महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

भान उमललेली 6 वर्षे…..!

By Discover Maharashtra Views: 3610 9 Min Read

भान उमललेली 6 वर्षे…..!

( कार्य वृतांत थोडक्यात)

9 नोव्हेबर 2011 ह्याच दिवशी  मित्रांच्या दिवाळी स्नेहमेळाव्यातून काहीतरी “जिंदगी वसूल” करणारं काम उभं करायला हवं, यावर चर्चा झाली. या चर्चेतूनच आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सिंचन, वनीकरण, स्वच्छता या विषयावर आपल्या-आपल्या कार्यक्षेत्रानुसार योगदान देण्याचा आणि त्यातुनच मित्रासोबतच्या आठवणी याकार्यातून चिरतरुन करण्याचा, विचार आमच्या मित्रांच्या मैफिलीत मांडण्यात आला;आणि याच विचारातून” मैत्रेय प्रतिष्टान” नावाची चळवळ उभी राहीली.

हळूहळू डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, उद्योजक, वकील, व्यापारी, विदयार्थी, शेतकरी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास 41 मित्रांच संघटन मैत्रेय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सर्वानी सुरू केलं….

याच विचारातून नवयुवकच्या मित्रमंडळ दैठणाच्या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात केली. तशी ती 2008 च्या गणेशोत्सवातल्या वृक्षारोपणापासूनच झाली. पण शिवजयंतीच्या माध्यमातून लोकपयोगी विधायक कार्याला खऱ्या अर्थानं सुरवात झाली. तिथून रक्ताच्या बंधाला जोडण्यासाठी “दो बुंद देश के नाम” म्हणत शिवजयंतीला रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलं. युवा प्रेरणा म्हणून वेगवेगळ्या क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आल्या, कामाला सुरवात झाली होती…

ठिणगी पेटली होती. लोकाकडूनही या कामाचं कौतुक तर होत होतंच, पण मदत ही मिळत होती. हे काम आपल्यापुरत न राहता, यात अनेक समाजप्रेमी,राष्ट्रप्रेमी आणि माणुसकीला मानणारे कार्यकर्ते तयार व्हावेत म्हणून वैचारिक बैठकीसाठी मैत्रेय प्रतिष्ठानच्या वतीनं डॉ. विष्णू उढाण, यांचा आर्थिक साक्षरतेवरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाबरोबरच अंबड शहरात म्हाडा कॉलनी येथे वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम साकारण्यात आला. या विविधांगी कामाला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अंबड व तिर्थपुरी येथील पत्रकार बांधवानी देखील मोलाचे सहकार्य केले.

हळूहळू आजूबाजूच्या प्रश्नांनी मन व्यथित होत होतं. प्रत्येक प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा ध्यास मनात येत होता. सामजिक जाणिवांचे निखारे अधिक पेट घेऊ लागले होते. त्यातच इंदिरानगर मधील माझ्याच शाळेतील यश जाधव नावाचा मुलगा कपडे घालायला नाही म्हणून शाळेत येत नव्हता; त्याच्या त्या प्रश्नाच्या मुळाशी जाता समजले की असे अनेक मुलं या झोपडपट्टीत आहेत, जे केवळ कपडे नसल्यामुळे शाळेत येतच नाहीत. अशा मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी 120 मुलांना गणवेश व शालेय साहित्याचं वाटप स्व खर्चातून करण्यात आलं होतं. त्याच अनुषंगानं मैत्रेय प्रतिष्ठानच्या माध्यमातून 60 मुलाना गणवेशाच त्यापुढच्या काळात वाटप करण्यात आलं…

( कार्य वृतांत थोडक्यात)

“स्वच्छता ही शुरवात का संकल्प है”, अस म्हणत 22 नोव्हेबर 2013 ला भायगव्हान या गावात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपणाचा उपक्रम राबवन्यात आला. मैत्रेय प्रतिष्ठान च्या माध्यमातून आमच्या मित्रमंडळींच्या, कोल्हापूरच्या संदीपजी यांच्या आधार फाऊंडेशन आणि ग्रामस्थांच्या मदतीने पार पडणारा हा उपक्रम बऱ्याच अर्थानी खास होता. डॉक्टर, शिक्षक, व्यापारी , वकील, शेतकरी, विद्यार्थी अशा वेगवेगळ्या कार्य क्षेत्रातले बाहेरगावचे लोक आपल्या गावात येऊन आपल्या गावातल्या नाल्या व घाण काढण्याचं काम करत आहेत हे पाहून त्या गावातल्या गावकऱ्यानीही त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. याच उपक्रमातून “समाजभान” जागृती अभियानाला सुरवात झाली.

तो काळ दुष्काळाचा होता. म्हणून दुष्काळ ग्रस्तना मदतीचा हात या उपक्रम अंतर्गत, 23 नोव्हेबर 2013 या दिवशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाना शिलाई मशीन, तूरडाळ, व धान्याचं वाटप करण्यात आलं. मुलांना कपडे व शालेय साहित्याचही वाटप करण्यात आलं. आणि त्याच मेळाव्यात 25 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची 12 वर्षासाठी जबाबदारी आधार व मैत्रेय प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आली. स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण, रक्तदान, प्रबोधन आणि यातून समाजभान मोहिमेला सुरवात झाली.

2009 साली विनाअनुदान असताना 5 विद्यार्थ्यांची 2 वर्षाकरीता शैक्षणिक जबाबदारी घेत शैक्षणीक पालकत्वाला सुरवात झाली. आज जवळ पास 25 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलं, 22 दुर्दर आजारग्रस्त मुलं, 80 भंगार गोळा करणारी वंचित मुलं, 8 बालकामगार, अशी जवळपास135 मुलं समाजभानच्या माध्यमातून शिक्षण प्रवाहात आली आहेत….

( कार्य वृतांत थोडक्यात)

रक्तदान ही एक चळवळ व्हावी म्हणून गेल्या 6 वर्षात 9 रक्तदान शिबिराचे आयोजन करून, दरवर्षी स्वातंत्रदिन व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत. जवळपास नवीन 400 रक्तदात्या तरुणाची फळी या द्वारे अंबड, तिर्थपुरी व परिसरात तयार झाली आहे. त्या द्वारे आजवर 86 रुग्णांना रक्तपुरवठा करण्याचं कार्य टीम च्या माध्यमातून पार पडलं..

पर्यावरण संवर्धनासाठी आजवर जवळपास 1000 झाडांचं रोपण आणि मागील वर्षी “वृक्ष आपुल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत 1000 झाडाचं वाटप करण्यात आलं.

युवा प्रेरणा या उपक्रमातून राष्ट्रप्रेमी, समाजप्रेमी आणि आदर्शवत तरुण घडावा म्हणून जिजाऊ जयंती आणि स्वातंत्रदिनाच औचित्य साधून प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या व्याख्यानाचा कार्यक्रम नाट्यगृहात आयोजित करण्यात आला. याच उपक्रमाअंतर्गत कर सहायक आयुक्त जोगदंड साहेब आणि उपायुक्त पावडे साहेब यांचं झिरो टू हिरो हा कार्यक्रम तरुणाई पर्यंत पोहचवण्यात आला.

थंडीच्या दिवसात तोडक्या कपड्यापासूनही वंचित असणाऱ्या समाजातील घटकासाठी, “जे नको ते द्या, जे हवं ते घेऊन जा” अस आवाहन करत माणुसकीची भिंत अंबड शहरात गेल्या दोन वर्षांपासून उभारण्यात आली. त्या द्वारे अनेक वंचिताना कपडे, थंडीच्या साहित्याचं वाटप नियमितपणे। करण्यात येत. त्याचा लाभ अनेक वंचितांना मिळाला.

( कार्य वृतांत थोडक्यात)

“एक दिवा पेटवूया, चला दिवाळी साजरी करूया” या उपक्रमाला 2016 पासून सुरवात झाली. दारोदारी अन्नासाठी झोळी घेऊन फिरणाऱ्या मुलांना, आज इथे उद्या तिथे जगण्यासाठी भटकंती करणाऱ्या पालवरच्या अंधाऱ्या झोपडीत दिवाळीचा दिवा पेटवून, त्यांचीही दिवाळी गोड करण्यासाठी समाजभान टीमनं झोपड्यात जाऊन दिवाळी साहित्या बरोबरच, कपडे, साड्या ,चादर, मिठाई, फटाके, अत्तर, साबण ,उटणं, दिवापणती या साहित्याच वाटप केलं. या साहित्याबरोबर त्यांच्या झोपडीतला अंधार मिटवण्यासाठी सौरदिव्याच वाटपही करण्यात आलं. या सौर दिव्यांनी झोपडितला अंधार काही दिवसासाठी तरी नाहिसा व्हावा,असा आमचा प्रयत्न आहे.

एकात्मिक सल्ला केंद्र, उपजिल्हा रुग्णालय अंबड या ठिकाणी दोन वर्षांपासून दुर्दर आजार ग्रस्त रुग्णांना मिठाई वाटप करण्याबरोबरच, या वर्षी 35 महिलांना भाऊबीज म्हणून साडी वाटप करण्याचं काम समाजभान टीम कडून करण्यात आलं.

निराधार झालेल्या कुटुंबाला घर उभारणीसाठी समाजभान टीम च्या मदतीनं पत्तराचं छत उभारण्यात आलं. त्याद्वारे कायम स्वरूपी घराची व्यवस्था लावून उघड्यावर आलेल्या संसाराला निवारा देण्याचं काम समाजभान कडून करण्यात आलं..

समाजभान टीमच्या माध्यमातून असाध्य आजारासाठी मदत मोहिमेच काम हाती घेण्यात आलं, याद्वारे 6 रुग्णांना मदत कार्य आणि 2 बेघराना हक्काचं घर मिळवून देण्यात समाजभानच्या टीमला यश आलं.

होतकरू हुशार पण आर्थिक दृष्टया मागास मुलांसाठी श्री.शाम कणके सर औरंगाबाद, यांच्या मदतीने मोफत शिक्षणाची, निवासाची 4 विद्यार्थ्यांसाठी सोय करून देण्यात आली. आता हिं मुलं गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेत आहेत..

( कार्य वृतांत थोडक्यात)

दारोदार भीक मागत फिरणारे, भंगार गोळा करणारे मुलं, ज्यांना समाजव्यवस्थेत बहिस्कृताची वागणूक मिळत होती अशा मुलांसाठी डॉ बाबासाहेब आबेडकरांच्या जयंती दिवशी “वंचितांच्या अंगणी शाळा” भरवून या मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्याच्याच वस्तीत 2 महिने शाळा भरवण्यात आली.

याच वंचित वस्तीतील मुलांना शाळा सुरू होताच किराणा असोशिअशन च्या माध्यमातून 200 मुलांना गणवेश, बूट, सॉक्स, या साहित्याचं वाटप करण्यात आलं.

वंचित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी दप्तर, वही, पेन, पाटी, कंपास, वाटर बॅग या साहित्याबरोबरच त्यांना शाळेतून ने आन करण्यासाठी स्कूल व्हॅनची सोय करून देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना करिअरच्या नवीन वाटाची माहिती व्हावी, स्पर्धा परीक्षेची गोडी लहान वयातच मुलांना लागावी, वाचनप्रेरनेचे संस्कार मुलामध्ये बालवयातच रुजावेत यासाठी “एक पुस्तक युवासाठी, एक पुस्तक गावासाठी” या उपक्रमाच काम टीमकडून हाती घेण्यात आलं आहे. या द्वारे आज पर्यंत जवळपास 1000 पुस्तके जमा झाली असून, 100000 (1 लाख) पुस्तके जमा करून, 100 गावामध्ये अभ्यासिका व लोकग्रंथालय उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे..

प्लॅस्टिकच्या समस्येनी संपूर्ण जगाला विळखा घातलेला असताना, त्यावर प्रबोधन आणि कार्यवाही होणं नितांत गरजेचं आहे . हे ओळखून प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन पर्यावरण तज्ञ श्री. मिलिंद पगारे सर यांच्या शिबिरांचे आयोजन समाजभान टीमकडून राबवण्यात आले..

( कार्य वृतांत थोडक्यात)

आनंदवन समाजभान अभियानाच्या माध्यमातून कर्मयोगी युगपुरुष बाबा आमटे, व डॉ विकासभाऊ आमटे, डॉ प्रकाश भाऊ आमटे, कौस्तुभ आमटे यांच्या अथक परिश्रमातून उभारलेल्या प्रेरणादायी आनंदवनाची गोष्ट आणि तिथल्या प्रयोगाचे अविष्कार आपल्या भागातल्या लोकांना प्रेरक ठरावे म्हणून “आनंदवन प्रयोगवन” या प्रेरणादायी ग्रंथाच्या 1006 प्रतीचं वाटप करून, त्यांच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी शाळा, कॉलेज आणि समाजभान जागृत असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या भेटी घेऊन मानूसकीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य समाजभान टीम अहोरात्र पणे करत आहे.

या कामात मोलाची साथ देणारे समाजभान टीमचे सर्वच सदस्य आणि समाजभान जागृत नागरिक यांच्या सहकार्याला आणि माणुसकीला मानाचा सलाम..

भान हरवलेल्या समाजात समाजभान जागृत करून मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जीवनकार्य व जीवनध्येय समाजभान टीमनं खांद्यावर घेतलं आहे. यातून राष्ट्र निर्मितीस कांकणभर हातभार लागावा एवढीच या वर्धापन प्रसंगी अपेक्षा…

आपलाच समाजभान, आपल्या अनमोल सहकार्यासाठी

Dr. Gangadhar Dhandge Patil
Kailash Udhan
Kapil Pardeshi
Santosh B Warkad Patil
Santosh Jige
Nilesh Madanlalji Lohiya
Sopan Pashte Patil
Arun Makasare
Arun Raut
Sunny Kharat
Hanumant Nanasaheb Kawade
Ashok Shinde

शब्दांकन:- दादासाहेब श्रीकिसन थेट

Leave a comment