हाडपक्या गणपती, नागपूर

हाडपक्या गणपती, नागपूर

हाडपक्या गणपती, नागपूर –

नागपूरातील प्राचीन परंपरेतील ऐतिहासिक उत्सव म्हणजे ‘हाडपक्या गणपती ‘.गणेशेत्सव संपल्यानंतर सुरू होतो तो पितॄपक्ष.पितॄपक्षात सर्व धार्मिक कार्य,उत्सव काही प्रमाणात निषिद्ध असतात. परंतु आपल्या नागपूरात/ विदर्भात हाडपक्या गणपती उत्सव साजरा केला जातो. ह्या गणपती उत्सवाचे स्वरूप घरघुती नसले तरी सार्वजानिक स्वरूप आहे. नव्वदीच्या दशकापर्यंत मोठ्या प्रमाणात सार्वजानिक रित्या हा उत्सव साजरा होत असत परंतु आता काही मोजक्याच ठिकाणी हा उत्सव साजरा केला जात आहे. आजही नागपूर आणि विदर्भातील अनेक तालुक्यात आणि गावागावात हाडपक्या गणपती उत्सव साजरा करण्यात येते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ह्या हाडपक्या गणपती ची महिती घेऊया.

विदर्भात पितॄपक्षाला हाडपक असे म्हणतात. हाडपकात बसविलेला हा ‘ हाडपक्यागणपती ‘ होय. राजे भोसले यांचे नागपूरात आगमन झाल्यानंतर अनेक प्रथा परंपरांची सुरुवात नागपूरात झाली. भाद्रपद गणपतीउत्सव त्यातील एक होय. दरवर्षी गौरी गणपतीउत्सव नियमित पणे नागपूरात साजरा होत असत.  इ. स. १७५५ मध्ये नागपूरकर भोसले घराण्यातील तत्कालीन राजे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमनाबापू हे बंगाल च्या स्वारीवर होते. बंगाल वर ऐतिहासिक विजय मिळवून परत येत असताना कुळाचारी गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले गणपतीउत्सव साजरा करू शकले नाही. त्यावेळी राजपुरोहित व अन्य विद्वानांसोबत चर्चा  करून पितृपक्षातील भाद्रपद कृष्ण चतुर्थी ( भाद्रपद संकष्टी चतुर्थी ) ला गणपतीउत्सव साजरा करण्याचे ठरविले, आणि त्यासोबत बंगाल वर ऐतिहासिक विजय मिळविण्याच्या आनंदोत्सव सुद्धा सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले.

लावण्या, नकला, खडी गंमत इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अनेक गंमत जमतीचे कार्यक्रम होत असत त्यात थट्टा – मस्करी इत्यादींचा भडीमार होत असत आणि मस्करी चा अपभ्रंश होऊन ‘ मस्कऱ्या ‘ हे स्थानीय बोलीभाषेतील नाव प्रचलित झाले आणि हा गणपती ला  ‘मस्कऱ्या गणपती ‘ नावाने सुद्धा प्रसिद्ध झाले.

असे म्हणतात की लोकमान्य टिळकांनी ह्याच गणपती उत्सवाची प्रेरणा घेऊन भाद्रपद गणपती उत्सव सार्वजानिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले.

‘ हाडपक्या गणपती ‘ उत्सवाचा मुख्य सोहळा नागपूरातील सिनियर भोसले राजवाडा, महाल येथे आयोजित करण्यात येते. श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले यांचे काळात हाडपक्या गणपती ची १२ हाताची ,२१फूट उंच मूर्ती स्थापन केली जात होती. आता सुद्धा त्याच प्रकारची मूर्ती स्थापन करण्यात येते. लावण्या, पोवाडे, खडी गंमत इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम  आयोजित करण्यात येते. नऊ दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो.या दरम्यान भव्य महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित करण्यात येते. भाद्रपद कृष्ण द्वादशी ला गणपतीउत्सवाची सांगता होऊन हाडपक्यागणपती चे विसर्जन करण्यात येते.

धिरज लिंगे, नागपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here