अंगुस्तान ! एक दुर्लक्षित पण मजेदार वस्तू

अंगुस्तान

अंगुस्तान ! एक दुर्लक्षित पण मजेदार वस्तू

शिंप्याच्या अवजारांमध्ये पूर्वी सुई, दोरा, कात्री, टेप इत्यादी वस्तूंबरोबरच आणखी एकदुर्लक्षित आणि अप्रसिद्ध वस्तू पाहायला मिळत असे. ती वस्तू म्हणजे बोटात घालायची धातूची टोपी. पूर्वी सगळे शिवणकाम हातानेच होत असे. कापडातून सुई वरून खाली घालताना खालच्या हाताच्या बोटाला ती टोचत असे. तर खालून वर ढकलताना सुईचे नेढं टोचल्याने अनेकदा बोटातून रक्त येत असे. यावर माणसाने चक्क बोटासाठी ” शिर ” स्त्राण शोधून काढले.पूर्वी मुस्लीम समाजात गोल, उंच आणि मध्ये गोंडा असलेली तुर्की टोपी वापरत असत. तशाच आकाराची आणि छोटेछोटे खड्डे असलेली या बोटामध्ये घालायची धातूची टोपीचा शोध लागला. याला भारतात “ अंगुस्तान “ म्हणतात. पाकिस्तान, बलुचिस्तान, अफगाणिस्तान याच्याशी नामसाधर्म्य असलेला हा शब्द मात्र संस्कृतोद्भव आहे. अंगुली ( बोट ) आणि (अग्र ) स्थान यावरून हा अंगुस्तान शब्द तयार झाला आहे. इंग्लिशमध्ये याला Thimble म्हणतात.

या तशा दुर्लक्षित वस्तूचा इतिहास मात्र गंमतीदार आणि आश्चर्यकारक आहे. जर्मनीतील एका वस्तुसंग्रहालयात अंगुस्तान बनविणाऱ्याचे १५६८ मधील एक चित्र आहे. चीनमधील हान राजवटीतील अंगठीसारखे अंगुस्तान सापडले आहे. तर ग्रीक आणि रोमन लोक जड कापडाची चिंधीच अंगुस्तान म्हणून वापरत असत. १५व्या शतकात जर्मनीत न्युरेनबर्ग येथे होणारे अंगुस्तानचे उत्पादन १७व्या शतकात हॉलंडमध्ये गेले.

ही अंगुस्ताने पूर्वी धातू, चामडे, लाकूड, काच, चीनीमाती, व्हेल माशाची हाडे,हस्तिदंत इत्यादीपासून बनविली जात असत. खूप श्रीमंतांचे कपडे शिवणारे राजदर्जी तर सोने, चांदी, मोती, माणिक, हिरे अशा महाग गोष्टींपासून बनविलेली अंगुस्ताने वापरत असत. वरून बंद असलेले अंगुस्तान हे कलाकुसरीचे पोशाख बनविणारे कारागीर वापरत असत.तर वरून उघडे अंगुस्तान अन्य शिंपी वापरत असत. काही ललना आपल्या खास वाढविलेल्या नखांचे संरक्षण करण्यासाठी अंगुस्तानचा वापर करीत असत.
युरोपमध्ये विविध अंगुस्तानांचा संग्रह करणारे हजारो संग्राहक आहेत. त्यांना Digitabulist म्हटले जाते. या संग्रह्कांसाठी अनेक कंपन्या खूप वेगवेगळ्या प्रकारची अंगुस्ताने मुद्दाम तयार करतात.

या अंगुस्तानबद्दल अनेक समज आणि त्यांचा विविध ठिकाणचा उल्लेख फारच मनोरंजक आहे. जर एखाद्याला ३ अंगुस्ताने भेट म्हणून दिली तर त्याचे कधी लग्न होत नाही असे मानले जाई. अवेळी बोलावलेली गणिका, आपण आल्याची खूण म्हणून यजमानाच्या दारावर अंगुस्तानने टिकटिक करीत असे. “ Peter Pan “ मध्ये अंगुस्तानहे चुंबनाचे प्रतिक मानून भेटवस्तू म्हणून दिले आहे. Batman Returns या चित्रपटात Catwoman ने पंजाची नखे म्हणून अंगुस्तान वापरली आहेत. कार्टून शो पोपेयेचे मूळ नाव Thimble Theatre Starring Popeye असे होते.

जुन्या अंगुस्तानच्या संग्राहकांनी मोजलेल्या किंमतीही अशाच अविश्वसनीय वाटाव्यात इतक्या प्रचंड ! लंडनच्या एका महाभागाने, जगप्रसिद्ध लिलाव कंपनी खिस्तीच्या लिलावात, ३ डिसेंबर १९७९ मध्ये १७४० च्या एका अंगुस्तानसाठी १८००० अमेरिकन डॉलर्स मोजले होते. आणखी एक अंगुस्तान याच कंपनीने १०३५० डॉलर्सन तर सीर्थी कंपनीने एक अंगुस्तान २६००० पौंडांना विकले होते.
आपल्याला फारशा माहिती नसलेल्या आणि नगण्य वाटणाऱ्या एखाद्या छोट्याशा गोष्टीचे केवढे महात्म्य असू शकते ?
माझ्या संग्रहातील कांही अंगुस्तानची छयाचित्रे खाली देत आहे.

माहिती साभार – Makarand Karandikar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here