विठ्ठल मंदिर पळशी, ता. पारनेर

विठ्ठल मंदिर, पळशी, ता. पारनेर

विठ्ठल मंदिर पळशी, ता. पारनेर

एखाद्या गावाचा एक समृद्ध असा इतिहास असावा आणि गाव ऐतिहासिक वास्तुस्थापत्यासाठी ओळखले जावे अशी फार मोजकी गावे या महाराष्ट्रात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी हे असेच एक गाव. पळशी हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा आणि मंदिराची उभारणी केली.विठ्ठल मंदिर पळशी.

पळशीचे विठ्ठल राही रखुमाई मंदिर म्हणजे पळशी चे सर्वात मोठे आकर्षण. हे मंदिर भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. मंदिराला सुरेख असे प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो. तसेच मंदिराला चहुबाजूंनी तटबंदीसदृश बांधकामही दिसते. मंदिर नागर शैलीतील असून मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. मंदिर विलक्षण प्रेक्षणीय आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिरांच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्पे कोरलेली दिसतात.

मंदिराचा सभामंडप हा १८ दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोनही बाजुंना रिध्दी-सिध्दी सहित गणपती व भैरवमुर्ती आहेत. दरवाजावर ६४ योगिनी आहेत. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती शाळीग्राम शिळेत घडवलेली दिसते. विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या आहेत. विठ्ठलाच्या मुर्तीच्या प्रभावळीवर भगवान विष्णूचे दशावतार कोरलेले आहे. डोक्यावर शिवलिंग कोरलेले असून पायाजवळ सवत्स धेनु, गोपाळ आहेत. ही मूर्ती कृष्णरूपातील विठ्ठलाची आहे असे अभ्यासकांचे मत आहे.

मंदिराच्या प्रांगणात उजवीकडे गेल्यावर गरुडध्वज दिसतो. सभा मंडपाच्या आतील बाजूस श्रीकृष्ण व गौळणीच्या रासविहाराच्या दगडीमुर्ती आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी दगडी कासव आहे. मंदिराच्या बाहेर छोटीशी पुष्कर्णीही दिसते. या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्याही केलेल्या दिसतात. यातील देवकोष्ठकात शेषशायी विष्णू, गणपती व इतर काही मूर्त्या दिसून येतात. एकंदरीतच हे मंदिर पळशी भेटीतील सर्वोच्च बिंदू ठरते. खूप कमी गावांना असे वैभव वारशातून मिळाले आहे. पळशी हे देखणे गाव त्यामुळे भाग्यशाली आहे. आपणही या दुर्लक्षित भागास एकदा नक्की भेट द्या.

Rohan Gadekar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here