तिवऱ्याची गंगा

By Discover Maharashtra 5 Min Read

तिवऱ्याची गंगा –

पावसाळा संपून थंडीचे आगमन होताच भटक्यांचे पाय शिवशिवायला लागतात. कुठे जाऊ आणि कुठे नको असे होऊन जाते. सखा सह्याद्री साद घालत असतो. ऐन थंडीची चाहूल लागलेली असते आणि मग आपोआपच पाय सह्याद्रीकडे वळतात. किल्ले, घाटवाटा, गिरिस्थाने साद घालू लागतात. अगदीच काही नाही तरी सह्याद्रीच्या सहवासात नुसती केलेली भटकंतीपण मनाला तजेला देऊन जाते. यावेळीही असेच झाले. चिपळूणजवळ असलेल्या तिवरे गावात एक नवल आहे असा निरोप आला. जणू वाटच बघत होतो या क्षणाची. लगोलग चिपळूणकडे निघालो. परिचित रस्ता आणि परिचित डोंगर दिसू लागले. पाटण जवळचे दातेगड-गुणवंतगड, मग पुढे कुंभार्ली घाटातून दिसणारा जंगली जयगड. याच जंगली जयगडला वळसा घालून जायचे होते. घाट उतरल्यावर तसेच पुढे जाऊन चिपळूणच्या अलीकडे ६ कि.मी. वर उजवीकडे तिवरे गावचा फाटा आहे. इथून कळकवणे, दसपटी, दादर, आकले मार्गे रस्ता वळत वळत तिवरे गावी येऊन पोचतो. हे अंतर २० कि. मी. चे आहे. हाच रस्ता पुढे चोरवणे गावी जाऊन संपतो. चोरवणे नाव वाचून सुद्धा वासोटा आणि नागेश्वरची तीव्र आठवण झाली.तिवऱ्याची गंगा.

हा सगळा परिसर हिरवागार झालेला. कुंभार्ली घाटात समोर दिसणारा जंगली जयगड आता आपल्या उजवीकडे दिसत असतो. आपण सह्याद्रीच्या मुख्य धारेकडे जात असल्यामुळे आपल्या समोर पूर्वेला अजस्त्र सह्याद्री आणि त्याच्या कोकणात घुसलेल्या रांगा स्वागत करत असतात. तिवरे गाव सह्याद्रीच्या ऐन कुशीत वसलेले आहे. इथून पूर्वी तिवरे घाटाने बैलाच्या पाठीवरून वाहतूक चाले. कोयनेच्या खोऱ्यात असलेल्या माळदेव इथे याच वाटेने जाता यायचे. आता कोयना व्याघ्रप्रकल्प झाल्यामुळे घाटावरची ती गावेही उठली आणि हे घाटरस्ते बंद झाले. पण ऐन सह्याद्रीच्या कुशीत शिरणे म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर तिवरे इथे जायला हवे. आपल्या तीनही बाजूंनी उंचच उंच हिरवेगार डोंगर, त्यातून अजूनही काही धबधबे कोसळताना दिसतात. सह्याद्रीमधल्या अनगड घाटवाटा नजरेस पडतात. इतके सुंदर हे तिवरे गाव. गावची वस्ती बेताचीच. जेमतेम २०० उंबऱ्याचे हे गाव.

या तिवरे गावात एक निसर्ग नवल बघायला मिळाले. राजापूरला जशी अनपेक्षित आणि अनियमित काळानी गंगा येते, तशीच या तिवरे गावी सुद्धा गंगा येते. इथे गंगा येते म्हणजे काय तर त्रिपुरी पौर्णिमा झाली की याठिकाणी असलेला पाण्याचा प्रवाह दुधी रंगाचा होऊन वाहायला लागतो. पाण्याचा हा दुधी रंग जवळजवळ देवदिवाळी पर्यंत टिकतो. देवदिवाळीच्या दिवशी गंगेची पूजा होते आणि गंगा विसर्जित केली असे समजले जाते. देवदिवाळी नंतर परत पाणी पूर्वीसारखे पारदर्शक दिसू लागते. हे नवल अनियमित नसून दर तीन वर्षांनी घडत असते. यंदा इथे गंगा आली म्हणून सांगावा आला होता. परंतु आम्ही गेलो तेव्हा पाण्याचा दुधी रंग निवळत चालला होता. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार गेली अनेक वर्षे हे नवल घडत आहे. नियमित तीन वर्षांच्या कालावधी नंतर इथे गंगा येते.

याठिकाणी एक छोटेसे गंगेचे मंदिर बांधले असून त्यात एक फूट उंचीची मूर्ती आहे. ग्रामस्थ ह्याच मूर्तीची गंगा म्हणून पूजा करतात. पाण्याच्या प्रवाहाला दोन कुंडांमधे खेळवले आहे. एक कुंड आणि त्याच्या खालच्या अंगाला दोन कुंडे अशी इथे बांधीव कुंड दिसतात. दोन्ही कुंडांना गोमुखे केलेली असून त्यातून हे पाणी पुढे जाऊन मुख्य ओढ्याला जाऊन मिळते. भूशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी तसेच संशोधकांनी इथे अवश्य जावे. हे निसर्गनवल का होते याचे शास्त्रीय कारण लोकांसमोर यायला हवे. एक चांगली गोष्ट इथे जाणवली ती अशी की गावकरी सुद्धा याला चमत्कार मानत नाहीत. त्यांच्या मतेसुद्धा हे एक नवलच आहे. तीन वर्षांनी घडणारी ही घटना बघायला पंचक्रोशीतून माणसे येतात. इथल्या कुंडात स्नान करतात आणि तीर्थ म्हणून हे पाणी घेऊन जातात. स्वच्छ, सुंदर असे हे ठिकाण ऐन निसर्गात वसलेले असल्यामुळे इथून पाय हालत नाही. या गावात शिंदे आडनावाची मंडळी मोठ्या संख्येने आहेत. त्यातल्या काहींना तर आदिलशाही पासून इनाम मिळाल्याचे एका शाळामास्तरांनी सांगितले.

जवळच असलेले दसपटी हे गाव महत्वाचे. त्या गावातला जवळजवळ घरटी एक माणूस सैन्यात भरती झालेला आहे. शांत निवांत ठिकाण, चौफेर हिरवीगार वनश्री, आणि पाठीशी सह्याद्रीचे अजस्त्र कडे. अशी पार्श्वभूमी लाभलेल्या या आडवाटेच्या तिवरे गावाला अवश्य भेट द्यावी. तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा आता देवदिवाळीला परत जाईल. पण रांगडा सह्याद्री आणि इथल्या सदाहरित निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी मुद्दाम वाट वाकडी केली पाहिजे.तिवऱ्याची गंगा.

आशुतोष बापट

Leave a comment