हरगौरी, निलंगा

हरगौरी, निलंगा

हरगौरी, निलंगा –

हिंदू दैवतशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. विविध पुराणे आणि ग्रंथांमधून गौरीची प्रतिमालक्षणे दिलेली  आहेत. अपराजितपृच्छा या ग्रंथामधे द्वादशगौरीं,चा उल्लेख येतो, तर अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे. रूपमंडन या ग्रंथात तिची जी लक्षणे सांगितली आहेत त्यानुसार गौरी ही गोधासना, चार हात, तीन डोळे, आणि आभूषणांनी युक्त असावी असे म्हटले आहे. गौरीकडे कुमारिका म्हणूनसुद्धा पाहिले जाते.हरगौरी. गौरी ही घोरपड या वाहनावर उभी असल्याचे दाखवले जाते. हे सर्व सांगायचे कारण एवढेच की, अगदी अशीच एक सुंदर शिव आणि गौरीची अप्रतिम प्रतिमा लातूर जिल्ह्यतील निलंगा गावामधल्या एका मंदिरात आहे.

निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर हे एक त्रिदल पद्धतीचे मंदिर आहे. मुख्य गर्भगृहात शिवपिंडी असून डावीकडील गर्भगृहात तीन फूट उंचीची सुरेख अशी विष्णुप्रतिमा आहे. त्याच्याच समोरच्या गर्भगृहात उमामहेश्वर आलिंगन मूर्ती दिसते. शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. परंतु इथेच एक अजून वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे शिव आणि पार्वती ज्या पीठावर बसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. घोरपड ही चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ठिकाणी तिने पकड घेतली तर ती अत्यंत चिवटपणे धरून ठेवते. तिथून तिला हलवणे केवळ कठीण असते. कथा, त्यामागील तत्त्वज्ञान आणि त्यानुरूप घडवलेल्या देखण्या मूर्ती हे आपल्याला मिळालेले वरदानच म्हणायला हवे.

पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी अत्यंत तीव्र आणि कठोर तपश्चर्या केली होती. तिची शिवप्राप्तीची इच्छा अत्यंत प्रबळ होती. त्यासाठी तिने अत्यंत चिवटपणे आपली तपश्चर्या चालू ठेवली. तिची अवस्था एखाद्या पर्णहीन वृक्षाप्रमाणे झालेली होती यावरूनच तिला अपर्णा असे नाव मिळाले आहे. पार्वतीच्या या चिवट तपश्चर्येला घोरपडीच्या चिवटपणाची उपमा दिलेली दिसते. आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला मूर्तिशास्त्रामध्येसुद्धा दिसते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. या अशा हरगौरी प्रतिमा खूपच कमी संख्येने पाहायला मिळतात.

निलंगा इथल्या नीलकंठेश्वर मंदिरामधील ही हरगौरीची प्रतिमा चांगली साडेचार-पाच फूट उंचीची भव्य अशी आहे. अत्यंत देखण्या या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते. शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशूळ असून उजव्या खालच्या हातात अक्षमाला असून तो हात अभयमुद्रेत दाखवला आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे. शिवाला जटामुकुट असून देवीच्या केसांवर फुलांची वेणी दिसते आहे. ते बसलेल्या पीठावर शिवाच्या पायाशी नंदी असून देवीच्या पायाशी घोरपड अत्यंत सुबकतेने शिल्पित केलेली दिसते.

हिंदू विवाह पद्धतीत गौरीहराची पूजा करण्याचा विधी प्रामुख्याने केला जातो. त्यामागेदेखील घोरपडीच्या चिवटपणाचेच तत्त्व सांगितले आहे. या प्रकारच्या मूर्ती घडवण्यामागे ते तत्त्वज्ञान लोकांच्या समोर दृग्गोचर व्हावे हा उदात्त हेतू तत्कालीन राजसत्तांचा आणि शिल्पकारांचा होता हे विशेषकरून जाणवते. ती प्रतिमा आणि नीलकंठेश्वर मंदिर या दोन्हीही गोष्टी मुद्दाम जाऊन पाहण्याजोग्या आहेत.

आशुतोष बापट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here