हुकलेले होकायंत्र !

By Discover Maharashtra Views: 2472 3 Min Read

हुकलेले होकायंत्र ! देवाचे गोठणे –

पेशव्यांचे गुरु श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले. त्यांना श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी हे गाव इनाम म्हणून दिले होते. राजाश्रय प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मेंद्रस्वामींनी या गावात असलेल्या श्रीगोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात एक आगळीवेगळी परशुरामाची मूर्ती स्थापन केली. अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. डाव्या हाताच्या घडीत परशु खोचलेला दिसतो. परशुरामाची अशी मूर्ती अन्यत्र कुठे दिसत नाही. मंदिराचे पुजारी म्हणून पेशव्यांनी गणेश केशव आपटे यांना सनद देऊन त्यांची नेमणूक केली. धावडशी संस्थानामार्फत एक कमिटी नेमली असून देवालयाची व्यवस्था पाहिली जाते. राजापूर तालुक्यात दोन गोठणे नावाची गावे आहेत. एक आहे ‘दोनिवडे गोठणे’ आणि दुसरे हे, जिथे देवाची मंदिरे आहेत ते ‘देवाचे गोठणे !’ देवळाचा प्राकार फरसबंदी असून बकुळीच्या फुलांचा सडा इथे पडलेला असतो. मंदिराच्या भिंतीवर गंडभेरुंड या काल्पनिक पक्षाचे सुंदर शिल्प पाहायला मिळते. इथल्या दीपमाळेचा आकार अगदी वेगळा असून मंदिराच्या दारातच पोर्तुगीज घंटा टांगलेली पाहायला मिळते.(हुकलेले होकायंत्र !)

समस्त आपटे मंडळींचे हे मूळ गाव असल्याचे समजते. मंदिराच्या मागे असलेल्या दगडी मार्गाने माथ्यावर गेले की एक अप्रतिम कातळशिल्प आवर्जून पाहण्याजोगे आहे……………

इथल्या खडकामध्ये चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे होकायंत्र ठेवले असता ते चुकीची दिशा दाखवते. हे इथले अजून एक निसर्गनवल होय.

कोकणात मुख्यत्वे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कातळखोद शिल्पे आढळू लागली आहेत. डेक्कन कॉलेजचे डॉ. Shriikant Pradhaan यांनी या कातळखोदचित्रांचा शास्त्रोक्त अभ्यास करून त्याचा उद्देश आणि कालावधी शोधण्यात मोलाचे कार्य केलेले आहे. तसेच  विविध व्यक्तींचे या शोधकार्यत योगदान लाभलेले आहे. गेल्या काही दिवसात श्री सुधीर रिसबूड ( Bhai Risbud )आणि श्री Dhananjay Manoj Marathe यांनी अजून काही नवीन ठिकाणे उजेडात आणली. स्थानिकांच्या सहभागातून हा ठेवा जतन करण्याचे आणि सरकार दरबारी प्रयत्न करून या बहुमोल ठेव्याचे संवर्धन करण्याचे मोठे काम हाती घेतले आहे. असेच एक आश्चर्यकारक कातळ शिल्प देवाचे गोठणे गावच्या सड्यावर आहे. इथे एका झोपलेल्या माणसाची आकृती कोरलेली असून त्याच्या पोटावर जर होकायंत्र नेले तर त्याची सुई चक्क गंडते. ती वाट्टेल ती उत्तरदिशा दाखवू लागते. या दगडात चुंबकीय क्षेत्र प्रबळ असल्यामुळे होकायंत्राच्या सुईचे हे असे डिफ्लेशन होते असे तज्ञ सांगतात. एका विशिष्ट ठिकाणीच ह्या सुईचे डिफ्लेशन होते. जरा दुसरीकडे होकायंत्र नेले तर ते योग्य दिशा दाखवते. कोकणप्रांत हा खरोखर निसर्ग नवलांनी पुरेपूर भरलेला आहे. देवाचे गोठणे गावचे हे प्रकरण त्याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल. !!!

राजापूर-सोलगाव मार्गे इथले अंतर २५ कि.मी. आहे. वर्षाचे बाराही महिने हिरवेगार असलेले निसर्गरम्य असे हे गाव आणि इथले मंदिर मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे.

© आशुतोष बापट

Leave a comment