पुण्यातील आगळेवेगळे गणपती

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 1
4 Min Read

पुण्यातील आगळेवेगळे गणपती

पुणे म्हटले की डोळ्यांसमोर येतात ते गणेशोत्सवातील ढोल-ताशे, मंडप, मिरवणुका आणि मानाचे गणपती. पण या उत्सवाच्या गजबजाटामागे पुण्याच्या विविध पेठांमध्ये आणि जुन्या वाड्यांच्या परिसरात गणेशाच्या प्रतिमेची एक वेगळीच परंपरा जपली गेली आहे.
कुठे शंभर वर्षांपूर्वीची लाकडी मूर्ती आहे, कुठे कागदी लगद्यापासून घडवलेला गणपती; कुठे मल्लाच्या रूपातील गणेश आहे, तर कुठे हनुमानाच्या रूपातील. कुठे दहा हातांत विविध आयुधे आहेत, तर कुठे तीन राक्षसांचा एकाच वेळी संहार करणारी कल्पना आहे. काही मूर्तींच्या रूपात तत्कालीन समाजजीवनाची झलकही दिसते.

मुझुमदार वाड्याचा गणपती
कसबा पेठेतील मुझुमदार या पेशवेकालीन वाड्यातील गणेशोत्सवाची परंपरा इ.स. १७१४ पासून सुरू असल्याचे सांगितले जाते. येथे पंचधातूची दशभुज वल्लभेष गणेशमूर्ती असून देवी वल्लभा गणपतीच्या मांडीवर विराजमान आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाड्यातील गणेशमहालात कीर्तन, सनईवादन आणि संगीताच्या मैफलींची परंपराही जपली जाते.

श्री पुण्येश्वर मंडळ
कुंभारवेस चौक येथील ही चतुर्भुज गणेशमूर्ती विशेष आहे. हनुमानाच्या रूपातील या गणपतीची डावी सोंड डावीकडे असून, छाती फाडल्यावर शंकर-पार्वतीचे दर्शन घडविणारी कल्पना या प्रतिमेत पाहायला मिळते.

त्वष्टा कासार समाज मंडळ
पवळे चौक येथील हि गणेशमूर्ती सुमारे १२० वर्षांपूर्वी शमी वृक्षाच्या लाकडापासून साकारण्यात आली आहे. डावीकडे वक्राकार वळलेली सोंड हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य.

संग्राम दशभुजा गणपती मंडळ
कागदीपुरा, मंगळवार पेठ येथील हि मूर्ती दहा हातांची आहे. चक्र, धनुष्य, त्रिशूळ, तलवार, बाण, परशू आणि गदा अशा विविध आयुधांनी सजलेली ही प्रतिमा गणेशाच्या शक्तिरूपाची कल्पना मांडते.

त्रिशुंड गणपती
सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती ही पुण्याच्या धार्मिक आणि शिल्पपरंपरेतील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा आहे. नावाप्रमाणेच तीन सोंड असलेली ही गणेशप्रतिमा पारंपरिक गणेशरूपाच्या चौकटीपलीकडील शिल्पकल्पना दाखवते.

तरवडे गणपती
खडीचे मैदान, सोमवार पेठ येथील मूर्तीची संकल्पना विलक्षण आहे. एकाच वेळी तीन राक्षसांचा संहार करणारा हा गणपती. ही मूर्ती भाऊसाहेब रंगारी यांनी सुमारे १३३ वर्षांपूर्वी कागदी लगद्यापासून घडविल्याचे सांगितले जाते.

डोके तालीम गणपती
डोके तालीमचा गणपती पारंपरिक देवप्रतिमेपेक्षा वेगळ्या देहबोलीत दिसतो. उभ्या, सशक्त आणि मानवी शरीरयष्टीच्या जवळ जाणाऱ्या या प्रतिमेत गणेशाच्या लोकप्रिय रूपाला व्यायामशाळा आणि तालीम संस्कृतीची जोड मिळते.

साखळीपीर तालीम
हिंद माता चौक, नाना पेठ येथील हस गणपती तर पुण्याच्या सामाजिक जीवनाशी थेट संवाद साधतो. कुर्ता आणि धोतर परिधान केलेला, हातात घड्याळ, अंगठी आणि खिशात पेन असलेला हा मल्ल-कार्यकर्त्याच्या रूपातील गणपती आहे

सराफ सुवर्णकार गणपती
मोती चौक, रविवार पेठ येथील ह्या चतुर्भुज गणेशमूर्तीच्या शेजारी ऋद्धी-सिद्धी आहेत. ही मूर्ती सुमारे १२५ वर्षांपूर्वी कागदी लगद्यापासून तयार करण्यात आली असल्याचे सांगितले जाते.

धर्मवीर संभाजी तरुण_मंडळ
धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचा श्रींचा संपूर्ण लाकडी गणपती विशेष उल्लेखास पात्र आहे. लाकडातून पूर्ण मूर्ती घडवण्याची परंपरा आजच्या फायबर, प्लास्टर किंवा इतर आधुनिक माध्यमांच्या काळात विशेष लक्षवेधी ठरते.

श्री दत्त तरुण मंडळ
येथे श्री गुरुदेव दत्त यांच्या रूपातील षड्भुज गणपतीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पाहायला मिळते. गणपतीच्या मागे कामधेनू, तर चरणांजवळ श्वान दाखवले आहेत. हातांमध्ये त्रिशूळ, कमंडलू आणि विविध आयुधे धारण केलेली ही मूर्ती गणेश आणि दत्तात्रेय या दोन्ही देवपरंपरांचा सुंदर कलात्मक संगम दर्शवते.

श्री पंचमुखी मारुती मंडळ
पंचमुखी मारुती मंडळाची गणेशप्रतिमा अनेक मुखांनी साकारलेली आहे. मध्यभागी गणेशाचे प्रमुख रूप आणि त्याभोवती विविध मुखांची रचना, ही प्रतिमा गणेशाच्या बहुरूपी संकल्पनेचे दर्शन घडवते.

शार्दुल मित्र मंडळ
या मंडळाची गणेशमूर्ती तिच्या बदलत्या वेशरूपांसाठी विशेष ओळखली जाते. उत्सवाच्या प्रत्येक दिवशी गणपतीला वेगवेगळ्या महापुरुषांच्या किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या वेशात सादर करण्याची कल्पना येथे पाहायला मिळते. त्यामुळे एकाच मूर्तीतून दररोज वेगळे रूप आणि वेगळा सांस्कृतिक संदर्भ उभा राहतो.

आठवणी इतिहासाच्या

Written By: आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment