महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,29,036

३ वर्ष मोगली फौजेसह थैमान घालणारा शाईस्ताखान निमूटपणे बंगालकडे रवाना..!!

Views: 3
3 Min Read

शाईस्ताखान निमूटपणे बंगालकडे रवाना..!!

मार्गशीर्ष शुद्ध १२, शके १५८५, शोमननाम संवत्सर, मंगळवार दि.१ डिसेंबर १६६३’ रोजी स्वराज्यात सतत ३ वर्ष मोगली फौजेसह थैमान घालणारा शाईस्ताखान निमूटपणे बंगालकडे रवाना झाला. अमिरुल उमरा, नवाब ए आझम, खान ए खानान, मिर्झा अबू तालिब उर्फ शाईस्ताखानाची श्री शिवाजी महाराजांनी ५ एप्रिल १६६३ च्या मध्यरात्री थेट लाल महालात घुसून बोटं तोडून फटफजिती केल्यानंतर अवघ्या ३ दिवसांतच म्हणजे दि.८ एप्रिल १६६३ रोजी खान फौजेसह पुण्यातून औरंगाबादची वाट चालायला लागला.

ह्या सर्व त्याच्या फजितीच्या बातम्या औरंगजेबाला दि.८ मे १६६३ रोजी तो काश्मीरच्या वाटेवर असताना कळल्या. तेव्हा तो भयंकर संतापला. ह्या सगळ्या नाचक्कीचे खापर बादशहाने शाईस्तेखानाचा निष्काळजीपणा आणि बेवकुफी यावर फोडलं. बादशहाची शाईस्ताखानावर इतराजी झाली. शाईस्ताखान हा निष्काळजी राहीला असे त्यांस वाटले, त्यामुळे त्याने तडकाफडकी तिथून शाईस्ताखानाची बदली थेट बंगालच्या सुभ्याचा सुभेदार म्हणून केली. त्याकाळी बंगालची सुभेदारी म्हणजे ‘सुळावरची पोळी’ समजत. खुद्द बादशहा औरंगजेबाच्या मते बंगालचा सुभा म्हणजे ‘भोजनसामग्रीनेयुक्त नरक’ होता. अनायासे मीर जुमल्याचा मृत्यू झाल्याने तिथली जागा रिक्त झालेली होतीच. त्यामुळे आपली बदली औरंगजेबाने तिकडे केल्याचे ऐकून शाईस्ताखान कष्टी झाला. त्याला वाईटही वाटलं. त्याने बादशहा औरंगजेबाला अर्ज केला की, ‘आपण मला दक्षिणेसच राहू द्यावे शिवाजीने माझ्यावर दगाबाजीने हल्ला करून माझ्या मुलाला ठार मारले आहे. माझी बोटं कापली आहेत. मी शिवाजीचे सैन्य नष्ट करून त्याला ठार मारीन किंवा या कामात स्वतःचे प्राण तरी गमवीन.’

शाईस्तेखानाच्या मित्रांनी त्याच्या वतीने औरंगजेबापाशी शक्य तितकी रदबदलीची केली पण औरंगजेबाने काहीही ऐकलं नाही, खानाच्या अर्जाचा विचार न करता त्याने तो सरळ धुडकावून लावला वर उलट पुन्हा खानास त्याने बंगालकडे रवाना होण्यासच फर्मावले. शाईस्तेखानानी पुन्हा लाचारीचा अर्ज पाठवला की, ‘आपण मला दक्षिणेतच राहू द्या, शिवाजी नष्ट होईपर्यंतच्या मोहिमेचा खर्च मी स्वतः करण्यास तयार आहे.” त्याने काही दरबारी मंडळींकरवी बादशहावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला पण औरंगजेब नमला तर नाहीच उलटपक्षी त्याने कडक शब्दात खानाची हजेरी घेताना अस म्हटलं की, “शाईस्ताखान क्षुब्ध झाला आहे, क्षोभात असलेला माणूस विवेकाने वागेल हे संभवत नाही. शिवाजीविरुद्ध मोहीम चालवण्यासाठी खान दक्षिणेतच राहिला तर आमच्या फौजेची वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही.” पुढे बादशहाने खानास निक्षून कळवले की, ‘आता कुठलाही वाद न घालता तुम्ही ताबडतोब बंगालकडे रवाना व्हा..’

हा निर्वाणीचा हुकूम आल्यावर मात्र शाइस्ताखान दुःखी मनाने पावसाळ्यानंतर म्हणजे मंगळवार दि.१ डिसेंबर १६६३ रोजी ससैन्य बंगालकडे रवाना झाला.

© स्वराज्यसेवक

संदर्भ :
१) शककर्ते शिवराय : खंड १ – विजय देशमुख
२) राजा शिवछत्रपती : पूर्वार्ध – बाबासाहेब पुरंदरे
३) असे होते मोगल : निकोलाय मनुची : अनुवाद – ज. स. चौबळ
४) औरंगजेबाचा इतिहास : जदुनाथ सरकार : अनुवाद : भ. ग. कुंटे

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल
    Leave a Comment