जुन्या स्वयंपाकघरातले कांही खास सोबती भाग २ | Antique Kitchen Assistants
या विषयावर मी जेव्हा पूर्वी छोटासा लेख लिहिला होता तेव्हा केलेला एक उल्लेख पुन्हा आज करतो आहे… पूर्वीच्या काळी घराघरांतून आढळणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये एखादे वेगळेपण हमखास आढळत असे. त्या त्या गावातील अशा वस्तू बनविणारे, हे केवळ सुतार, कासार, विणकर नव्हते तर ते खूप उच्च दर्जाचे कलाकार होते. छोट्या छोट्या गोष्टीतही ते आपला जीव ओतून काहीतरी वेगळे आणि चांगले देत असत. या वस्तूंमध्ये उपयुक्तता, खास अशी कांहीतरी कलात्मकता, वैशिष्ठय असे सर्व कांही असे. अद्वितीय ( unique ) असे काहीतरी त्यात सापडत असे. माझ्या संग्रहातील असे कांही वेगळेपण दाखविणाऱ्या या काही वस्तू —
१ ) खास मोदकपात्र — मोदकपात्र हा प्रकार जरी आता दुर्मिळ होत चालला असला तरी तो सर्वांनी नक्कीच पाहिलेला आहे. आमच्याकडे गेल्या ४ पिढ्या वापरात असलेले मोदकपात्र आहे. त्याचबरोबर ४।। ते ५ इंच उंचीचे एक छोटे मोदकपात्रही आहे. या छोट्या मोदकपात्राबद्दल अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. हे भातुकलीतील मोदकपात्र नसावे. कारण एकतर भातुकलीच्या हिशेबात हे मोदकपात्र तसे मोठे आहे. शिवाय याला आतून अत्यंत काळजीपूर्वक आणि पूर्णपणे कल्हई लावलेली आहे. बाहेरील तळाशी ते वापरल्याचा खुणाही दिसतात. मिळालेली एकच माहिती मला अंधुकशी आशादायक वाटली. पूर्वी कांहीजणी ( हो, पूर्वी सर्व व्रतवैकल्य ही स्त्रियांनीच करायची असत ) ‘ एका मोदकाची संकष्टी ‘ करीत असत. दिवसभराचा संकष्टीचा उपास एकच मोदक खाऊन सोडायचा. बस्स, दुसरे काही खायचे नाही. या एका मोदकासाठी हे मोदकपात्र असावे. पण पूर्वीच्या घरात असा खास परार्थ केवळ एकाच माणसासाठी बनविण्याची पद्धत नव्हती. मग काय काम असावे या छोट्याचे ? एक मात्र खरे. एखादा अजस्त्र प्राणी उदा. गेंडा, पाणघोडा हा एकटाच बघण्यापेक्षा त्याच्या बाळाबरोबर पाहायला खूप छान वाटतो. तशीच ही लहान मोठ्या मोदकपात्रांची जोडी पाहायला मात्र खूप छान वाटते.
२ ) कलात्मक झारा — आता झाऱ्यामध्ये ती कलात्मकता कुठून आणायची ? पण पूर्वीच्या एका कलाकाराने ती आणली आहे खरी. सोबतच्या चित्रातील झाऱ्याला नुसतीच भोके न पाडता कलात्मक नक्षीची जाळी पाडली आहे. काम तर फत्ते होतेच पण पाहायलाही छान वाटते. हिंदीतून मराठीत लोकप्रिय होत चाललेल्या ” करावा चौथ ” च्या ( नवऱ्याला पाहायच्या ) चाळणीच्या जाळीलाही कुणी अशी नक्षी केली तर ? भरपूर विक्री होईल त्या चाळणीची !
३ ) मुदाळी — पूर्वीच्या ताटात / पत्रावळीवर भात आणि शिरा हा मूद घालून वाढला जात असे. साधा भात हा मोठ्या पेल्यातून किंवा लहान आकाराच्या ओगराळ्यातून मूद पाडून, साखरभात चांदीच्या वाटीतून मूद पाडून, मसाले भात थोड्या छोट्या पेल्यातून मूद पाडून, शिरा हा कंगोरेवाल्या डावेतून मूद करून वाढला जात असे. या साठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या दांड्याच्या पळीला मुदाळे म्हणत असत. सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा देण्यासाठी कंगोरेवाली कलात्मक पळी वापरली जात असे. आता प्लॅस्टीक आणि स्टीलमध्ये कंगोरेवाली मुदाळी उपलब्ध आहेत पण आता मूद आणि मुदाळीच इतिहासजमा झाली आहेत.
आजच्या चिनी वस्तूंच्या भारताडीमध्ये, आपल्या घरातही असे काही कलात्मक आढळते का पहा आणि जर असे काही आढळले तर ते कृपया जतन करा.
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा ). यातील प्रसादाच्या पितळी पळीचे छायाचित्र गुगलच्या सौजन्याने.
माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर. [email protected]
तुम्हाला हे ही वाचायला
- देव वरणे : खानदेशातील एक दुर्मिळ कुळाचार
- पावकी, निमकी म्हणजे बालपणी छळणाऱ्या चेटकी !
- तेव्हाची तिजोरी | पूर्वींचा लॉकर / सेफ डिपॉझिट व्हॉल्ट
- अंगुस्तान ! एक दुर्लक्षित पण मजेदार वस्तू
- जुन्या स्वयंपाकघरातले कांही खास सोबती भाग २ | Antique Kitchen Assistants
- जुनी एकसंध इस्त्री, धुरांड्याची इस्त्री | Antique Iron
- माझा बाटलीचा नाद | Rare Antique Bottles