महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,503

प्रजाहितदक्ष शंभुछत्रपती

By Discover Maharashtra Views: 1400 2 Min Read

प्रजाहितदक्ष शंभुछत्रपती –

रामचंद्रपंत यांनी आज्ञापत्रात ‘प्रजा ही राज्याचा जीवनोपाय’ असे म्हटले आहे. स्वराज्यातील रयत हा स्वराज्याचा प्राण. रयत सुखी करणे, पीडा मुक्त करणे हे शिवरायांचे ध्येय होते. शिवरायांच्या अनेक पत्रांतून जनते विषयी आस्था व कळवळा दिसून आला. रयतेला काडीएवढा किंवा जिऱ्या एवढा अर्थात कणभर ही त्रास द्याचा नाही अशी महाराजांची ताकीद होती. प्रस्तुत लेखात संभाजी महाराज यांची दोन पत्रे पाहणार आहोत, ज्यात हीच शिकवण/ताकीद आपल्याला पत्राच्या माध्यमातून पहायला/वाचायला मिळते.(प्रजाहितदक्ष शंभुछत्रपती)

प्रथम पत्र हे ६नोव्हेंबर १६८०चे आहे.मोरया गोसावी यांना व त्यांच्या माणसांना लष्कराच्या माणसांकडून त्रास होत होता म्हणून संभाजी महाराज यांनी लष्कराच्या सुभेदार, जुमलेदार व कारकुनांना ताकीद दिली आहे/ताकीद पत्र लिहलं आहे. मोरया गोसावी यांचे वास्तव्य मोरगाव ला असत. तेथे ते कुटुंबासह राहतात, तुम्ही येता जाता त्यांच्या माणसांना, शेतास गुरेढोरांस काडीचा उपद्रव न देणे. ते सुखरूप राहतील असे करा आणि त्यांच्या वाटे न जाणे.

दुसरं पत्र हे ४ऑगस्ट१६८७चे आहे. १६८०ला ताकीद देऊन सुद्धा त्रास काही कमी झाला नाही, म्हणून शंभूछत्रपती यांनी लष्कराचा सुभेदार, जुमलेदार, कारकून, हवालदार, बारगिर या लोकांना अत्यंत खरमरीत पत्र लिहलं. पत्रातून शंभुराजे यांचा रुद्र अवतार दिसतो. त्यात ते म्हणतात की श्री मोरया गोसावी यांची आज्ञा होती की त्रास देऊ नये. असे असताना तुम्ही उगाच चिंचवड गावाला त्रास देता. रायतेकडून गैरकानुनी मागता असे समजले. या गावात तुम्हला उपद्रव करायची काय गरज? पुढे ते लिहतात की हे ढंग(लोक) स्वामीस(छ्त्रपतीस) कैसे मानो पाहतात?? या उपरी बदराह वर्तणूक केलिया तुमचा एकंदर मुलाहिजा होणार नाही, जे धामधूम करतील त्यास स्वामी जिवेच मारतील! हे जाणोन मजकुरासी(चिंचवड) तसदी न देणे बोभाटा( तक्रार) न येऊन देणे, ताकीद असे!

वरील दोन्ही पत्रांतून प्रजे विषयीची काळजी साफ दिसून येते. आणि छत्रपती रयतेचे राजे का होते हे कळून येत.

संदर्भ:-श्रीमन् महासाधु श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे.

-प्रथमेश खामकर

Leave a comment