ऐतिहासिक पळशी गाव

ऐतिहासिक पळशी गाव | काशीविश्वेश्वर मंदिर, पळशी

ऐतिहासिक पळशी गाव –

ऐतिहासिक ऋणानुबंधाचे लेणं शिरावर अभिमानान बाळगणार गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी गाव होय. दुर्गम भागात पठारावर वसलेल्या या गावी नगर- कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वरपासून उत्तरेला वासुंदे – खडकवाडी फाटा – खडकवाडी मार्गे २० कि.मी. अंतर कापत आपण दुर्लक्षित अशा #पळशी गावात आपणास पोहोचता येते. मला व पत्नी स्वातीला जुन्नरहुन या गावी भेट देण्याचा योग जुळून आला. हे गाव दुर्गम भागात जरी असले तरी या गावातील ऐतिहासिक, स्थापत्यकला वैभव, कलाकृती ने तर पळशीगाव आजच्या संगणकीय युगातपण वैभवाच्या परमोच्च शिखरावर पहावयास मिळते. आणि ते शिखर म्हणजे येथील असलेली अप्रतिम कलाकृतीने समृद्ध असलेले पळशी गावचे विठठल मंदिर, महादेव मंदिर, वाडा व इतर बरेच काही होय.

रस्त्यावर डाव्या हाताला एक भव्यदिव्य आयताकृती तटबंदी प्रथमतःच लक्ष वेधून घेते व आपल्या हातातील वाहने डाविखडे वळली जातात. दगडात बांधकाम असलेल्या तटबंदीच्या उत्तरेकडील दरवाजा पाहताच सर्वच क्षिण नाहीसा होतो. या तटबंदीच्या चारही दिशांना दरवाजे असुन उत्तर व पूर्व दरवाजातुन चारचाकी आतमध्ये जातात. याच तटबंदीच्या आत संपूर्ण गाव वसलेले असून संपूर्ण तटबंदीने गावाला सुरक्षा प्रदान केली आहे. तटबंदीच्या आतमध्ये काशी विश्वेश्वर मंदिर व गजगौरी मातेचे अशी उत्कृष्ट बांधकाम शैलितील ऐतिहासिक मंदिरे पहावयास मिळतात व काशी विश्वेश्वर मंदिराच्या जवळच दक्षिणेकडील वाडा खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. वाड्यात कुटुंब राहत असून वाड्यातील लाकडी कलाकुसरीचे नक्षिकाम पाहून आपण थक्क होतो.

वाड्याची तटबंदी भक्कम व टोलेजंग असुन विटेत व दगडात बांधकाम केले आहे. गाव तटबंदीची पश्र्चिम भींतीला एक छोटाखानी दरवाजा असून आपणास येथून गावात पायी प्रवेश करता येतो तर दक्षिणेला असलेल्या दरवाजातून दुचाकीने प्रवेश करता येतो. या दरवाजाच्या आत आपणास तीन विरघळींचे दर्शन घडते व जवळपास दोनशे तीनशे वर्षांपूर्वीच्या चिंचेच्या वृक्षाखाली या विरघळी व हा दरवाजा विसावलेला आपणास पहावयास मिळतो. तटबंदीच्या उत्तरेकडील, पश्र्चिमेकडील व दक्षिणेकडील अर्ध्या भागात जास्तीत जास्त घरे असुन पुर्वेकडील जवळपास सर्वच भाग व दक्षिणेकडील अर्धा भाग ओसाड पडलेला असल्यामुळे गवत व खुरटी झुडपे आढळतात. गावातील जागोजागी पडझड झालेले व जीर्ण झालेली घरे व वाडे पहावयास मिळतात.

वाडा पाहून झाल्यावर आपण गाव तटबंदी असलेल्या पुर्व दरवाजातून बाहेर पडावे. उजविकडील कच्च्या रस्त्याने दक्षिणेस असलेल्या डांबरी रस्तावर डाविकडे वळण घ्यावे. ओढा ओलांडून चढाई संपताच उजवीकडे वळण घेत ऐतिहासिक विठ्ठल मंदिराच्या आवारात आपली वाहने पार्क करावी. येथील जुना चिंचेचा वृक्ष आपले लक्ष वेधून घेतो. समोरच तटबंदीत मंदिरात प्रवेश करणारा दरवाजा निदर्शनास पडतो. दरवाजा च्या दोन्ही बाजूला दगडी वट्टे पहावयास मिळतात. उजविकडील बाजूला एक भंगलेला नंदी व पिंडी दिसून येते. येथेच शेजारी आठ कोणाडे असलेली पुष्करणी पहावयास मिळते व या आठ कोणाड्यांत आठ दगडी शिल्पे पहावयास मिळतात. सध्या पुषकरणीत उतरण्यासाठी चारही बाजूंनी जाळी लावण्यात आल्यामुळे प्रवेश बंद केला आहे.

सांगितले जातय कि या विठठल मंदिराची स्थापना शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या लुटीतील काही रक्कम वापरली असल्याची माहिती पळशी गावचे मुळ वतनदार रामराव पळशीकर यांचे कागदपत्रावरुन समजते. आता यात कितपत तथ्य आहे आहे माहित नाही परंतु पळशी गावचे मुळ वतनदार रामराम पळशीकर यांचे चिरंजीव आनंदराव रामराव पळशीकर हे पेशव्यांकडे सुभेदार होते. असे सांगण्यात येते की, पानिपतचे तिसरे युध्दात (१७६१) त्यांनी विशेष पराक्रम गाजविला व आनंदराव पळशीकर सरसेनापती झाले. सुरतेची लूट उंटावरुन वाहून नेली जात असताना पळशी मुक्कामी विदवान जनांच्या सभेत या लुटीतील काही द्रव्य पळशीच्या विकासासाठी वापरण्याच्या बेत केला. त्यानुसार पळशी गावांभोवती चोहोबाजुंनी भरभक्कम तटबंदी व गावच्या आग्रेयेस श्री विठठल मंदिर बांधले.

विठठल मंदिर बांधण्यासाठी उत्तर हिंदूस्थानातील कलावंताना पाचारण करुन त्यांचेकडून अप्रतिम अशी दगडी नक्षीकाम युक्त मंदिराची उभारणी करण्यात आली. या दगडी नक्षीकामाच सौदर्य शब्दांकित करता येणे अशक्य.  मंदिराच्या महाव्दारावर गणपती, सरस्वती ही दैवते, महाव्दाराच्या चोहोबाजूस, जय, विजय,  सुरया व नक्षीकाम आहे. नगार खाण्याचे रंगकाम व नक्षीकाम खास मुस्लिम पध्दतीत आहे. या विठठल मंदिरात, विठठल – रुक्मीणी व राही या तिघांचे एकत्रित मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त पळशीलाच आहे. हे आगळे वेगळे वैशिष्टय. सभा मंडपाच्या तीन बाजूंनी नऊ पायऱ्या नव विद्या भक्तीची प्रतिक. सभा मंडपात अठरा स्तंभ जे नउ फुट उंचीचे या स्तभांवरील कोरीव काम अप्रतिम देखणे मनात भरणार. हे अठरा खांब अठरा पुराणाचे प्रतिनिधीक स्वरुप. सभा मंडपाच्या मध्यमागी दगडी कासव आहे. कासवाच्या पाठीवर उभे राहून कर्मदृष्टीने विठठलाचे दर्शन होते. सभा मंडपाचे वरच्या भागाच्या सव्वाटन वजनाची काशाची घंटा आपली नजर वेधते.

सभा मंडपाच्या आतील बाजूस श्रीकृष्ण व गौळणीच्या रासविहाराच्या दगडीमुर्ती आहेत. श्रीकृष्ण हिंदूस्थानी कलाकारांच्या हस्त कौशल्याची उत्कृष्ट शैली आहे. वास्तु शास्त्राचा उत्कृष्ट नमुना येथे पाहावयास मिळतो. सभा मंडपातील हरणांच्या वानराच्या कोरीव मुर्ती रेखाटतानां उत्तर हिंदूस्थानी कलाकरांनी जीव ओतून काम केल्याचे दिसते. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोनही बाजुंना रिध्दी – सिध्दी सहित गणपती व भैरवमुर्ती आहेत. दरवाजावर ६४ योगिनी आहेत. उंबऱ्यावर दोन किर्तीमुखे आहेत. गाभाऱ्यात पांडुरंगाची शाळीग्राम शिळेची मुर्ती आहे. मुर्तीच्या दोन्ही बाजुना राही, रुक्मीणीच्या संगमरवरी मुर्ती आहेत. पांडुरंगाच्या मुर्तीच्या प्रभावळीवर मच्छ व कच्छादी दशावतार कोरलेले आहे. डोक्यावर शिवलिंग कोरलेले असून पायाजवळ सवत्स धेनु, गोपाळ आहेत. मुर्तीच्या सिंहासनावर नारद तुंबर, गंधर्व, यक्ष, किन्नर, आदिंच्या कोरीव मुर्ती आहेत. मंदिराच्या शिखरावर आतील बाजुस व कोरीव कलाकसुरीची कोरीव कामे आहेत. त्यावरुन नजर दूर जात नाही.

मंदिरात असणाऱ्या ओहारीतील नक्षीकाम अप्रतिम असून भूमितिय श्रेणीत केलेले काम असून प्रत्येक ओहोरीत वेगळ शिल्प, मंदिरा भोवती असणारी भक्कम तटबंदी मंदिराच्या प्रवेशव्दारा वरील असणारे दुसऱ्या मजल्यावरील कोरीव नक्षी कुठेही पहावयास मिळत नाही. मंदिराच्या आवारात उत्तरेला असणाऱ्या हौदात १९७२ सालीही पाणी आटले नव्हते. मुख्य मंदिराच्या शेजारी रामेश्वर मंदिर, व घाट तसेच घाटावर असणारी सतीची मंदिर ही आगळी वेगळी वैशिष्टे येथे पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारातूनच पुर्व व उत्तर कोपऱ्यातून एक दहा पाय-या खाली उतरत गेले की आपण पुष्करणीत प्रवेश करतो. मंदिर उत्तरमुखी असुन समोरच एक तटबंदी भिंत असुन यामध्ये एक दरवाजा आपणास सटवाई मंदिराच्या आवारात घेऊन जातो. संपूर्ण मंदिराला जवळपास १५ /२० फुट उंचीची तटबंदी बांधलेली असून ती मंदिराची सुरक्षा रक्षक अनेक वर्षे उन वारा पाऊस झेलून सुध्दा सुव्यवस्थित आहे. मंदिर ओढ्याच्या त्रिवेणी संगमावर वसलेले असून.हा ओढा मंदिराच्या उत्तरेकडुन वाहताना दिसतो. मंदिराच्या पश्चिमेस ओढ्याच्या उत्तर किना-यावर ऐतिहासिक महादेव मंदिर व गणेशमंदिर पहावयास मिळते. तर याच मंदिराच्या पुर्वेस कुण्या दोन थोर व्यक्तींच्या समाध्या बांधलेल्या निदर्शनास पडतात.

हा संपूर्ण परिसर पहायचे म्हटले तर एक संपूर्ण दिवस हवा. सध्या तरी संपूर्ण भाग दुर्लक्षित जरी असला तरी भविष्यात मात्र अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ म्हणून झपाट्याने विकसित झालेला पाहायला आवडेल. निश्चितच येथील हजारो स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथील वास्तुंचे संवर्धन, जतन व तसाच प्रसार होणे गरजेचे आहे. याबाबत स्थानिकांनी लक्ष देणे फार गरजेचे आहे.

हा परीसर फिरताना जेवढं शक्य आहे तेवढा पाहण्याचा प्रयत्न केला व जसे शक्य आहे तेवढे लिहीण्याचा व छायाचित्र टिपण्याचा व आपल्या वाचणास व पाहण्यासाठी उपलब्ध करून देत आहे. लिहीताना काही त्रुटी झाल्या असतील तर नक्कीच आपण माफ कराल ही सदिच्छा व्यक्त करतो. आपणही या दुर्लक्ष भागास एकदा जरूर भेट द्या.

लेख/छायाचित्र – रमेश खरमाळे
माजी सैनिक खोडद (जुन्नर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here