महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

श्री दुर्गादेवी, कुणकावळे

By Discover Maharashtra Views: 2514 3 Min Read

श्री दुर्गादेवी, कुणकावळे.

शिवछत्रपतींनी स्वराज्याचे सुसज्ज आरमार घडविले आणि समुद्रावर आपली सत्ता निर्माण केली. त्या आरमाराच्या संरक्षणासाठी बेलाग असे जलदुर्ग राजांनी बांधले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे कुरटे बेटावर बांधलेला किल्ले सिंधुदुर्ग म्हणजे स्वराज्याचा अत्यंत अनमोल असा रत्नजडीत दागिनाच म्हणावा लागेल. मालवण आणि सिंधुदुर्ग यांचे नाते एवढे घट्ट आहे की मालवणच्या परिसरात यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी, स्थळे असतील असा विचार सुद्धा पर्यटकांच्या मनात कधी येत नाही. परंतु परिस्थिती अशी नाही. मालवण परिसरामध्ये एकापेक्षा एक अशी सरस ठिकाणे वसली आहेत आणि ती पर्यटकांची वाट पाहत आहेत.(श्री दुर्गादेवी, कुणकावळे)

कुणकावळे इथले दुर्गादेवीचे मंदिर आणि त्यापेक्षासुद्धा त्या देवीची अत्यंत सुडौल मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे. अगदी आड असलेल्या गावात इतकी शिल्पजडित देवीची मूर्ती असेल यावर विश्वासच बसत नाही. पण कसे असते ना, की या मंदिराची प्रसिद्धी पंचक्रोशीच्या बाहेर कुठेही नाही आणि म्हणूनच मालवणला येणाऱ्या पर्यटकांना याची माहिती सुद्धा असत नाही. मालवणपासून फक्त १५-१६ कि.मी. वर आहे कुणकावळे गाव. मालवणहून कसाल च्या दिशेने जायला लागले की कुंभारमाठ नावाचे गाव लागते. इथून पुढे चौके फाटा आहे. या फाट्यापासून एक रस्ता कुणकावळे गावाला जातो. कुणकावळे गावात आहे श्रीदुर्गादेवीचे मंदिर. गावाच्या उत्तर दिशेला सुमारे एक कि.मी. चा गावकऱ्यांनी केलेला रस्ता आपल्याला थेट दुर्गादेवी मंदिरापाशी आणून सोडतो.

प्रत्यक्ष धर्मराजांनी या देवीची स्थापना केली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. १९६१ साली झालेल्या वादळाचा तडाखा बसल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे झाले. खास कोंकणी पद्धतीची सुंदर अशी दीपमाळ एका ओट्यावर उभी आहे. मंदिराला भव्य असा सभामंडप बांधलेला आहे. आणि या मंदिरात आहे अतिशय देखणी साडेचार फूट उंचीची दुर्गादेवीची उभी मूर्ती. चतुर्भुज देवीच्या हातात तलवार, चक्र, त्रिशूळ ही आयुधे असून डाव्या हातात परळ आहे. पायाशी दोन्ही बाजूला सेविका दाखवल्या आहेत.

मूर्तीवर वस्त्रप्रावरणे, दागदागिने, ठसठशीत कोरलेले आहेत. दंडामध्ये वाकी असून बाजूला मोर दाखवले आहेत. देवीच्या पायात खडावा आहेत तर केशसंभार अप्रतिम आहे. देवीच्या पाठीमागे कोरलेली प्रभावळ फारच देखणी आहे. मूर्तीसमोर दगडी प्रसाद पात्र आहे. अत्यंत मनोहारी अशी ही मूर्ती, आडवाटेला असली तरी खास वेळ ठेऊन पाहायला हवी. अनेक ठिकाणी देवीची मूर्ती म्हणजे एक तांदळा असतो. त्याला वस्त्रप्रावरणे नेसवून तो अत्यंत मनोहारी केलेला असतो. इथे मात्र सुटी स्वतंत्र देवीची मूर्तीच आहे. काळ्या दगडामध्ये कोरलेल्या या मूर्तीवर बारीकसारीक कलाकुसर केलेली दिसते. प्रसन्नवदना असलेली ही श्रीदुर्गादेवीची मूर्ती दगडामध्ये कोरून काढलेल्या इतक्या अलंकारांनी मढवलेली आहे की ते पाहून अचंबित व्हायला होते. मालवणच्या इतक्या जवळ असलेल्या ह्या देवीचे दर्शन मुद्दाम वाट वाकडी करून अवश्य घेण्याची गरज आहे.

आशुतोष बापट

Leave a comment