महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,629

बंगालचे राजकारण आणि मराठे भाग ०१

By Discover Maharashtra Views: 3568 11 Min Read

बंगालचे राजकारण आणि मराठे भाग ०१ –

इतिहासात बंगाल चे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मोगल काळात बंगालच्या सुभ्यावर रवानगी होणं ही एक प्रकारे ‘ शिक्षा ‘ मानली जात. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला चढवला , त्यात त्याला त्याची तीन बोटं गमवावी लागली. या घटनेनंतर औरंगजेबाने शाहिस्तेखानाला बंगालच्या सुभेदार म्हणून नेमले. सन १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. १७०७ नंतर मराठी राज्याच्या सिमा विस्तारु लागल्या. सन १७४०-४१ साली मराठ्यांची नजर बंगाल प्रांतावर गेली. यावेळी रघुजी भोसले आणि नानासाहेब पेशवे दोघेही बंगालच्या मोहिमेवर होते. रघुजी भोसल्यांचे दिवाण भास्कर राम अर्थात भास्कर राम कोल्हटकर यांनी १७४१ पासून बंगालवर स्वाऱ्या करायला सुरुवात केली. एकीकडे रॉबर्ट क्लाईव्ह भारतात इंग्रजी सत्तेच्या साम्राज्यविस्ताराची स्वप्न पहात होता. त्याच वेळी बंगालच्या राजकारणात मराठे उडी घेऊ पहात होते.(बंगालचे राजकारण आणि मराठे)

बंगालच्या राजकारणात मराठ्यांचा प्रवेश कसा झाला आणि त्याचे पुढे काय परिणाम झाले ते आपण पहाणार आहोत.
भागीरथी नदी ही पाटण्याहून अग्नेयेकडे वाहत जाते तिला राजमहालच्या खाली एक फाटा फुटतो तीला हुगळी नदी म्हणतात.
हुगळी नदी दक्षिणवाहिनी असून कलकत्त्याच्या खाली जाऊन समुद्राला मिळते. हुगळीच्या काठावरुन खाली मुर्शिदाबाद, कासीमबाजार, प्लासी, खटवा, हुगळी, चिनसुरा, चंद्रनगर, कलकत्ता, व मुखाशी फुल्टा ही ठिकाणे असून वर भागीरथीच्या काठी बक्सार, पाटणा, मोंगिर, भागलपूर, राजमहाल व घेरीया ही ठिकाणे आहेत. तेराव्या शतकाच्या सुरुवातीला बंगाल मुसलमानांच्या ताब्यात गेला. तेव्हापासून पाचशे वर्ष होऊन गेली तरी मुसलमानी बंदोबस्त ढिला पडला नाही. मोगल काळात बंगालचा कारभार पाहण्यासाठी बादशहा आपला एक सुभेदार बंगालवर नियुक्त करत असे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे सुभेदार स्वतंत्र झाले आणि त्यांचा अधिकार हा अनुवंशिक बनला. बंगालमध्ये हिंदूंचे प्रमाण हे अधिक प्रमाणात होते. मुख्य अधिकारी हा जरी मुसलमान असला तरी सगळा कारभार हा हिंदूंच्याच हाती असायचा. या शिवाय फौजेतही जास्त करून हिंदूच असतं. हिशोब व व्यापार ही सगळी कामे हिंदूच करीत. उमिचंद व जगतशेठ यांसारख्या व्यापाऱ्याचे वजन प्रचंड प्रमाणात असून यांच्याशिवाय पानही हालत नसे. हिंदू लोक ही निर्व्यसनी, धार्मिक व आदरशिल असून स्त्रियाही पतिनिष्ठ व ममताळू‌ होत्या.

सन १६५९ साली औरंगजेब बादशहाने बंगालच्या सुभ्यावर मोरजुम्ला या अधिकाऱ्याची नेमणूक केली. हा हुशार व दक्ष होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या एका एजंटने गंगा नदीवर एका व्यापाऱ्याची होडी पकडून ठेवली होती. कारण त्या व्यापाऱ्याचे कंपनीकडे काही घेणे होते. ही गोष्ट मोरजुम्ला याला समजली आणि त्याला कंपनीच्या लोकांचा फार राग आला‌. नंतर त्याने कंपनीची हुगळीची वखार जप्त केली.

दि. २६ मे १६५९ रोजी औरंगजेबाने आपला राज्याभिषेक करवून आपल्या बापाने दिलेले ‘ आलमगीर ‘ हे नाव धारण केले. १६५९ ते १६६१ पर्यंतचा काळ आपल्या भावांचे मुडदे पाडण्यातच गेला. या औरंगजेबाचा उजवा हात म्हणजे हा मीरजुम्ला!
या मीरजुम्लाच्या मदतीने औरंगजेबाने आपला भाऊ शहाशुजाचा काटा काढला. मीरजुम्ला बंगालमध्ये वास्तव करत होता. त्याच ठिकाणी औरंगजेबाने त्याची सुभेदार म्हणून नेमणूक केली. औरंगजेबाच्या मनात चीन देश जिंकण्याची फार इच्छा होती.
भारतात राज्यविस्तार करण्याची स्वप्नं पडली ती ऑक्सेंडन, डुप्ले यांना पडली. सन १६६३ साली कोणत्यातरी आजाराने मीरजुम्लाचा मृत्यू झाला. मरण्यापूर्वी त्याने आपल्याजवळ असलेला कोह-इ-नुर हिरा बादशहाला नजर केला. मीरजुम्लाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अमिनखान याला औरंगजेबाने आपल्याकडे ठेवून घेतले आणि शाहिस्तेखानाची बंगालच्या सुभ्यावर नेमणूक केली. सन १६९६ साली औरंगजेबाने आपला नातू अजीमउश्नान याची बंगालच्या सुभ्यावर नेमणूक केली. सन १७०१ साली मुर्शीदकुलीखान याची अजीमउश्नानच्या हाताखाली बंगालच्या दिवाणीवर नेमणूक झाली.
मुर्शीदकुलीखान हा मुळाचा ब्राह्मण असून पुढे मुसलमान झाला होता.

त्यावेळी बंगालचे मुख्य ठाणे ढाका येथे होते. मुर्शीदकुलीखान ढाका सोडून मुकसदाबाद येथे गेला. कारण ही जागा मध्यभागी असून राज्यकारभाराच्या दृष्टीने अत्यंत सोयीची होती. सन १७०४ साली त्या ठिकाणी त्याने नवाबाचे मुख्य ठाणे वसवले आणि त्या शहराचे नाव बदलून आपल्या नावावरुन मुर्शिदाबाद ठेवले. सन १७१३ साली मुर्शीदकुलीखानाची बंगालच्या सुभ्यावर नेमणूक झाली. हा मुर्शीदकुलीखान १७२५ मध्ये मरण पावला. नंतर त्याचा जावई सुजाखान याला बंगालचा कारभार मिळाला. सुजाखानाच्या हाताखाली हाजीमहंमद आणि अलिवर्दीखान हे दोन अफखान सरदार राज्यकारभारप्रमुख बनले. अलिवर्दीखानाचा पुतण्या झैनउद्दीन याचा निकाह अलिवर्दीखानाच्या मुलीसोबत झाला. नंतर त्याला एक मुलगा झाला त्याचे नाव ठेवले मुहंमद! हा मुहंमद म्हणजेच नंतरच्या काळात प्रसिद्धीस आलेला सिराजउद्दौला!

मराठ्यांचा बंगालमध्ये प्रवेश ( सन १७४१ )

बंगालमध्ये मराठ्यांचा प्रवेश ही एक महत्त्वाची घटना होती. पण त्यापुर्वी काही घटनांचा मागोवा घेणं आवश्यक ठरतं. सन १७३७ साली शाहू महाराजांची मिरजेवर मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी स्वारी झाली. या मोहिमेत शाहू महाराज स्वतः उपस्थित होते. या मोहिमेदरम्यानच त्यांनी रघुजी भोसलेंना कर्नाटकावर स्वारी करण्याची आज्ञा केली. ” त्रिचिनापल्ली, चंदावर, आरकाट, श्रीरंगपट्टण, शिरे, अदवानी, कर्नूळ, कडपे व इतरही महाल घेण्याची आज्ञा केली. ” या मोहिमेत फत्तेसिंह भोसले हे देखील सामील झाले होते.
कर्नाटकाचा नवाब होता दोस्तअली! त्याचा जावई हुसैन दोस्तखान उर्फ चंदासाहेब हा एक हुशार गृहस्थ होता‌. सन १७३२ पासून चंदासाहेबाला थोडेफार प्राधान्य मिळू लागले. त्याने राज्याचा महसूल वाढवला. सन १७३६ साली त्याने त्रिचिनापल्ली जवळ एक लहानसे हिंदूराज्य होते. तिथल्या राणीसोबत संधान बांधून त्याने त्या राज्याचा ताबा घेतला.

बंगालवर स्वारी करण्यापूर्वी नानासाहेबांना बुंदेलखंडातला आपला पाया मजबूत करायचा होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे भविष्यात निजामाला दिल्लीची मदत कधीही मिळू नये हे होते. मराठ्यांचा ताबा हा यमुनेपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे बाजूचा काशि-बंगालचा प्रदेश मराठ्यांना घेणं हे सोपं जाणार होतं. कर्ज वापरून बंगालपर्यंत पोहोचण्याची गरज निर्माण झाली आणि यामध्ये रघुजी भोसले आणि नानासाहेबांमध्ये खटके उडाले. पेशव्याचं आणि रघुजी भोसल्यांच उभं हाडवैर! याआधीही बाजीराव आणि रघुजी याचं एकमेकांसोबत कधीही जमलं नाही. पण रघुजी आणि बाजीराव दोघेही पराक्रमी असल्यामुळे रघुजींनी फारसा विरोध कधी केला नसल्याचे रियासतकार म्हणतात.

मिरज स्वारीदरम्यान शाहू महाराजांनी आज्ञा केल्याप्रमाणे रघुजींनी कर्नाटकावर स्वारी करून त्यात चांगल्याप्रकारे यश मिळवले. रघुजी कर्नाटक मोहिमेवर असतानाच त्यांना बाजीरावांचं निधन झाल्याची खबर मिळाली. आता नावा पेशवा कोण हा प्रश्न तयार झाला. बाबूजी नाईक म्हणजे पेशव्यांचे मेहुणे! पेशवाई नानासाहेबांएवजी बापुजी नाईकांना द्यावी असे मत रघुजी भोसल्यांचे होते आणि त्यामुळे ते काही काळ साताऱ्यास आले. सन १७४१ च्या पावसाळ्यात नानासाहेब उत्तरेतून आणि रघुजी कर्नाटकाहून चंदासाहेसोबत एकाच वेळी साताऱ्यामध्ये आले.

रघुजी भोसल्यांनी बंगालच्या सुभ्यावर भास्कर रामांची नेमणूक केली.

बंगाल! मोगल काळात सुरत आणि बुऱ्हाणपुर या शहरांचा जसा नावलौकिक होता तसाच नावलौकिक हा बंगाल प्रांताचा होता. इंग्रजांनी आपल्या साम्राज्यविस्ताराची सुरुवात ही बंगाल पासूनच केली. तर अशा या बंगालच्या सुभ्यावर रघुजी भोसल्यांनी त्यांचे दिवाण भास्कर राम यांची नेमणूक केली. भास्कर रामांनी १७४१ पासून १७४३-४४ पर्यंत बंगालवर स्वाऱ्या केल्या.

दिल्ली-पंजाबसारखे प्रांत नादिरशहाने लुटले, दक्षिणेकडून बादशहाला फारसा महसूल कधी मिळाला नाही. माळवा आणि बुंदेलखंड मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतले अशा परिस्थितीत एक बंगालच होता. पण त्यावरही नानासाहेब आणि रघुजी भोसल्यांची नजर होती आणि यामुळे बादशहा पुरता घाबरला होता. सन १७४१ सालचा दसरा झाल्यावर नानासाहेब आणि रघुजी दोघेही बंगालच्या मोहिमेवर निघाले. वर सांगितल्याप्रमाणे बंगालचा सुभेदार असलेल्या मुर्शिदकुलीखानाचा ३० जून १७२७ रोजी मृत्यू झाला. नंतर त्याचा जावई शुजाखान याला बंगालची सुभेदारी मिळाली. नादिरशहा स्वारीवर असताना म्हणजे दि. १३ मार्च १७३९ रोजी शुजाखानाचाही मृत्यू झाला. शुजाखानानंतर मात्र बंगालची अवस्था बिकट होण्यास सुरुवात झाली.
कारणही तसेच होते. मोगल बादशहीत वंशपरंपरा सुरु होती. आणि त्यामुळे शुजाखान उर्फ शुजाउद्दीनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सरफराजखान गादीवर आला. पण तो व्यसनी , विलासी आणि थोडासा गाफील असल्यामुळे अलिवर्दिखानाने जबरदस्तीने ती सुभेदारी बळकावली आणि नेमकी याच वेळी मराठ्यांनी बंगालमध्ये प्रवेश केला.

अलिवर्दीखान हा मुळचा एक तुर्क सरदार असून तो १७२६ साली बंगालच्या नवाबाच्या सेवत दाखल झाला. अंगात असलेल्या हुशारीमुळे तो लवकरच नवाबाचा लष्करी अंमलदार बनला. यामुळे त्याला महाबतजंग असा किताब मिळाला. दि. १० एप्रिल १७४० रोजी घेरीया जवळ अलिवर्दीखान आणि सर्फराजखान यांची लढाई झाली. या लढाईत सर्फराजखान मारला गेला. शाहू महाराजांनी मुलुखगिरीची क्षेत्रं वाटून दिली होती. देवगडचंदा पासूनचा पुढचा प्रदेश हा रघुजी भोसल्यांच्या क्षेत्रात येत होता. १७३८ साली शाहू महाराजांनी रघुजींना मुलुखगिरीची सनद देऊ केली. त्यात ‘ सुभा लखनौ, बेदर, मुकसुदाबाद, बुंदेलखंड, अलहाबाद, पाटणा व ढाका अशी क्षेत्रं आहे.’
यापैकी बुंदेलखंडावर आपला ताबा पेशव्यांनी कधीच बसवला होता. मुलुखगिरीला जाण्याची दोघांची म्हणजे नानासाहेब व रघुजींची योजना साताऱ्यासच ठरली. शाहू महाराजांचा निरोप घेऊन रघुजी लगेचच नागपुराला गेले.

बंगालच्या सुभेदाराचा एक अंमरदार मीर हबीब रघुजींकडून मदत घेण्यासाठी नागपुराला ठाण मांडून बसला होता. हा मीर हबीब इराणात शिराज प्रांतातला असून खूप वर्षांपासून मुर्शिदकुलीखानाच्या पदरी नोकरी करत होता.
त्याला फारसी भाषा उत्तर प्रकारे येत होती. ओरिसाचा कारभार बरीच वर्ष मीर हबीब पहात होता. नंतरच्या काळात अलिवर्दिखानाने सर्फराजखानाला मारुन मुर्शिदकुलीखानाच्या संपूर्ण कुटुंबाला मारले. नेमकी यावेळी रघुजींचा पराक्रम हा चारही बाजूला पसरला होता.

कर्नाटक मोहिमेत दमालचेरीच्या लढाईत सफरदरअलीला मारून रघुजींनी कर्नाटकचा नबाब अक्षरशः धुळीस मिळवला. यावेळी त्रिचिनापल्लीचा ताबा घेऊन दोस्तखान उर्फ चंदासाहेबाला कैद करून साताऱ्यास आणले. तेव्हा अलिवर्दीखानाचा पाडाव करण्यासाठी रघुजींसारखा सरदारच हवा असे मीर हबीबला वाटले. यामुळे मीर हबीबचे दूत रघुजींना कर्नाटकातच जाऊन भेटले. रघुजींनी त्यांना अश्वासन देऊन आणि पत्रे घेऊन नागपुरास भास्कर रामांकडे पाठवले. सन १७४१ साली भास्कर रामांनी बंगालवर हल्ला चढवला. यातूनच पुढे भास्कर रामांचा खून घडून आला.
क्रमशः
बंगालचे राजकारण आणि मराठे भाग ०२

संदर्भ –
१) ब्रिटिश रियासत – भाग -१ – गो.स.सरदेसाई.
२) मुसलमानी रियासत – भाग-२- गो.स.सरदेसाई.
३) मराठी रियासत- ( थोरले नानासाहेब )- गो.स.सरदेसाई.
४) मराठ्यांचे साम्राज्य- रा.वि.ओतुरकर.
५) राजवाडे- खंड-०३ – ले. २०८, २२०.
६) पेशवे दफ्तरातील निवडलेले कागद- खंड- २०, २१,२७.
७) ऐतिहासिक पत्रव्यवहार – ले.३५
८) The History of Marathas – Grant Duff.
९) The fall of mughal empire – vol.1 – Jadunath sarkar.
१०) The extraordinary epoch of Nanasaheb peshwa – Uday kulkarni.

– निशांत कापसे.

Leave a comment