महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पाट पाखाडींचे गाव | जांभरुण | Jambhrun !

By Discover Maharashtra Views: 1343 5 Min Read

पाट पाखाडींचे गाव | जांभरुण !!

कोकणात अनेक गावे वेगवेगळी वैशिष्ट्ये सामावून वसलेली आहेत. निसर्गाची उधळण ही बाब तर सर्वत्र दिसतेच. परंतु काही सुंदर वैशिष्ट्ये ही गावे आपल्या अंगावर लेवून उभी असतात. मग त्यात काही प्रथा परंपरा असतात, काही सुंदर मंदिरे असतात तर काही निसर्ग नवल असतात. आणि दुसरं असं की आपल्या या सांस्कृतिक वैभवाबद्दल ही गावे आणि इथले गावकरी पूर्णपणे अनभिज्ञ असतात. जणू काही कस्तुरी मृगासारखी अवस्था झालेली दिसते. जांभरुण हे असेच एक अतिशय सुंदर, निवांत, आणि वैशिष्ट्यपूर्ण असे गाव. जेमतेम १००० वस्ती असलेलं हे जांभरुण पाट पाखाडींचे गाव.

रत्नागिरीच्या अगदी जवळ असूनही या गावाला शहरीकरणाचा कुठलाही संसर्ग झालेला नाही हे नशीब. गावाला सर्व बाजूनी डोंगरांचा गराडा पडलेला आणि एका बाजूकडून एक लहानशी बारमाही नदी वाहते आहे. नदीला नाव असे नाही. गाव तसा प्राचीन. गावाला ऐतिहासिक संदर्भपण खूप सुंदर. गावाचे खोत होते शितूत. या गावात शितूत मंडळींची बरीच घरे आजही आहेत. “पेशवाई काळात या गावचा सारा वसूल होत नव्हता म्हणून कुणा अंताजी दामोदर शितूत वर ही जबाबदारी सोपवली गेली. अंताजीने सगळा सारा गोळा करून दिला. तेव्हापासून अंताजीला हा गाव आंदण दिलेला. अंताजीचे कार्य एवढे मोठे की त्याला नाणी पाडायची मुभा पण दिली गेली. अंतूशाही रुपया त्या काळात प्रसिद्ध होता.” गावातले वृद्ध काका शितूत ही सगळी कथा सांगत होते. आता मात्र हा अंतूशाही रुपया अगदी नमुन्याला पण गावात कुणाकडे नाही.

या गावचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पूर्वी १० ते १५ पाण्याचे पाट होते. नदीचे पाणी तसेच डोंगरावर असलेल्या मोठ्या तळ्यातले पाणी या पाटाद्वारे गावातल्या शेतीला पुरवलेले होते. कालांतराने विकास झाला आणि गावात नळपाणी योजना आल्यावर हे पाट आक्रसले. तरीही आजमितीला गावात ५ पाट कार्यरत आहेत. पाट म्हणजे काय, त्याचे झुळूझुळू वाहणारे पाणी कसे असते, त्यातून चालत जाताना काय सुख लाभते हे सगळे या गावात जाऊन अनुभवता येते. दुसरी गोष्ट ‘पाखाडीची’. खरंतर हा शब्दसुद्धा सध्या कालबाह्य होत चालला आहे. पाखाडी म्हणजे डोंगरावर जाण्यासाठी केलेली दगडी पायऱ्यांची वाट. कोकणात अनेक गावांत तळवटीत असलेल्या देवळात जायला आपल्याला पाखाडी केलेली दिसते. पण जांभरुणचे वैशिष्ट्य असे की इथे एका डोंगराच्या माथ्यावरून सुरु झालेली पाखाडी थेट खाली नदीपर्यंत उतरते आणि नदी ओलांडून समोरच्या डोंगराच्या माथ्यापर्यंत जाते. इतकी देखणी आणि सुघड पाखाडी मलातरी इतरात्र कुठे दिसली नाही. लाल चिऱ्यांची वळणं वळणं घेत जाणारी पाखाडी, आणि तिच्या दुतर्फा असलेली गर्द झाली हे सगळे दृश्य फारच अप्रतिम असते.

जांभरुण या गावाचे अजून एक वैभव म्हणजे इथे असलेली जुनी देवळे. गावचा राखणदार असलेल्या भैरव, अद्रिष्टी, त्रिमुखी देवी यांचे देऊळ तर आहेच. शिवाय राधाकृष्ण, रत्नेश्वर, विश्वेश्वर आणि रामेश्वर, लक्ष्मी-त्रिविक्रम अशी सुंदर देवळे गावात डोंगर उतारावर वसलेली आहेत. या देवळांपर्यंत जायला सुरेख सुघड पाखाडी आहेच. देवळांना आटोपशीर प्राकारभिंत असून जुन्या धाटणीची देवळे फार सुरेख दिसतात.

रत्नेश्वर हे जणू सगळ्या गावचे दैवत. शंकराची सुरेख पिंड आणि त्यामागे असलेल्या कोनाड्यात महिषासुरमर्दिनीची आकर्षक मूर्ती दिसते. विश्वेश्वर आणि रामेश्वर ही देवळे एकाच आवारात शेजारीशेजारी आहेत. अंताजी दामोदर आणि त्यांच्या भावाने ही देवळे बांधली. छोटेखानी सुरेख देवळे आहेत ही. गाभाऱ्यात शिवपिंड आणि बाहेच्या बाजूला असलेल्या गणपतीच्या मूर्ती फारच आकर्षक आणि काहिश्या निराळ्या. राधा-कृष्ण मंदिराच्या सभामंडपाची नुकत्याच झालेल्या वादळात पडझड झालेली पण गाभाऱ्यात असलेल्या राधाकृष्णाच्या मूर्ती बघत बसाव्यात अशा आहेत.

लक्ष्मी-त्रिविक्रम हे काहीसे वेगळे नाव असलेले मंदिर. मूर्तीशास्त्रानुसार विष्णूच्या हातात असलेल्या शंख-चक्र-गदा-पद्म या आयुधक्रमात बदल होत गेले की विष्णूचे निरनिराळे विभव समोर येतात. डाव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात गदा, उजव्या वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात शंख असला की त्याला ‘त्रिविक्रम’ म्हणायचे. इथली मूर्ती अगदी तशीच आहे. गरुडाच्या खांद्यावर देव बसला आहे. डाव्या मांडीवर लक्ष्मीला घेतलेले आहे. अशी सुंदर लक्ष्मी-त्रिविक्रमाची मूर्ती या गावचे वैभव म्हणायला हवे. देवळे कोकणातली असल्यामुळे अतिशय स्वच्छ, सुंदर राखलेली. रोजची ताजी फुले देवावर वाहिलेली. आजूबाजूचे वातावरण अतिशय शांत, पाटाच्या पाण्याच्या आवाजाचेच काय ते पार्श्वसंगीत.

निवळी-गणपतीपुले मार्गावर कोतवडे फाट्यावर डावीकडे वळले की पुढे जांभरुणचा फाटा येतो. इथून ऐन डोंगराच्या कुशीत जेमतेम ५ कि.मी. वर जांभरुण वसले आहे. इतका रम्य गाव अनुभवायचा असेल तर गावात होम स्टे ची उत्तम सोय. आपण नुसते ऐकून असलेले असंख्य पक्षी इथे आपल्या घरासमोरच्या झाडावर येऊन आपल्याला दर्शन देतात. किती ते रंग आणि किती गोड आवाजाचे हे पक्षी ! तसेच अजून आश्चर्य म्हणजे पाटाच्या पाण्यातून चालत, नदीतल्या डोहात डुंबत, पाखाड्यांवरून चालत गावाचे वैभव आणि इतिहास सांगितला-दाखवला जातो. गावाच्या सड्यावर ‘कातळखोदचित्र’ हे कोकणात सापडणारे वैभवसुद्धा वसलेले आहे. असा सर्वगुणसंपन्न असलेले जांभरुण गाव खरंच पाट आणि पाखाडींचे, देवळे आणि इतिहासाचे, निसर्ग आणि कातळखोदचित्राचे गाव म्हणायला हवे. रत्नागिरीच्या जवळ असूनही आपले गावपण जपणारे जांभरुण गाव आपले निसर्गवैभव आजही टिकवून आहे हे महत्वाचे.

आशुतोष बापट

Leave a comment