महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,518

समुद्र महल – वरळी,मुंबई | शिंदेशाहीचे वैभव

By Discover Maharashtra Views: 3697 5 Min Read

समुद्र महल-वरळी,मुंबई (Sea palace – Worli, Mumbai)

मुंबईत सर्वाधिक समृद्ध,वैभवसंपन्न, भव्य-दिव्य अशी निवासस्थाने होती.परंतु या मध्ये प्रामुख्याने तीन निवासस्थाने अग्रस्थानी येतात अर्थात त्यांचे वैभव बाकीच्यांच्या तुलनेने नगण्यच म्हणावे लागेल.ती म्हणजे सर दिनशॉ पेटीस्ट्सचा पेटिट हॉल, बडोद्याच्या गायकवाड सरकारांचा जय महाल आणि ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांचा समुद्र महल(Sea Palace).दुर्दैवाने रिअल इस्टेट तसेच देखभालीसाठी लागणाऱ्या अत्यंत उच्च खर्चामुळे हि तीनही निवासस्थाने जमीनदोस्त करण्यात आली.

समुद्र महल च्या जागेवर सध्या उभ्या आहेत ईडन हॉल, माधुली अपार्टमेंट्स, शिवसागर इस्टेट,सीजे हाऊस आणि पूनम चेंबर्स या मोठ्या इमारती.एकेकाळी मुबईचा एक अविभाज्य भाग असणारा समुद्र महल शिंदे सरकारांनी इथे का बांधला असावा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

बऱ्याच संस्थानचे राजे,राजपुत्र ठिकठिकाणी प्रवास करू लागले.मुंबई हे एक व्यापार व अनेक गोष्टीसाठी एक महत्त्वाचे व प्रमुख केंद्र होते.त्यामुळे अनेक संस्थानचे राजे बराच काळ हा मुंबईला घालवत.महाराजा माधवराव शिंदे (प्रथम) हे त्यापैकी एक होते.त्याकाळी ग्वाल्हेर संस्थान अत्यंत वैभवशाली व धनाढ्य होते. प्रचंड प्रमाणात आर्थिक सुबत्ता असणाऱ्या संस्थानचे महाराज माधवराव शिंदे(प्रथम)हे बुद्धिमान होते. त्यांनी बऱ्याच उद्योगधंद्यामध्ये आर्थिक गुंतवणूक करून ठेवली होती.यातुन होणाऱ्या नफ्याचा फायदा ग्वाल्हेर संस्थानला होऊन ग्वाल्हेर संस्थान एक सक्षम संस्थान म्हणून उभे होते.

महाराजा माधवराव शिंदे यांना असे वाटू लागले की मुबईमध्ये आपले एक निवासस्थान असावे म्हणून त्यांनी आगा खान याच्याकडून वरळी पॉइंट्सवर 20 एकर जमीन खरेदी केली.ही जमीन तीनही बाजूने समुद्राने वेढली होती. जिच्या एका बाजूला मार्कंडेश्वर शिव मंदिर तसेच दुसऱ्याबाजूला हाजी अली दर्गा होता.ग्वाल्हेर राज्याचेआर्किटेक्ट जॉन रिची याच्यावर माधवराव महाराजांनी एक भव्य राजवाडा बांधण्याची जबाबदारी सोपविली.जॉन रिचीने आधुनिक शैली वापरून टेकडीवर नेत्रदीपक असा राजवाडा बांधला.विशाल व सुंदर राजवाडा उत्कृष्ट टेकवूड, संगमरवरी, व बोहेमियन झूमर वापरून बांधला गेला.त्याच्याभोवती मॅनिक्युअर लॉन,कारंजे आणि उत्तमरीत्या कापलेले फ्लॉवरबेड्स टाकून सुंदर पार्क केले गेले.उर्वरित इस्टेट मध्ये स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट,व्यायामशाळा आणि स्टाफक्वार्टर्स आणि विस्तृत अस्तबल असलेले क्लब हाऊस होते.

1925 साली बांधून झालेला समुद्र महल माधवराव महाराजांना खूप आवडला.त्यांनी असे स्पष्टपणे सांगितले होते की समुद्र महल कधीच विकू नये.त्यानंतर लगेचच महाराजांचे निधन झाले.त्यांचे पुत्र महाराज जीवाजीराव शिंदे यांनी शिंदे आणि समुद्र महल यांचा प्रेम संबंध पुढे असाच कायम ठेवला.महाराज जिवाजीराव शिंदे हॉर्स रेसिंगचे शौकीन होते तसेच त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे शर्यतीसाठी लागणारे व उत्तम जातीचे घोडे होते.मुंबईमध्ये रेसिंगच्या हंगामाला नोव्हेंबरमध्ये सुरूवात होत असत व शेवट मार्चमध्ये होत.या रेसिंगच्या हंगामात महाराज जिवाजीराव समुद्र महल मध्ये आपला वेळ घालवत.घोड्यांच्या शर्यतीनंतर जिंकलेल्या घोड्यांना व जिवाजी महाराजांना पाहण्यासाठी रेसकोर्स मार्गापासून ते रस्त्याच्या कडेला लोकांची प्रचंड गर्दी होत असत.

महाराज जिवाजीराव शिंदे आपल्या वैयक्तिक विमानाने मुंबईला जात.सोबत त्यांचे खास साथीदार असत. ग्वाल्हेर संस्थानचे वरिष्ठ अधिकारी हे स्वतंत्रपणे मुबईला येत असत.यावेळी तब्बल 50 पेक्षा जास्त कार या ग्वाल्हेरहून मुंबईकडे रवाना होत असत.जिवाजीराव महाराजांच्यासोबत मोठा लवाजमा असत.ग्वाल्हेरहून निघणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये टायपिस्ट कारकून,कूक,वेटर, फिजिशियन,कंपाऊंडर्स, ड्राइवर इ. कर्मचारी सामील असत.हे कर्मचारी समुद्र महलातील कायमस्वरूपी कर्मचार्यांव्यतिरिक्त होते.अश्या प्रकारे काही महिन्यापर्यंत मुंबईतील वरळीचा हा भाग एका भव्य रियासतीतील सर्व लवाजम्यासह मिनी-ग्वाल्हेर मध्ये बदलला जाई.

समुद्र महल व जिवाजी महाराजांचे नाते खूप घट्ट होते. त्यांच्या आयुष्यात समुद्र महालला खूप महत्व प्राप्त झाले होते.जिवाजीराव महाराज व राजमाता विजयाराजे यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ समुद्रमहल मध्ये घालवला.राजमाता विजयाराजे यांचा वाढदिवस असताना महाराज जिवाजीराव शिंदे यांनी मुंबईच्या सर्व जवेलर्सना आपल्याकडे असणारे सर्व दागिने राजमाता विजयाराजे यांच्या समोर पेश करावेत असे आदेश दिले होते. महाराज माधवराव शिंदे(द्वितीय) यांचा जन्म याच समुद्र महल मध्ये झाला.

हॉर्स रेसिंगचे शौकीन व त्याचे महान संरक्षक म्हणून जिवाजीराव महाराजांची ओळख होती.समुद्रमहल मधली काही जागा महाराजांनी Ametuer club ला भाड्याने दिली की जेणेकरून घोडेस्वारीला चालना मिळेल.अश्याच प्रकारे पॅलेस मध्ये हौशी रायडिंग क्लबची स्थापना झाली.

हा समुद्र महल साक्षी होता थोर समाज सुधारक कर्मवीर भाऊराव पाटील व महाराज जिवाजीराव शिंदे यांच्या भेटीचा.महाराष्ट्रभर शिक्षणाची चळवळ उभारलेल्या भाऊराव पाटील यांनी त्यांचे शिक्षणप्रती असणारे लाखमोलाचे विचार महाराजांपुढे मांडले.रयत शिक्षण संस्था या वटवृक्षाची मुळे मजबूत होण्यासाठी त्यांनी महाराजांकडे मदत मागितली.जिवाजीराव महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व जामगाव येथे असणारे आपल्या पूर्वजांचे राजवाडे तसेच 1000 एकर जमीन व बागा रयत शिक्षण संस्थेला बहाल केली.

जिवाजीराव महाराजांनी आपली थोरली कन्या पद्मावतीराजे शिंदे यांचा विवाह त्रिपुराच्या महाराजांशी समुद्र महल मध्ये लावून दिला होता. हा विवाहसोहळा खूप भव्यदिव्य असा होता.तब्बल 10000 लोकांना या विवाहसोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.नंतरच्या काळात महाराजांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत गेली.अखेर 16 जुलै 1961 मध्ये महाराजांचे निधन झाले.

नंतरच्या काळात समुद्र महलच्या देखभालीसाठी भरपूर खर्च होऊ लागल्याने राजमाता विजयाराजे शिंदे यांनी समुद्रमहल विक्रीसाठी काढला.खरेदीदारांनी हा महल खरेदी केल्यानंतर तोडला व संगमरवरी,क्रिस्टलची विक्री केली.त्यावर शिवसागर इस्टेट नावाची मोठी इमारत बांधण्यात आली.

या जागेत आता समुद्र महल अपार्टमेंट, पूनम चेंबर्स,सीजे हाऊस, माधुली अपार्टमेंट या नावाच्या इमारतींचा समूह आहे.आता फक्त बाकी आहेत आठवणी समुद्र महल आणि शिंदे सरकारांच्या अतूट नात्याच्या..

©प्रसाद शिंदे सरकार-पानिपतकर

Leave a comment