देवळे गावचा श्रीखडगेश्वर !!

देवळे गावचा श्रीखडगेश्वर !!

देवळे गावचा श्रीखडगेश्वर !!

रत्नागिरी-कोल्हापूर गाडीमार्ग संगमेश्वर तालुक्यातून जातो. या मार्गावर असलेल्या दाभोळे गावापासून आत ४ कि.मी. वर वसले आहे देवळे गाव. तसेच दुसरा रस्ता देवरुख साखरपा मार्गावर देवळे फाटा आहे. तिथून देवळे गाव १४ कि.मी. आहे. देवळे गाव फार प्राचीन, हे पूर्वी महालाचे ठिकाण होते. देवळे महालात ४६ गावे होती आणि त्या गावांची खोती कुणाकडे होती यांची सन १८४६ मधली एक यादी उपलब्ध आहे. त्यानुसार देवळे, चाफवली, करंजारी, मोर्डे, जंगलवाडी, निवघे, दाभोळे, सालपे, वेरवली खु. गोविल, वेरवली बु. वांजोळे या गावी ‘सरदेसाई’ खोत होते. मेघी इथे मुकादम, चोरवणे इथे चिरमुले, आंजणारी इथे पोतदार, शिपोशी इथे आठल्ये अशी विविध नावे मिळतात. इ.स. च्या १६ व्या शतकाच्या प्रारंभी खिळणा (खेळणा/विशाळगड) मामला निर्माण केला. त्यात देवळे, हातखंबे, हरचिरी, आणि अर्धा देवरुख असा भाग समाविष्ट केला. त्यावर कुलकर्णी म्हणून कश्यप गोत्री पंडित घराण्याला व पोतदार म्हणून अत्रि गोत्री ओरपे यांना नेमले. प्रसिद्ध इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार हे आंजणारी गावच्या खोतांपैकी होते. तसेच दत्तसंप्रदायातील मोठे अधिकारी व्यक्ती श्री रंगावधूत हे सुद्धा याच देवळे गावाचे होत.श्रीखडगेश्वर.

देवळे गावात काळेश्वरी, भैरी, रवळनाथ अशी मंदिरे आहेत. पण त्यातही श्री खडगेश्वराचे महत्व सर्वात जास्त. मंदिराचा इतिहासही बराच प्राचीन. तो जातो अगदी इ.स.च्या १२ व्या शतकापर्यंत मागे. उत्तर चालुक्य राजांच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली. त्याची कथा मोठी सुंदर आहे.

कुणा एका करकरे नामक गृहस्थांकडे दाभोळची म्हैतर नावाची व्यक्ती गुराख्याचे काम करी. गुरे चारणे, सांभाळणे हे त्यांचे काम. एकदा म्हैतर यांच्या लक्षात आले की एक गाय दूध कमी देते आहे. त्यांनी त्या गाईवर लक्ष ठेवले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की जंगलात एका विशिष्ट ठिकाणी ती गाय पान्हा सोडते. ही घटना त्याने मालकांच्या कानावर घातली. मालक हातात कोयता घेऊन त्या ठिकाणी गेले आणि जिथे गाय पान्हा सोडते त्या ठिकाणी घाव घातला. तिथे होती शिवपिंडी. कोयत्याचा घाव शिवपिंडीवर बसताच त्याचा एक कळपा उडाला. त्यावरून या देवाला खडगेश्वर नाव पडले अशी एक कथा. तो घाव घातल्याची खूण शिवपिंडीवर आजही स्पष्ट दिसते. पुढे देवळे गावात आठल्ये मंडळींचे आगमन झाले. या शिवभक्त मंडळींनी श्रीखडगेश्वरालाच आपले आराध्यदैवत मानले.

श्री खडगेश्वराबद्द्ल अजून एक कथा सांगितली जाते. सन १२०८ च्या दरम्यान कोल्हापूर शिलाहार राजा गंडरादित्य याचे या प्रदेशावर राज्य होते. त्याकाळी देवळे महाल म्हणून प्रसिद्ध होता. या परिसरात भ्रमंती करत असताना राजाळा जंगलात वसलेल्या या देवस्थानाचा शोध लागला. त्यांनी आपले स्नेही बल्लाळपंत दीक्षित यांच्यावर या देवस्थानाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सोपवली. त्यासाठी उत्तरेकडील बावनदीपासून दक्षिणेकडील मुचकुंदी नदीपर्यंतचा ४८ खेड्यांचा मुलुख देवस्थानच्या व्यवस्थेसाठी जोडून दिला. पुढे कोल्हापूरच्या खिद्रापूरला देवगिरीचा यादव राजा सिंघण आणि करवीरचे शिलाहार यांच्या युद्ध झाले आणि त्यात शिलाहारांचा पराभव तर झालाच शिवाय भोजराजा यादवांचा कैदी झाला. राजाश्रय तुटला म्हणून बल्लाळपंत दीक्षित यांनी आपले खड्ग देवाला अर्पण केली. तेव्हापासून खड्ग अर्पण केलेला तो खड्गेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला.

श्रीखडगेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर देखण्या दीपमाळा आहेत. प्रशस्त सभामंडप आणि मंडपातील लाकडी खांबांवर केलेले नाजूक कोरीव काम प्रेक्षणीय आहे. शिपोशी गावातील की. रामकृष्णशास्त्री आठल्ये यांनी दिलेल्या देणगीतून इथे धर्मशाळा उभी आहे. माघ वद्य नवमी ते अमावस्या या काळात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव इथे साजरा केला जातो. महाशिवरात्रीला इथे तांदळाची महापूजा बांधली जाते. त्यावेळी इथे मोठीच जत्रा भरते. सहा दिवस चालणाऱ्या उत्सवात आरत्या, छबिना, कीर्तन यांसारखे पारंपारिक पौराणिक कार्यक्रम असतात. त्याचबरोबर इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री श्रींची मूर्ती पालखीत ठेवून देवळाभोवती फिरवली जाते. मंदिराच्या परिसरात काही वीरगळ मांडून ठेवलेले दिसतात.

देवळे गाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाण होते. याची साक्ष आजही विविध स्थापत्य अवशेषांतून पटते. उदाहरणार्थ या गावात आढळणारी जुन्या घरांची जोती, प्राचीन काळी पाण्याचा प्रवाह अडवून बांधलेला दगडी बांध, आणि विविध ठिकाणी आढळणारे वीरगळ ही आजही या गावाच्या प्राचीनत्वाची ग्वाही देत आहेत. या गावात बऱ्याच लढाया झाल्याचे उल्लेखही आहेत. इथे मोठ्या संख्येने असणारे वीरगळ हे याचीच साक्ष देतात. ८०० वर्षांपासूनचे जुने देवस्थान असलेले श्रीखडगेश्वर मंदिर हे इथल्या पंचक्रोशीचे भूषण तर आहेच पण त्याचबरोबर गावाचे प्राचीनत्व आणि महत्व सांगणाऱ्या विविध वास्तू देवळे गावाचे मोठेपण अधोरेखित करतात. हे मंदिर आणि हा देवळे गाव म्हणजे कोकणच्या निसर्गात दडलेला एक अनमोल खजिनाच म्हणावा लागेल.

आशुतोष बापट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here