झुंज भाग ५

झुंज भाग १ ८

झुंज भाग ५ –

(झुंज – कथा रामशेजची)

खान यावेळेस मात्र कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हता. तसेच तो कोणत्याही परिस्थितीत किल्लेदाराला हलक्यात घेणार नव्हता. तसेही जो किल्लेदार आपल्या माणसांना साधी जखमही होऊ न देता एक हजाराची फौज परतवून लावू शकतो त्याच्या कल्पकतेला दाद देणे खानाला क्रमप्राप्तच होते. हाच विचार करत गेल्या १५ दिवसांपासून खान नीट झोपूही शकला नव्हता.

“हुजूर…” द्वारपालाचा आवाज आला आणि खानाची तंद्री भंग पावली… त्याने एकवार हुजऱ्याकडे पाहिले. तो खाली मान घालून उभा होता.

“आ गये सब?” खानाने विचारले.

“जी हुजूर…”

“अंदर भेजो…” हुजऱ्याला आज्ञा देत खान आपल्या जागेवर जाऊन बसला. काही वेळातच ७/८ जण खानाच्या शामियान्यात शिरले.

“बैठो…!!!” खानाचा हुकुम होताच प्रत्येक जण आपापल्या मानाप्रमाणे आसनस्थ झाला.

“करीमखान… इससे पेहेले हमे शिकस्त क्यो झेलनी पडी?” खानाने एकदम मुद्द्यालाच हात घातला.

“सरदार… मुझे इसकी सिर्फ एक वजह दिखती है… हमारी फौज सिर्फ एक तरफ थी…” काहीसे बिचकत करीमखान उत्तरला.

“बराबर…! लेकीन आज हम वो गलती नही करेंगे… आज शामतक किलेपर अपना चांदसितारा फडकेगा…” खान आढ्यतेने म्हणाला आणि सगळ्यांनी त्याच्या सुरात सूर मिसळला.

“करीमखान… तुम चारसौ लोग लेकर सामनेसे जाओगे… दौलतखान… तुम पाचसौ लोग लेकर पिछेसे हमला करोगे… देशमुख… तुम जंगलकी तरफसे पाचसौ सिपाई लेकर हमला करोगे और नाईक पाचसौ सिपाई लेकर जंगलकी दुसरी तरफसे हमला करेगा… एक बात सबको याद रखनी है… हर एक सिपाई दो तीन गज की दुरी बनाकर ही आगे बढेंगे.” खानाने आपली योजना सांगितली.

“बहोत बढीया सरदार… आज शाम या तो किलेदार आपके सामने होगा या उसका सर…” करीमखान म्हणाला आणि बाहेर पडला. त्याच बरोबर इतर सर्वजण देखील बाहेर पडले.

किल्ल्याच्या तटावरून पाहणी करणाऱ्या किल्लेदाराला आज खानाच्या फौजेमध्ये जरा जास्तच हालचाल दिसत होती. त्याचाच अर्थ आजच पुन्हा आपल्यावर आक्रमण होणार हे त्याने ओळखले. पण एक गोष्ट मात्र त्याला विचार करायला भाग पाडत होती. आणि ती म्हणजे त्याला कोणत्याही बाजूला खानाची फौज एकवटलेली दिसत नव्हती. याचाच अर्थ खानाने यावेळेस आक्रमण करण्यासाठी नवीन योजना आखली होती. एकाएकी त्याच्या मनात विचार आला. नक्कीच आपल्या किल्ल्यावर चहुबाजूने हल्ला करण्याचा खानाचा विचार असणार. पाहता पाहता किल्लेदार गंभीर झाला. कारण मोठ्या संख्येने जर चहुबाजूने आक्रमण झाले तर मात्र आपला निभाव लागणे कठीण आहे हे त्याने जाणले.

काही वेळातच मुगल सैन्याने चारही बाजूंनी डोंगर चढायला सुरुवात केली. यावेळेस सैन्य जास्तच होते, तसेच ते विखुरलेले होते. प्रत्येक सैनिक हा एकमेकांपासून बरेच अंतर राखून वर चढत होता. आता जर किल्ल्यावरून दगड लोटले तरीही ते चुकवणे त्यांना शक्य होणार होते आणि हाच सगळ्यात मोठा धोका किल्लेदाराने ओळखला.

गनीम तर अगदी तयारीने पुढे येत होता. परत एकदा अल्लाहू अकबरचा स्वर गगन भेदत जवळजवळ येत होता. यावर काहीतरी उपाय लवकरात लवकर करणे किल्लेदाराला गरजेचे होते आणि त्याचे डोळे चमकले. त्याने लगेचच आपल्या लोकांना आवाज दिला. अनेक उमदे तरुण त्याच्यापुढे हजर झाले.

“जी किल्लेदार…!” त्यातील एकाने आदबीने विचारले.

“आपले पोरं हाय नव्हं, त्यास्नी बोलवा.” किल्लेदाराने आज्ञा केली आणि काही वेळातच सगळे पोरं किल्लेदारासमोर हजर झाले.

“काय रे पोरांनो… आपल्या राज्यासाठी लढनार ना?” काहीसे हसत त्याने विचारले आणि सगळ्यांनी एकमुखाने होकार दिला.

“मंग आता असं करायचं. तुमची ती पाखरं मारायची गलोरी हाय नव्हं. ती घ्यायची आन या येनाऱ्या गनिमावर तानायची. एकेकाला टिपायचा. जवर त्यो कोसळत नाई तवर त्याला सोडायचं नाई… काय?” किल्लेदाराने आज्ञा दिली आणि पोरांना आनंद झाला. आज खऱ्या अर्थाने ते स्वराज्यासाठी, आपल्या संभाजी राजांसाठी प्रत्यक्ष युद्धात भाग घेणार होते.

“आन हा… ज्या कुनाला गोफन चालविता येते त्यांनी बी या पोरास्नी मदत करायची. ध्यानात ठिवा… येक बी मानुस नाय सुटला पायजेल.” किल्लेदाराने हुकुम सोडला. मुलांच्या बरोबरीने बायकाही युद्धात सामील झाल्या. सगळेजण किल्ल्याच्या चहूबाजूंनी तटावर आले आणि गोफण फिरायला सुरुवात झाली.

गनीम बराच पुढे आला होता. आपल्या माराच्या टप्यात येताच गलोरीतून एक छोटा दगड सुटला. एक सैनिक वर पहात पुढे येत होता. तो बरोबर त्याच्या नाकावर बसला. त्या छोट्याश्या दगडाला इतका वेग आलेला होता की त्या सैनिकाचे नाक फुटले. वेदनेने विव्हळत तो खाली वाकला आणि त्याचा तोल गेला तसा तो खाली कोसळला. बाकी सगळे काम उताराने चोख बजावले. दगडांवर ठेचकाळत जो जेव्हा थांबला तेंव्हा त्याच्या शरीरातून प्राण कधीच निघून गेले होते.

“हंग अस्सं… भले शाब्बास…!!!” किल्लेदाराने त्या मुलाला शाब्बासकी दिली आणि त्या चिमुरड्याची छाती अभिमानाने फुगली. हळूहळू गोफणीतून एकेक दगड सुटू लागला आणि वर येणारा एकेक जण खाली कोसळू लागला.

खान आपल्या काही निवडक लोकांसह चहुबाजूने आपल्या फौजेवर नजर ठेवण्यासाठी फिरत होता. जसजशी त्याची माणसे एकेक करून कोसळू लागली, तो पुरता चवताळला. या वेळेस वरून एकही मोठा दगड गडगडला नव्हता. आणि तरीही एकेक जण टिपला जात होता. आता मात्र डोंगर चढणाऱ्या सैनिकांचा धीर हळूहळू सुटत चालला. आपल्या बरोबर असलेला माणूस फक्त ओरडतो आणि कोसळतो इतकेच त्यांना दिसत होते. ना त्यांच्यावर एखाद्या शस्त्राचा वार ना रक्ताचे पाट. आणि तरीही एकेक करून वर चढणारे सैन्य कमी कमी होत होते. या वेळीही कित्येक जण किल्ल्याच्या अर्ध्या डोंगरावरच जायबंदी झाले. आता मात्र जीव वाचवायचा तर माघार घेणेच जास्त गरजेचे होते. माघारी पळून जाण्याशिवाय त्यांना पर्याय होताच कुठे?

आपले सैन्य माघार घेते आहे हे काही वेळातच करीमखानाच्या लक्षात आले. परत फिरणे म्हणजे स्वतःचा मान कमी करून घेणे होते. त्याने आपल्या घोड्याला टाच दिली आणि तो सगळ्यात पुढे झाला. वरून होणारा दगडांचा मारा बिलकुल कमी होत नव्हता. पण करीमखानाला मात्र आता कशाचीच फिकीर नव्हती. त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती, आणि ती म्हणजे कसेही करून किल्ल्यावर विजय मिळवायचा. त्याच्या पाठोपाठ पन्नास एक जणांनी आपले घोडे भरधाव फेकले. किल्लेदार हे सगळेच ताटावरून पहात होता. काही वेळासाठी त्याचे मन कचरले. जर यातील एकही जण किल्ल्याजवळ पोहोचला तर मुगल सैन्याचे मनोबल वाढणार होते. किल्ल्यावरून होणारा दगडांचा मारा अंगावर झेलत खान पुढे झाला आणि इथेच त्याने चूक केली. परत एकदा किल्ल्यावरून एक मोठी शिळा त्याच्या रोखाने गडगडत आली. करीमखानाच्या घोड्याने वेग घेतला असल्यामुळे ती चुकवणे त्याला शक्य होऊ शकले नाही आणि त्याचा तोल गेला. तो खाली पडतो न पडतो तोच आणखी एक दगड गडगडत आला आणि त्याच्या खाली करीमखान चिरडला गेला. आपल्या डोळ्यादेखत आपला सेनानायक पडलेला पाहून खानाच्या मागे असलेल्या सैनिकांचे धैर्य संपले.

“या खुदा…” करत एकेकाने आपले घोडे मागे फिरविण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत अनेक दगड आपले काम चोख बजाऊन गेले होते. जी गत करीमखानाची झाली होती काहीशी तशीच गत इतर बाजूंनी चाल करण्यासाठी गेलेल्या मुगल सैन्याची झाली होती. नाईक जायबंदी झाला होता, देशमुख दगडाखाली चिरडला गेला होता आणि दौलतखानाने पूर्णतः माघार घेतली होती. किल्ल्यावर चढाईसाठी गेलेली दोन हजाराची फौज देखील कुचकामी ठरली होती.

खान आपल्या तंबूत फक्त येरझाऱ्या घालत होता. त्याला आजही कोणतीच बढत मिळाली नव्हती. जवळपास सहाशे सैनिक कामी आले होते. पाचएकशे सैनिक गंभीर जखमी झाले होते. करीमखानाबरोबर गेलेल्या घोडदलापैकी एकही जण जिंवत परत आला नाही. दौलतखानाने वेळीच माघार घेतल्यामुळे त्याच्या बरोबर गेलेल्या सैन्याची मात्र जास्त हानी झाली नव्हती. आणि आजही किल्ल्यावरील एकही इसम साधा जखमीही झालेला नव्हता. याआधीही खानाला हा किल्ला घेता आला नव्हता आणि याही वेळेस त्याची गत पूर्वीसारखीच होती. त्यावेळेस किल्लेदार वेगळा होता, या वेळेस वेगळा. पण परिणाम मात्र एकच होता. खान पूर्ण हट्टाला पेटला. रोज खानाचे लोक किल्ल्यावर चढाई करण्यासाठी जात आणि त्यातील बरेचसे कमी होऊन माघारी येत. जवळपास दोन महिने हेच चालू होते. आता तर किल्ल्यावर मोठमोठ्याने होणारा शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा जयजयकार खानाच्या सवयीचा एक भाग झाला होता. दोन महिने प्रयत्न करूनही जेव्हा किल्ला हाती येत नाही याची खानाला खात्री झाली त्यावेळेस त्याने शेवटचा पर्याय वापरण्याचा विचार केला. हा पर्याय होता तोफांचा वापर.

क्रमशः- झुंज भाग ५

मिलिंद जोशी, नाशिक…

झुंज भाग १

झुंज भाग 4

झुंज भाग 6

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here