बेलसरची लढाई | The Battle of Belsar –
सर्वधारी नाम संवत्सर, श्रावण वद्य अमावस्या, शके १५७०, मंगळवार दि.८ ऑगस्ट १६४८ रोजी खळद-बेलसरच्या मैदानी लढाईत आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या फौजेला पराभूत करून मराठ्यांनी बेलसरची लढाई मारली..!!
दि.२५ जुलै १६४८ रोजी बाजी घोरपडे आणि मुस्तफाखानाने शहाजीराजांना दग्याने कैद केलं. मधल्या काळात आदिलशहाने फतेखानाच्या अधिपत्याखाली बल्लाळ बेडर, मुसेखान, बाळाजी हैबतराव, निंबाळकर, घाटगे, अशरफखान यांसह साधारणतः ८००० फौजेनिशी शिवाजी महाराजांच्या जहागिरीवर कब्जा करण्यासाठी पाठवले.
त्यावेळी खुद्द शिवाजीराजे तत्कालीन स्वराज्याच्या सीमेवर म्हणजे दुर्ग पुरंदरावर ससैन्य आले होते. तेव्हा फतेखानाने पुरंदरचा ताबा घेण्याचे काम मुसेखानासह स्वतःकडे घेऊन बल्लाळ बेडर व बाळाजी हैबतरावाला त्याने शिरवळच्या भुईकोटावर पाठवले. फतेखान, मुसेखान व इतर सरदार फौजेसह पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या खळद-बेलसरच्या आसपास मुख्य छावणी करून थांबले होते.
इकडे शिरवळचा कोट मोठा हल्ला करून बाळाजी हैबतरावाने मराठ्यांकडून ताब्यात घेतला. हे वर्तमान पुरंदरी ऐकल्यानंतर लगेचच महाराजांनी गोदाजी जगताप, संभाजी काटे, भिमाजी वाघ, शिवाजी इंगळे वगैरे मराठे सरदार कावजी मल्हारच्या आधिपत्याखाली शिरवळकडे पाठवले.
त्यांनी कोटावर रात्रीच जोरकस हल्ला केला. मराठ्यांनी लोखंडी सोट्याने एके ठिकाणी तटाची भिंत पाडून, कुदळींनी खणून व काही ठिकाणी शिड्या लावून तटांत प्रवेश केला व आतल्या लोकांशी त्यांची गाठ पडली. त्यावेळी झालेल्या चकमकीत बाळाजी हैबतराव मारला गेला आणि शिरवळचा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला. हे वृत्त खळद बेलसरच्या मुख्य छावणीत फतेखानाला मिळालं, तो भयंकर चिडला, त्याने मुसेखानासह, निंबाळकर, घाटगे वगैरे सरदारांसह विजापुरी फौजेला ताबडतोब थेट पुरंदरावर हल्ला करायचा हुकूम दिला.
सुरवातीला पुरंदरच्या जवळ आदिलशाही फौज आल्यानंतर वरून हल्ला होईल या अपेक्षेत ते असताना त्यांच्यावर काहीही प्रतिकार झाला नाही. त्यामुळे चेव येऊन फौज पुरंदरच्या आणखीन जवळ आली. तेव्हा मात्र मराठयांनी वरून मोठाले धोंडे, बंदुकीच्या गोळ्या, गोफणगुंडे, दारूचे बाण, पलित्यांचा दणदणीत मारा विजापुरी फौजेवर चालवला. त्यात अनेक जण मारले गेले, बरेचसे जखमी झाले. त्यामुळे विजापुरी फौज चांगलीच बावरली. पण पुन्हा फिरून नव्याने पुरंदर चढायला लागली. तेव्हा पुरंदरातून मराठ्यांनी निवडक फौजेसह वर चढून येणाऱ्या विजापुरी फौजेवर कडवट हल्ला चढवला. ह्या खणखणीत गोदाजी जगतापाने मुसेखानाला खांद्यापासून मध्यभागापर्यंत चिरून मारला. ते बघून हल्ला करणाऱ्या फौजेचे अवसानच गळाले, खुद्द फतेखान, अशरफखान वगैरे खळद बेलसरच्या मुख्य छावणीकडे पळत सुटला.
ताबडतोब शिवाजी महाराजांनी फतेखानाच्या पाठलागावर दोन मराठ्यांच्या तुकड्या पाठवल्या त्यात संभाजी काटे, बाजी पासलकर, काताजी इंगळे, भैरोजी चोर, तुकोजी चोर, गोदाजी जगताप, बाजी सर्जेराव जेधे वगैरेंना पाठवले. त्यांनी खळद बेलसरच्या छावणीवर अचानक हल्ला चढवला. आधीच पुरंदरावर मार खाल्लेल्या विजापुरी फौजेने मराठ्यांच्या चिवट हल्ल्याचा थोडा प्रतिकार केला. त्यावेळी मराठ्यांचा झेंडा विजापुरी फौजेच्या हाती लागणार होता. पण बाजी जेध्याने ऐनवेळी कुमक करून निशाण वाचवून माघारी आणले आणि विजयश्री खेचून आणली.
त्यावेळेस मराठ्यांनी केलेल्या जोरकस हल्ल्यामुळे शेवटी स्वतः फतेखान फौजेसह विजापूरकडे पळत सुटला. पण त्याचवेळी “मराठ्यांच्या फौजेतले सर्वात ज्येष्ठ सेनापती नरवीर बाजी पासलकरांना यांना खळद बेलसरच्या रणात वीरमरण आले.” त्यांच्या जाण्याने महाराजांची आणि पर्यायाने स्वराज्याची सुरवातीलाच फार मोठी हानी झाली.
© स्वराज्यसेवक
संदर्भ :
१) राजा शिवछत्रपती : पूर्वार्ध – बाबासाहेब पुरंदरे
२) शककर्ते शिवराय : खंड १ – विजय देशमुख
३) राधामाधवविलासचंपू – संपादक : वि.का.राजवाडे
४) शिवभारत (कवींद्र परमानंद नेवासकर विरचित) – स.म.दिवेकर
५) शिवचरित्र निबंधावली – शिवचरित्र कार्यालय, पुणे
६) शिवचरित्र – सेतू माधवराव पगडी
७) चित्रस्रोत : AI ने बनवलले आहे
