चहाबाज मुंबई आणि चहाची वाढती ‘चाह’त !

चहासंस्कृती

चहाबाज मुंबई आणि चहाची वाढती ‘चाह’त !
( चहासंस्कृती भाग ३ )

चीनमध्ये पूर्वी औषधी काढा म्हणून प्यायला जाणारा चहा, आज मात्र पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायले जाणारे दुसऱ्या क्रमांकाचे पेय आहे. जगातल्या सर्वात उत्तम प्रतीच्या चहाचे सर्वाधिक प्रमाणात उत्पादन चीन आणि भारतात होते. खरेतर पिकते तेथे विकत नाही असे म्हटले जात असले तरी चहाच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. कारण तो येथे पिकतो आणि विकतो देखील.

मुंबईत तर चहाचा रोजचा खप हा कांही कोटी कप असावा. फार पूर्वींपासून अगदी गरीब कामगारही चहात बुडवून चपाती / पाव नाहीतर एखादे खारे बिस्कीट खात असे. मध्यमवर्गीयाच्या घरी आलेल्या पाहुण्याला अगदी शब्दशः चहा पाणी पुरेसे असे. मोठ्या साहेबांच्या केबिनमध्ये मोठ्या पाहुण्यालाही चहाच पाजला जात असे. प्रत्येक ठिकाणी त्याची मिजास वेगळी रूप वेगळे असले तरी आत्मा तोच ! चहाचे प्रकार, प्रत, भौगोलिक भाग, तयार करण्याच्या पद्धतीं इत्यादींनुसार हळूहळू चहामध्ये अनेक प्रकार आणि बदल आले. वेगवेगळ्या चहा पावडरींची स्वादानुसार मिश्रणे आली. त्यात दूध घातले जाऊ लागले. ब्लॅक टी, ग्रीन टी, प्यूएर टी, ऊलोंग टी अशा असंख्य प्रकारांबरोबर चॉकलेट टी, लेमन टी, जस्मिन टी, रोज टी असे चहाही अवतरले. त्याबरोबर काही ‘ टी एटीकेट्स ‘ अवतरले. थर्मास आले. प्रतिष्ठितांमध्ये टी बॅग्ज, टी इन ट्रे, किटली आणि टिकोझी यांच्या जाम्यानिम्यासह चहा संस्कृती अवतरली !

गेल्या ५० / ६० वर्षांपूर्वी चहा हा अधिकतर हॉटेल्समध्ये मिळत असे. पण कांही हुशार मंडळींनी त्याला ‘ रस्त्यावर ‘ आणला. गिरण्या – कारखाने यांच्या गेटच्या आसपास एखादा तरी अप्पा, अण्णा, भट दिसू लागला. अगदी पहाटेपासून ते अपरात्रीपर्यंत गरम आणि स्वस्त चहा देणारे हे विक्रेते, तीन पाळ्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी मोठा आधार असायचे. खाली मंद जळणाऱ्या कोळशाची छोटी शेगडी, त्यालाच घट्ट बांधलेल्या आणि नळ असलेल्या पितळी बंबातून चहा विकणारे फेरीवालेही लोकप्रिय होते.

त्यावेळी नाक्यानाक्या वरचे इराणी हे पाणीकम चहाचे उद्गाते होते. त्यांचा चहा हा वेगळ्याच स्वादाचा असायचा. तसा अन्यत्र कुठे मिळत नसे. त्या चहात थोडी अफू टाकलेली असते, त्यात ते वेगळ्याच प्रकारचे मीठ घालतात असे अनेक प्रवाद त्यावेळी चर्चिले जात असे. तुमच्या टेबलावरच तुम्हाला भुलविणाऱ्या पारदर्शी बरण्यांमध्ये बिस्किटे, केक्स ठेवलेले असत. तेथे तुम्ही केवळ एक चहा पिऊन ३ तास बसलात तरी तो इराणी तुम्हाला कधी ऊठ म्हणायचा नाही. त्यामुळे हातात सिगारेट घेऊन बसलेले विचारवंत, शून्यात पाहत बसलेले सृजनशील कलावंत, प्रेमभंग झालेले किंवा होऊ घातलेले प्रेमी अशा दुर्मिळ व्यक्तीरेखा तेथे पाहायला मिळत असत.

तर अन्यत्र अनेक ठिकाणी, शंकर विलास आणि लक्ष्मी विलास हिंदू हॉटेल नावाची अनेक हॉटेल्स, लोकांची चहाची तलफ भागवीत असत. ते आपल्या चहाला ‘ अमृततुल्य चहा ‘ असे विशेषण लावीत असत. याचे मालक व नोकर हे गुजरात आणि राजस्थान येथील असत. ते जातीने ब्राम्हण असल्याने त्यांना भट असेच संबोधले जात असे. त्यांचा चहा हा अधिक गोड, अधिक दुधाचा, मसाला घातलेला आणि उकळता असायचा. गोडी आणि दुधाच्या प्रमाणानुसार त्यांच्या चहाची नावेही साधा, इलायची, रजवाडी, मसाला, गोल्डन, केसरी, बासुंदी, दूधपाक, रबडी अशी असत. मोठ्या पातेल्यात आणि भर्रर्रर्र आवाज करणाऱ्या रॉकेलच्या स्टोव्हवर सतत चहा उकळत असे. तो एका पातेल्यावर फडका ठेवून गाळला जात असे आणि तो फडका अक्षरशः पिळवटून त्याचा अर्क चहात ओतला जात असे. सर्दीवर उपाय आणि थंडीत उपयुक्त असा ‘ उकाळा ‘ नावाचा एक प्रकार त्यांच्याकडे मिळत असे. अर्धे दूध – अर्धे पाणी – साखर आणि सुंठीची पावडर असलेला हा उकळता उकाळा ही त्यांची खासियत ! अर्ध्या किलोमीटर परिसरात अगदी एक चहासुद्धा नेऊन देणारे त्यांचे नोकर, दगडी पाटीवर साध्या पेन्सिलने लिहिलेला हिशेब ( आता त्याची जागा ग्राहकनिहाय छोट्या डायऱ्यांनी घेतली आहे ), दिवसभराचे एकदम बिल देण्याची सोय, अत्यंत अचूक हिशेब ही त्यांची वैशिष्ठ्ये होती. चहाच्या उडुपी स्टॉलवाल्यांनी स्टीलच्या छोट्या पातेलीत चहाने भरलेल्या आणि उपड्या ठेवलेल्या भांड्यातून चहा सेवा सुरु केली. मुंबईतील हजारो उडुपी सकाळी आपले हॉटेल उघडल्यावर सर्वात आधी, आपापल्या हॉटेलच्या दाराच्या अगदी समोरच्या रस्त्यावर, एक ग्लास चहा आणि एक ग्लास पाणी, चक्क ओतून देऊन धंद्याला सुरुवात करतात.

फोर्टातल्या मोठ्या हाफिसातसुद्धा, इमारतीच्या जिन्याखाली, दरवाज्याजवळ अशा अवघड जागीसुद्धा चहायाग पाहायला मिळू लागला. हॉटेल आणि कॅन्टीनपेक्षा स्वस्त आणि पटकन मिळणारा इथला हा चहा हे मुंबईचे अविभाज्य अंग झाले. गिऱ्हाईकांची तात्कालिक गरज लक्षात घेऊन चहाबरोबर बिस्किटे, ब्रेड स्लाईस मिळू लागले. अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी आजदेखील हे चहावाले त्याच प्रकारे अस्तित्वात आहेत.

फोर्ट व्यतिरिक्त भागातील ऑफिसांनी आपले रूप पूर्णपणे बदलले. २५ / ३० ते ५० /६० मजली आणि बाहेरून काचांनी शाकारलेल्या इमारतीत ऑफिसे स्थलांतरित झाली. आता कर्मचारी म्हणून हजारो रुपये किंमतीच्या ‘ फॉर्मल्स ‘ मध्ये, गळ्यात मल्टिनॅशनल ओळख, कानात इयरफोनची कुंडले असलेली तरुण मुले मुली दिसू लागली आहेत. कॉलेज पूर्ण झाल्यावर लगेचच मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्याने त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह पाहण्यासारखा असतो. मग या भागातील चहा, टपऱ्या, भट यांनीही बदलायलाच हवे ना ! म्हणून मग तेही बदलले ! अत्यंत कळकट टपऱ्या आणि ‘ पॉश अँम्बीयन्स ‘चे स्टॉल्स अशा दोन्हीही गोष्टी येथे एकाचवेळी दिसू लागल्या. चांगली गोष्ट अशी की या नवीन स्टॉल्सनी जुन्या चांगल्या गोष्टी नव्या रूपात आणल्या आणि नवीन गोष्टीही आणल्या. येथे अवघ्या १० रुपयात चहा मिळू लागला आणि तो उभ्या उभ्या गप्पा मारीत पिता येतो.

त्याबरोबर येथे ब्रेडबटर, बिस्किटे, वडापाव, उपमा, पोहे असे पदार्थ तुलनेने स्वस्त मिळू लागले. बंद ऑफिसात १२ / १२ तास काम करणाऱ्यांना येथे मोकळ्या वातावरणात, उभ्याने, मित्रांबरोबर गप्पा मारताना चहा घेण्याचा आनंद मिळू लागला. मिनरल वॉटरच्या बाटल्या, पेपर नॅपकिन्स, पेस्ट्री, लेमन टी – कुल्हड टी – तंदूर टी असे आधुनिक प्रकारही येथे मिळू लागले. टपरी, कटिंग, चाय-पाव, टी ब्रेक चाय अशा शब्दांना स्टेटस मिळाला. एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असले तरीही असे स्टॉल्स चांगला धंदा करू लागले आहेत. वास्तविक हल्ली अनेक ऑफिसांमधून Tea Dispensers अर्थात चहा देणारी मशिन्स बसविली आहेत. पण त्या सिंथेटिक चहापेक्षा या तरुण मंडळींना असा खुला चहा अधिक बरा वाटत असावा. त्याच बरोबर अत्यंत प्रशस्त आणि वातानुकूलित अशा टी गॅलरीज, लाऊंज, कॉरीडॉर्स इ. अस्तित्वात आले. डेटिंग, भिशी मिटींग्स,बिझनेस टॉक्स ” Over a cup of tea ” यासाठी, अशी आधुनिक Tea Houses अस्तित्वात आली. चोखंदळ चहाबाजांना पर्वणी म्हणजे १०० प्रकारच्या विविध चहा पावडर्सपासून ३० प्रकारचा स्वर्गीय चहा देणारा ‘टी व्हिला कॅफे’ !

दुकान उघडायच्या आधी ३ तास आणि बंद केल्यावर २ तास धरून जवळजवळ १८ तास रोजची अंगमेहनत करावी लागते. यामध्ये आपण मराठी लोक खूप मागे असतो. पण अंधेरीत स्टेशनजवळ प्रशांत झेंडे या मराठी तरुणाने अत्यंत धाडसाने ‘ येवले अमृततुल्य चहा ‘ चा अत्याधुनिक स्टॉल सुरु केला आहे. सजावट, सेवा आणि स्वच्छता यामध्ये त्यांनी कसलीही उणीव ठेवली नाहीये. ‘गिऱ्हाईकाचा संतोष हाच आमचा फायदा ‘ ही मराठी धंद्यावर दिसणारी पाटी येथे दिसत नाही पण गिऱ्हाईकाच्या संतोषासाठी मात्र हा प्रशांत झेंडे स्वतः सतत झटत असतो. त्यामुळे अर्थातच चहा पिणाऱ्यांची अक्षरशः झुंबड उडालेली असते. त्याच्याकडे मिळणाऱ्या चहाची चव आणि इतर पदार्थ यांची कीर्ती ऐकून आता लांबच्या ऑफिसमधील लोकही येथे येऊ लागली आहेत. त्यांनी स्टॉलच्या प्रवेशद्वारावरच उभा केलेला ८ फुटी अस्सल मराठी माणूस ( फायबरचा पुतळा ) फारच बोलका आहे !
कदाचित या येवले चहावाल्यांकडून प्रेरणा घेऊन फोर्टमध्ये एका शेट्टीनेही असाच शेट्टीअण्णा उभा केला आहे.( खालील छायाचित्रे पाहावीत ).
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हणून हिणवल्यावर, त्यांनी त्याला उत्तम कलाटणी दिली आणि समस्त चहावाल्यांचा आणि चहा संस्कृतीचाच सन्मान केला. सार्वजनिक ठिकाणी ‘ चाय पे चर्चा ‘ हा एक प्रकार पहिल्यांदाच अस्तित्वात आणला.

कांही वर्षांपूर्वी सिगारेट ओढणे हे पराक्रमी पुरुषाचे लक्षण आहे असे दाखविण्यासाठी, मोठमोठ्या सिनेनटांकडून सिगारेटच्या जाहिराती केल्या जात असत. त्यावर बंदी आल्यावर, दारूच्या अनेक प्रसिद्ध ब्रँडचे पत्ते, मिनरल वॉटर, म्युझिक सीडीज, सोडा यांच्या नावांच्या आडून दारूच्या जाहिराती सुरु झाल्या. पण आता अनेक प्रसिद्ध नट चहाच्या विविध ब्रॅण्डच्या जाहिराती करतांना दिसतात. सिगारेट आणि दारुपेक्षा, चहाचा गाजावाजा ठीक म्हणायचा ! ‘ चहामध्ये टॅनिन नावाचा विषारी घटक असल्याने तो पिऊ नये ‘ असे लहानपणी पाठयपुस्तकातून शिकवले जात असे. आता ते खूपच बाळबोध वाटायला लागले. एकंदरीत मुंबईत अनेक पिढ्यांपासून रुजलेली चहा संस्कृती, आता विविध रुपांमध्ये फोफावते आहे. चहाची चाहत वेगाने वाढतेच आहे.
चला एकेक कटिंग चहा घेऊया !

माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here