाभले.
