कुंकूमदाणी | सिंदूरदाणी –
कुंकू… हा हळदीचे चूर्ण करून त्यापासून तयार करण्यात येणारा एक पदार्थ आहे. याचा रंग लाल असतो. याचा वापर देवपूजेत तसेच कपाळावर लावण्यासाठी होतो. कुंकू हे एक सौभाग्यचिन्ह आणि सौंदर्यप्रसाधनाचे साधन म्हणूनही वापरले जाते. कुंकू कोरडे असल्यास त्यास पिंजर म्हणतात. कुंकू ओले असल्यास त्यास गंध म्हणतात. असे कुंकवाचे दोन प्रकार आहेत. सुवासिक कुंकूही वापरात असते. सुहासिनी कपाळाला सौभ्याग्याची ओळख म्हणून लावतात.(कुंकूमदाणी | सिंदूरदाणी)
रामायणात कुंकवाचा उल्लेख येतो, तो असा: वनवासातील राम-सीतेचा चित्रकूटमध्ये प्रवेश झाला तेव्हा सीतेचे स्वागत अनुसूयेने कुंकू लावून केले होते. कुंकुमतिलकाची प्रथा महाभारत काळापासून अस्तित्वात आली असल्याचे उल्लेख सापडतात. महाभारतात द्रौपदीच्या सोळा शृंगारामध्ये कुंकू लावण्याचे, तसेच कृष्णाची सखी राधा हीचे कपाळावर कुंकू रेखाटत असल्याचे उल्लेख आहेत. मोहंजदारो-हडाप्पाच्या उत्खननात मिळालेल्या स्त्री प्रतिमांच्या कपाळावर कुंकू तर भांगामध्ये सिंदूर दिसतो. भारतीय संस्कृतीने कुंकवाला सौभाग्य अलंकाराचा दर्जा दिला आहे. नवऱ्याला कुंकू म्हणण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. विवाहाच्या निमंत्रणपत्रिकांना कुंकवाचे बोट लावण्याची, त्यावर कुंकवाच्या पाण्याचा शिडकावा करण्याची प्रथा आहे. कुंकवाचे उल्लेख वाङ्मयात साधारणपणे तिसऱ्या, चौथ्या शतकापासून दिसू लागतात. रघुवंशात, भर्तृहरीच्या शृंगारशतकात व अमरुशतकात कुंकुमतिलकाचा उल्लेख आढळतो. स्त्रियांच्या कपाळी कुंकू तिसऱ्या-चौथ्या शतकात रंगवलेल्या अजिंठ्याच्या स्त्री-चित्रांमधूनही क्वचित दिसते.
कुंकुमतिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू प्रिय असल्याचे उल्लेख विपुल आहेत. दुर्गापूजेतही कुंकवाचे अधिक्य असते; सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय आहे. हिंदू स्त्रिया नवे वस्त्र वापरायला काढताना त्याला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीने सुवासिनीला लावायचे असते. लग्नप्रसंगी कित्येक जातींत वधू-वराच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. तर लग्न झाल्यावर कुंकवाची आडवी चिरी लावतात. कित्येक स्त्रिया कुंकू अर्धचंद्राकृती लावतात तर काही स्त्रिया कुंकू चंद्रबिंबासारखे वाटोळे लावतात. करमाळा तालुक्यातील केम गाव कुंकवासाठी प्रसिध्द आहे. केमच कुंकूवाला २५० वर्षाची परंपरा आहे. (सदर माहिती विकेक साप्ताहिक वरुन )
अस मानल जात की लग्ना नंतर सासरच्या परिवाराची जबाबदारी वाढल्याने मानसिक तणाव झोपेची कमतरता त्या मुळे डोक्यावर येणारा ताण यांना संतुलित करण्याच काम हे काम कुंकू सिंदुर करतो. ज्या डोक्याच्या भागात महिला कुंकू लावतात त्या भागातील ब्रम्हग्रंथी ला नियंत्रित करण्याच काम शुध्द कुंकवातील घटक करतात. अस हे महत्वपुर्ण कुंकू ,सिंदुर ठेवायलापण करांडे असत. सोन्या चांदी पासून ते लाकडा पासून बनवलेले कलाकुसर युक्त करांडे बनवले जातात.
माझ्या संग्रहातील असलेली सिंदूरदाणी ही पितळेची कलाकुसरयुक्त असून आडकावयाची दांडी मकरमुखी असून त्यातील एका वाटीत सिंदूर तर दुस-या बाजूला लहान आरसा बसवला आहे. यातील सिंदूर माथ्यावर लावण्यासाठी या आरशात पाहून लावत असे. या वरील दोन सुंदर राघू लक्ष वेधक आहेत.
संतोष मु चंदने, चिंचवड