नागपूरकर रघुजीराजे भोसले यांचे सरदार भवानीपंत काळू यांनी बांधलेले बालाजी मंदिर, वाशीम –
नमस्कार! महाराष्ट्राच्या विदर्भ भूमीत वसलेलं एक असं ठिकाण, जिथे साक्षात तिरुपती बालाजीचा आशीर्वाद कायम असतो. आपण बोलत आहोत वाशीम शहराच्या गौरवशाली आणि प्राचीन श्री बालाजी मंदिराबद्दल! दक्षिण भारतात तिरुपती बालाजीला ‘टेकड्यांचा साहूकार’ म्हणतात, पण आपल्या वाशीमच्या या मंदिराला ‘वाशीमचा जागीरदार’ म्हणून ओळखले जाते.
वाशिम जिल्हयाचे पूर्वीचे नाव वत्सगुल्म असे होते. वाशिम शहर वाकाटक राज्याची राजधानी होती. वाकाटक राज्यांनी तीस-या शतकपासून सहाव्या शतकापर्यंत राज्य केले. सदर राज्य हे मध्यप्रदेश पासून बेरार आंध्रप्रदेश पर्यंत होते. विन्ध्ये- शक्ती हा प्रथम वाकाटकचा राजा होता. सर्वसेन या राजाने वत्सगुल्म (वाशिम) ला राजधानी घोषित केले होते. त्यांचा हरीविजय व गाथासप्तषदी हे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अजिंठा येथील लेण्यांना वाकाटक राज्यांनीच प्रोत्सहन दिल्याचे दाखले आहेत.
अडीचशे वर्षांपूर्वी ‘वत्सगुल्म’ म्हणजे आताच्या ‘वाशीम’ नगरीत एका ठिकाणी खोदकाम करत असताना काही मूर्ती सापडल्या. ही बातमी कळताच त्यावेळचे नबाब हशमत जंग बहादूर आणि स्थानिक देशमुख जमीनदार लोकांनी त्याठिकाणी भेट देऊन जमीन आणखी खणायला सांगितली. त्यानंतर आतून हल्लीची बालाजीची विष्णू मूर्ती, लक्ष्मी, गणेश, शारदा वगैरे मूर्ती निघाल्या. त्या मंडळींनी वाजत-गाजत हनुमानाच्या पारावर सर्व मूर्ती आणल्या. पुढे त्या मूर्ती हल्लीच्या मोठ्या मंदिरासमोर एक छोटे घर बांधून ठेवल्या.
त्याकाळी वत्सगुल्म भागावर तिघांची सत्ता होती. पूर्वेकडील भाग निजामाच्या ताब्यात, मधला भाग पेशव्यांच्या ताब्यात तर पश्चिमेकडील भाग नागपूरकर भोसले यांच्या ताब्यात होता. परंतु मूर्ती सापडण्याची घटना पश्चिमेकडील म्हणजे नागपूरकर भोसल्यांच्या भागात घडली होती.त्यावेळी नागपूर येथे सेनासाहेब सुभा जानोजी भोसले होते. बंगालची खंडणी न मिळाल्यामुळे ती वसूल करण्याकरिता पहिले रघुजी भोसले यांच्या कारकिर्दीतील अत्यंत निष्ठावान आणि शूर सरदार भवानीपंत काळू हे बंगालच्या स्वारीवर निघाले होते. यापूर्वी भोसल्यांनी बंगालवर अनेक स्वाऱ्या केल्या होत्या, परंतु त्यांना खंडणी वसूल करता आली नव्हती.
वत्सगुल्म येथे भोसलेंच्या भागात मुर्त्या सापडल्याची वार्ता भवानीपंत काळू यांना कळताच ते लष्करासह वत्सगुल्म येथे आले. देवतांच्या मूर्ती पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी विष्णू मूर्तीला असा संकल्प केला की, “जर मी बंगालच्या स्वारीत यशस्वी झालो तर तुझे भव्य देवालय येथेच वत्सगुल्म नगरीत बांधीन!”
नंतर ते तात्काळ बंगालच्या स्वारीला निघून गेले. बंगालच्या स्वारीला ते बालाजीच्या कृपेने यशस्वी झाले. स्वारीच्या वेळी भवानीपंत काळू यांच्याकडे “दिवाण व सेनापती” हा कार्यभार होता. भवानीपंत हे कसलेले योद्धा आहेत, याची खात्री सेनासाहेब यांना होती. म्हणूनच ते भोसल्यांच्या फौजेचे मुख्य सेनापती होते.
बंगालच्या स्वारीवरून परत आल्यावर वत्सगुल्मास घडलेली सर्व हकिकत व बंगालमध्ये मिळालेली सर्व संपत्ती दरबारी दिल्यानंतर त्यांनी वत्सगुल्म नगरीत श्री विष्णूच्या मूर्तीस केलेला संकल्प सेनासाहेबास कथन केला. संकल्पाप्रमाणे वाशीम शहरात श्री बालाजीचे भव्य मंदिर व त्याच्याच बाजूला असलेला ‘देव तलाव’ भवानीपंतांनी बांधला.
त्यानंतर देवालयाच्या बांधकामास ६ ऑगस्ट १७७८ ला सुरुवात झाली. देवालयाचे गर्भगृह व दगडी सभामंडप बांधून झाल्यावर मंदिरात श्री बालाजी व सापडलेल्या इतर सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा मोठ्या समारंभपूर्वक भवानीपंत काळू यांनी श्रावण वद्य १० शके १७०५ इंग्रजी दिनांक २२ ऑगस्ट १७८३ रोज शुक्रवारला केली. श्रींची प्राणप्रतिष्ठा करून त्यांनी नित्य पूजा अर्चा, आरती करण्यासाठी नोकर वर्ग नेमला.
मंदिरातील गर्भगृहात बालाजीच्या मूर्ती समोरील भिंतीवर वरच्या बाजूला एक कोनाडावजा खिडकी आहे. मंदिर हिंदू परंपरेनुसार पूर्वाभिमुख असले तरी पश्चिम-पूर्व रेषेशी उत्तरेच्या दिशेने विशिष्ट कोनात मध्यरेषा निश्चित करून मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. ह्या विशिष्ट वास्तुशास्त्रीय रचनेमुळे सूर्याने उत्तरायणात प्रवेश केल्यापासून ते दक्षिणायन सुरू होईपर्यंत म्हणजे २१ डिसेंबर ते २२ जून या काळात बालाजीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात.
भवानीपंत काळू यांना मिळालेले यश हे उत्तरायण काळातच मिळाले होते. उत्तरायण सुरू होताच ते नागपूर येथून निघाले आणि उत्तरायणाच्या उत्तरार्धात कटक प्रांतात पोहोचले. फारसे युद्ध किंवा रक्तपात न होता दक्षिणायन सुरू होण्यापूर्वीच तह होऊन त्यांना अकल्पित यश प्राप्त झाले. आपल्या काळातील एक संस्मरणीय कालखंड स्मरणात रहावा म्हणून त्यांनी अशी वास्तुरचना करून घेतली.
श्री बालाजी देवालय व देव तलावाचे बांधकाम पंचवीस वर्षे अविरत सुरू होते. या सर्व बांधकामासाठी श्रीमंत भवानीपंत काळू यांनी स्वतःच्या खासगी तिजोरीतून खर्च केला. बांधकामास त्यावेळी दहा लाख रुपये खर्च लागला. पुढे काही काळानंतर त्यांना जहागिरी मिळाली व त्यातून श्री बालाजी संस्थानचा कारभार सुरू झाला.
जर तुम्हाला विदर्भाच्या समृद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचा अनुभव घ्यायचा असेल, तर एकदातरी वाशीमच्या या ‘जागीरदार’ बालाजीच्या दर्शनाला यायलाच हवे.
– महेश कोते-पाटील (शिर्डी)

