महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,73,845

दुर्गेचे पहिले रूप शैलीपुत्री | नवरात्री विशेष भाग १.

By Discover Maharashtra Views: 3535 3 Min Read

दुर्गेचे पहिले रूप शैलीपुत्री.

दुर्गेचे पहिले रूप शैलीपुत्री या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले आहे.

वन्दे वञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम् |

वृषारूढाम् शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ||

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला ‘मूलाधार’ चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव ‘सती’ असे होते. त्यांन विवाह भगवाण शंकरांशी झाला होता.

एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा भगवान शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा भगवान शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही.

भगवाण शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली. सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने भगवान शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते.

हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले. आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती भगवान शंकराला मिळाल्यावर त्यांनी लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती ‘शैलपुत्री’ या नावाने प्रसिद्ध झाली.

पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. ‘शैलपुत्री’ देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली.  म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

 लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

Leave a comment