कराडचे सरदार डुबल घराणे

कराडचे सरदार डुबल घराणे

कराडचे सरदार डुबल घराणे

स्वराज्य रक्षणासाठी दक्षिण महाराष्ट्रातील ज्या सरदार घराण्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यामध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा अग्रकमाने आहे. सातारा आणि सांगली जिल्हय़ात वास्तव्यास असणाऱया या घराण्याचा सुमारे 400 वर्षांहून अधिक कालखंडाचा इतिहास येत्या जून महिन्यात प्रसिध्द होत आहे. गेली सहा वर्षे संशोधन व अभ्यास करून दुर्मीळ ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे लिहिलेला हा इतिहास डुबल घराण्याचा दस्तावेज ठरणार असून नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे.स्वराज्याच्या उदयकाली महाराष्ट्रात अनेक लढवय्यी घराणी निर्माण झाली. त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्त्वाने मराठेशाहीत आगळा ठसा उमटवला. या घराण्यांमध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. साताराच्या छत्रपती शाहू महाराजांचे आप्त असणाऱया या घराण्यातील व्यक्तींनी प्रसंगीप्राणांची आहूती देऊन स्वराज्यरक्षण केले आहे. या घराण्याच्या शाखा कराड, धुळगाव, बांबवडे, चरेगाव, नरवाड येथे आहेत. या घराण्याला 400 वर्षांहून अधिक काळचा इतिहास आहे.साळोखे-डुबल घराणे हे गुजरातच्या चालुक्यांचेवंशज आहेत.

शिवपूर्वकालात हे घराणे महाराष्ट्रात आले असावे. हे घराणे पहिल्यांचा कराड येथे स्थायिक झाले. त्यानंतर या घराण्यातीलव्यक्तींनी आपल्या कर्तृत्त्वाने विविध अधिकारपदे मिळवली. कराड पेठेचे महाजनपद, कराड प्रांताचे देशचौगुले वतन, मिरजेच्या भुईकोट किल्ल्याचे किल्लेदारपद, सांगली संस्थानचे सरंजामदार अशा अनेक पदावर डुबल घराण्यातील व्यक्ती कार्यरत होत्या. आजही हे घराणे राजकारण, समाजकारणात कार्यरत आहे. या घराण्याचा साधार इतिहास मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर आणि कराडचे नानासाहेब राजेसाहेब डुबल यांनी लिहला आहे.मिरजचे इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी मिरजेचा इतिहास 2010 साली लिहला. या लेखनात डुबल घराण्याचा उल्लेख होता. मिरजेचे किल्लेदार असणाऱया डुबल घराण्याचा उल्लेख यात होता. त्यावेळी डुबल घराण्याच्या इतिहासाचा शोध घेण्याचा प्रयत्न नानासाहेब डुबल यांनी मानसिंगराव कुमठेकर यांच्या मदतीने केला. डुबल घराण्याच्या शाखा असणाऱया गावांना भेटी दिल्या. कराडमध्ये डुबल घराण्याची वंशावळ उपलब्ध झाली. तर धुळगाव येथे जुनी कागदपत्रे, फोटो मिळाले. त्यानंतर पुणे पुराभिलेख कार्यालयातील कागदपत्रांचे संशोधन करण्यात आले.

विशेष म्हणजे हा ग्रंथ लिहताना त्यातील प्रत्येक वाक्य साधार देण्यात आले आहे. या पुस्तकात पुर्वपीठिका, डुबल घराण्यातील पराक्रमी पुरूष, त्यांचे मानपान, लष्करी परंपरा, स्त्रियांची कामगिरी, प्रशासकीय काम, छायाचित्रे, ऐतिहासिक कागदपत्र यावर भर देण्यात आला आहे. इतिहासविषयक लिखाण कुमठेकर यांनी केले असून उर्वरित लिखाण नानासाहेब डुबल यांनी केलेले आहे.ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे लिहलेल्या या ग्रंथात कराडच्या इतिहासावर प्रकाश पडणार आहे. त्याचबरोबर डुबल घराण्याच्या शाखा असणाऱया सातारा व सांगली जिल्हय़ातील 400 वर्षांच्या इतिहासावरही प्रकाश पडणार आहे.कराड पेठेचे महाजनपद आणि देशचौगुले वतनकराड हे प्राचीन काळापासून व्यापारासाठी प्रसिध्द होते. सातवाहनकालापासून येथे मोठा व्यापार होता. त्यामुळे कराडची पेठ त्याकाळात संपूर्ण देशभरात प्रसिध्द होती. या प्रसिध्द पेठेचे महाजनपद डुबल घराण्याकडे होते. सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीतझालेल्या पालीच्या महजर (निवाडा) मध्ये साक्षीदारांच्या यादीत शिवाजी बिन बाळोजी डुबल यांचे नाव आढळते. त्यामुळे शिवपूर्वकालापासून कराडचे महाजनपद या घराण्याकडे होते, असे अनुमान बांधता येते. बाळोजी साळोखे हे या घराण्याचे मुळपुरूष होत. महाजनपदाबरोबरच कराड प्रांतातील देशचौगुलेपणाचे वतनही या घराण्याकडे होते.

सध्याच्या कराड, पाटण आणि सांगली जिल्हय़ातील काही गावे या देशचौगुले वतनासाठी डुबल घराण्याकडे असल्याचे आढळते.छत्रपती शाहूंचे आप्तबाळोजी डुबल (दुसरे) यांच्या पत्नी राणूबाई आणि साताराचे छ. शाहूंच्या पत्नी सकवारबाई या बहिणी होत. या आप्तसंबंधामुळे बाळोजींचा सातारच्या दरबारात प्रवेश झाला. तेथे त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कामाने छ. शाहूंचा विश्वास संपादन केला. सेना पंचसहस्त्री हा किताब मिळवला. तत्कालीन अनेक लढय़ात बाळोजींनी सहभाग घेतला.मिरजेचे किल्लेदारपदछ. शाहूंनी 1739 साली मिरजेच्या किल्ल्यावर स्वारी करून हा किल्ला मोगलांच्या ताब्यातून जिंकून घेतला. यानंतर त्यांनी हा किल्ला आणि मिरज प्रांताचा कारभार बाळोजींकडे सोपवला. सन 1745 पर्यंत बाळोजींनी मिरज प्रांतांचा कारभार नेटाने केला. बंडखोर सरदार उदाजी चव्हाण याच्या स्वाऱया परतवून लावल्या. मिरज प्रांताची घडी नीटबसवली. मिरज किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी बाळोजींना छ. शाहूंकडून तासगांव गाव मोकासा इनाममिळाले होते. तर, मिरज तालुक्यातील गुंडेवाडी हे गावही पूर्ण इनाम मिळाले.

बाळोजींनी आपले कुलदैवत असणाऱया म्हसवड येथील सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोध्दार केला. बाळोजींचे बंधू शिदोजी हे उंबरच्या स्वारीत धारातीर्थी पडले. त्यांच्या या कामगिरीचे स्मरण म्हणून छ. शाहूंनीबाळोजींना चरेगाव इनाम दिले.सरदार शिवाजी साळोखेबाळोजींचा मृत्यू 1745-46 च्या सुमारास झाला. त्यानंतर त्यांचे सुपूत्र शिवाजी साळोखे (दुसरे) हे काम पाहू लागले. शिवाजी साळोखेही आपल्या पित्याप्रमाणे पराक्रमी होते. त्यांनी उदाजी चव्हाणासह, अन्य सरदारांचे हल्ले परतवून लावले. मिरज प्रांत आणि किल्ल्याचे संरक्षण केले. 1755 पर्यंत मिरजेचा किल्ला आणि प्रांत शिवाजी साळोखेंच्या ताब्यात होता. त्यानंतर पेशव्यांनी मिरज किल्ला माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांच्या ताब्यात दिला.शिवाजी साळोखे-डुबल यांनी त्यानंतर कर्नाटक प्रांतातील हैदरवरील स्वाऱयांत सहभाग घेतला. या स्वारीत असतानाच तुंगभद्रेनजीक त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सुपूत्र नाथाजीराव हेही पराक्रमी होते. त्यांनी कर्नाटकातील मोहिमांमध्ये सहभाग घेतला.सरदार अग्नोजी साळोखेशिवाजी साळोखेंचे धाकटे बंधू अग्नोजी साळोखे हेही पित्याप्रमाणे शूर होते. त्यांना धुळगाव येथे सरंजाम नेमून देण्यात आला होता. अग्नोजी साळोखेंना धुळगांवजवळील काही गावे मोकासा दिली होती. सोनीचे ठाणे काही काळ अग्नोजींकडे होते. उदाजी चव्हाणावरील लढायात अग्नोजी अग्रभागी होते. अग्नोजींचे वंशज सध्या धुळगाव येथे वास्तव्यास आहेत.

अग्नोजींना माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांनी दंडोबाच्या पायथ्याशी कपटाने मारले. त्यानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई सती गेल्या. त्यांची समाधी मिरजेत आहे.चारशे वर्षांची लष्करी परंपरासाळोखे-डुबल घराण्याला चारशे वर्षांहून अधिक काळाची लष्करी परंपरा आहे. बाळोजी, शिदोजी, शिवाजी, अग्नोजी, नाथाजी, आनंदराव, हणमंतराव, अमृतराव या व्यक्तींनी मराठेशाहीत पराक्रम गाजवला. साळोखे-डुबल घराण्याची पराक्रमाची ही परंपरा मराठेशाहीच्या अस्तानंतर आजतागायत टिकून आहे. पहिल्या महायुध्दात धुळगांवच्या रामचंद्रराव बळवंतराव आणि ज्ञानोबा बळवंतराव यांनी मोठा पराक्रम गाजवला. रामचंद्र यांनी पहिल्या महायुध्दात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पदके मिळाली होती. दुसरे महायुध्द, भारत-चीन युध्द, भारत-पाकिस्तान युध्द, कारगील युध्द अशा विविध लढायांत डुबल घराण्यातील व्यक्तींनी पराक्रम गाजवला आहे. सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात धुळगांव येथील विश्वासराव डुबल हे शहीद झाले.

आजही कराड, बांबवडे, नरवाड, चरेगाव, धुळगांव येथील 250 हून अधिक डुबल व्यक्ती लष्करात विविध पदांवर कार्यरत आहेत.स्वातंत्र्यलढय़ात सहभागडुबल घराण्याने मराठेशाहीत स्वराज्य रक्षणासाठी काम केले. ब्रिटीशकाळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी डुबल घराण्यातील व्यक्तींनी काम केले आहे. कराड, चरेगाव, धुळगांव येथील काही व्यक्तींनी चलेजाव चळवळीत सहभाग घेतला. भूमिगत देशभक्तांना डुबल मंडळींनी आश्रय दिला होता. अशा विविध बाबींवर या ग्रंथात प्रकाश टाकण्यात आला आहे.

देवदास मुळे /कराड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here