पुण्याचे वेरूळ | श्री त्रिशुंड गणपती मंदिर !

By Discover Maharashtra Views: 1180 2 Min Read

पुण्याचे वेरूळ – श्री त्रिशुंड गणपती मंदिर !

पुणे हे देवळांचे शहर ! इथे लहान-मोठी, नवी-जुनी अशी शेकडो मंदिरे आहेत. या सा-या देवस्थानात एक मंदिर मात्र वेगळं आहे, त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे आहे सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर!

सोमवार पेठेत, कमला नेहरू हॉस्पिटल जवळ हे मंदिर आहे. हे मंदिर उंच इमारतींच्या गर्दीत हरवून गेल्याने ते लवकर सापडत नाही. एका उंच दगडी ओट्यावर सदर मंदिर उभारले आहे. मंदिराचं वेगळेपण म्हणजे त्याची बाह्य भिंत ! विविध शिल्पांनी ही बाह्य भिंत सजली आहे.

प्रवेशद्वाराच्या या भिंतीवर शेषशायी विष्णू, कृष्ण, विठ्ठल, गजलक्ष्मी, शिव अशा देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वारा शेजारील दोन द्वारपाल आणि कलात्मक कोनाडे लांबूनच लक्ष वेधून घेतात. हत्ती, माकड, पोपट, गेंडा असे पशुपक्षांचे अंकन केले आहे. जागोजागी कोरलेले यक्षांचे शिल्प हठयोग समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

प्रवेशद्वारातून आत शिरताच उजवीकडे तळघरात जायला पाय-या आहेत. हे प्रशस्त तळघर सतत पाण्याने भरलेलं असल्याने फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भक्तांसाठी खुले केले जाते. तळघरातील आतील खोलीत दत्तगुरु गोसावी यांची समाधी आहे.

हा सर्व परिसर पूर्वी गोसावीपुरा म्हणून ओळखला जात असे. सन १७५४ मध्ये श्री भिमगिरजी गोसावी यांनी या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. ते तब्बल १६ वर्ष चालू होतं. इथे आधी शंकराचे स्थान असावं असं म्हणतात. मंदिरावर राजस्थानी-माळवा वास्तूशैलीचा प्रभाव दिसतो.

मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर सभामंडप आहे. इथेही काही शिल्प कोरलेली आहेत. सभामंडपानंतर अंतराळ आहे. इथे काही शिल्पांसह दोन संस्कृत तर एक फार्सीत लिहिलेला शिलालेख आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री गणेशाची तीन सोंड असलेली दगडी मूर्ती आहे. या चतुर्भुज गणेशाच्या डाव्या मांडीवर ऋद्धी ची मूर्ती आहे.

© वारसा प्रसारक मंडळी.

Leave a comment