महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पगडीचा किल्ला | सरसगड

By Discover Maharashtra Views: 2860 17 Min Read

पगडीचा किल्ला : सरसगड –

महाराष्ट्र..! या शब्दाचं वेगळंपण म्हणजे देशातील कोणत्याच राज्याला राष्ट्र म्हणून संबोधले गेले नाही कारण कदाचित तितकं सामर्थ्य इतिहासात कोणाकडे नसावंच. अन या महाराष्ट्राचे शूर राष्ट्रत्व ज्या बलवान स्थानांनी अखंड ठेवलं ते म्हणजे या देशीचे ‘दुर्ग’. मुळात हा प्रांतच दुर्गांचा, इथल्या शिखरांवरून कुठे ही नजर फिरवली तरी एक दोन शिखरांआड इथले दुर्ग शौर्याची गाथा सांगत आजही दिमाखात उभे आहेतच. यातील बऱ्याच गडांना शिवभूपतीचा सुवर्णस्पर्श झाला आहे म्हणूनच यांच्या पावित्र्याची तुलना करायला तराजू नाही. याच गड किल्ल्यांच्या ढालीने महाराष्ट्रदेशी वावरणाऱ्या प्रत्येक मनाला स्वाभिमानाची झालर देणाऱ्या जाणत्या राजाने आलमगिराच्या स्वप्नात मशगुल झालेल्या दिल्लीश्वराच्या तलवारीला बोथट केलं अन तब्बल तीनशे वर्षांनी याच भूमीवर इंद्रप्रस्थ देवगिरी चित्तोडगड विजयनगर कर्णावती वारंगगड या सर्व सिंहासनांची प्रतिष्ठापणा छत्रपतींकडून झाली. यावरूनच कळते हे दुर्ग काही सामान्य बाब नव्हे.(पगडीचा किल्ला,सरसगड)

”…आज हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेत…” अशा अर्थाचं एक वाक्य श्रीशिवछत्रपतींच्या तोंडी आलेले असल्याचा एक उल्लेख आज्ञापत्रात मिळतो. त्या वेळचे शिवरायांचे हे उद्गार अतिशय महत्वाचे आहेत. महाराष्ट्रातील हे सारेच गड-कोट-किल्ले आणि दुर्ग त्या वेळी महत्वाचे ठरतील. एकेक किल्ला एकेक वर्ष लढवला, तर औरंगजेबास तीनशेसाठ वर्षांचे आयुष्य लागेल. केवढा हा भक्कम आत्मविश्वास ! सह्याद्रीतली दुर्गसंपदा म्हणजे महाराष्ट्राचे वैभव, महाराष्ट्राची शान. आज हे दुर्ग जरी ढासळत चालले असले तरि इथल्या मातीत घडून गेलेल्या इतिहासाची साक्ष देत आजही ते कणखरपणे उभे आहेत. सह्याद्रीतल्या अशा प्रत्येक गडकिल्ल्यांना काहीएक आगळंवेगळं रांगड रुप लाभलेलं आहे. महाराष्ट्रात आहेत तसे, तितके अन तितक्या प्रकारचे किल्ले जगात अन्यत्र कोठेही नाहीत. महाराष्ट्राची दुर्गबांधणी परंपरा किमान दोन हजार वर्षांची आहे.

रायगड जिल्हा म्हटल की आपल्या डोळयांसमोर लगेच दुर्गरत्नांची खाण उभी राहते. स्वराज्याची प्रथम राजधानी असलेल्या मुरुंबाच्या डोंगरातल्या राजगडा नंतर स्वराज्याची राजधानी कोकणातील रायगडी हलवण्यात आली होती. द्वितीय राजधानी असलेल्या रायगडाला खंदे पहारे ठेवण्यासाठी शिवाजी राजेंनी आसपासचे बरेच किल्ले जिंकून स्वराज्यात घेतले होते. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण व रोहा या तालुक्यांना लागूनच पुर्वेला सुधागड तालूका आहे. सुधागड जरी तालुक्याचे मुख्य ठिकाण असले तरी, संपूर्ण तालुक्याचा कारभार पाली या गावातूनच चालतो. पाली या गावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वराचे देवालय या गावातचं असल्यामूळे गणेश भक्तांची पावले आपसुकच या गावाकडे वळतात. बल्लाळेश्वराच्या देवालयामूळे पाली हे गाव असंख्य लोकांच्या परिचयाचे आहे.

पाली गावातून जाताना आपल्याला गावाजवळच्याचं एका उंच टेकडीवर एक दुर्गरत्न आपली मान उचावून खडा असलेला दिसतो. किल्ल्याकडे नजर जाताच एका पगडीचा आकार आपल्या दृष्टिस पडतो. पाली गावाच्या पूर्वेस अवघ्या १ कि. मी. अतंरावरच्या टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याचे नाव “सरसगड”. गावापासून गडाकडे बघता क्षणी समोर दिसणाऱ्या टेकडीला जनुकाही पगडीच बांधली असल्याचा भास होतो. पगडीच्या आकाराची बांधणी असलेला हा किल्ला यास “पगडीचा किल्ला” या नावाने देखिल संबोधले जाते. सरसगडाच्या अगदी पायथ्याशीच श्रीबल्लाळेश्वराचे देवालय असून गडाकडे जाणारी मुख्य वाट या देवालयाच्या बाजूने जाते. १६०० फूट उंचीच्या या गिरिदुर्गाची चढाई श्रेणी मध्यम स्वरुपाची आहे. मुंबई किंवा पुणेवरुन वरुन कर्जत पर्यंत लोकलने यावे, पुढे खोपोली मार्गे पाली गावापर्यंत जाण्यास बस अथवा इतर वाहन सुविधा उपलब्ध असतात.

सरसगड किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. गडाकडे जाण्यासाठी गावातून दोन मार्ग आहेत. त्यापैकी पहिली वाट उत्तरेकडून श्रीबल्लाळेश्वर देउळवाडामार्गे किल्ल्यावर येणारी नाळेची पायवाट अन दुसरी दक्षिणेकडून रामआळीमार्गे तेलई गावातून जाणारी नाळेची वाट. श्रीबल्लाळेश्वराच्या देवालयामूळे देउळवाडामार्गे गडावर नेणारी वाट गडावर येणाऱ्यांसाठी अधिक परिचयाची आहे. या वाटेने गेल्यास आपण पाउन-एक तासात गडावर पोहोचतो. पायथ्यापासून अवघ्या अर्ध्या तासावरच आपल्याला गडखुणा दृष्टिस पडायला लागतात. जसजसे आपण किल्ल्याच्या जवळ जाऊ लागतो तसतसे आपल्याला सरसगडाच्या विशिष्ट बांधणीच्या गडखुणा नजरेस पडतात. पठारावर आल्यावर समोरच दिसणारे उत्कृष्ट बांधनीचे बुरुज अन दोन बुरुजांच्या मधून जाणारी घळ दिसते. हे दोन बुरुज म्हणजे सरसगडाचे भक्कम असे दोन खंदे पहारेच आहेत. गडाच्या बालेकिल्ल्याचा गोल घुमटाचा गगनछेदी भाग आपले लक्ष वेधुन घेतो.

गडाजवळ येताच सुरुवातीलाच आपल्याला कातळी पायऱ्यांचा एक खडतर टप्पा पार करावा लागतो. या कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या आधाराने थोडी सावधगिरी बाळगूण आपण वरती जाऊ शकतो.

सरसगडाच्या माचीवर कातळपोटाशी असलेली अनेक लेणी, खडकात खोदलेली पाण्याची टाकी या वास्तू त्या जागेचे प्राचीनत्व जरी दर्शवत असल्या, तरी त्या काळी किल्ला अस्तित्वात होताच असे समकालीन पुराव्यांच्या अभावी ठामपणे सांगता येणार नाही. प्राचीणकाळी या डोंगरावर वस्ती होती हे लेणी व पाण्यांच्या टाक्यांवरुन सिध्द होते. डोंगरावरील पाण्याची मुबलकतेचा विचार करुन नंतरच्या काळात इथे दुर्ग बांधणी केली गेली. कातळी पायऱ्यांच्या आधारे वरती आल्यावर डाव्या बाजूला कातळाच्या पायथ्याशी चौकोनी आकाराचा छोटा दरवाजा दिसतो. पाहता क्षणी ते एखाद भुयार असाव असा विचार चटकन मनात येतो परंतु, थोडं धाडस करुन त्या छोट्या दरवाजातून काळजीपूर्वक आत गेल्यावर कातळाच्या पोटापाशी बंदिस्त टाके असल्याचे लक्षात येते. आतमधे संपुर्ण अंधार असल्याने आत जाताना सोबत टॉर्च घेउन जाणे गरजेचे आहे. आतमधे कातळभिंतीसारखे दिसू लागल्यावर बंदिस्त टाके असल्याची खात्री होते. आत जाउन निरिक्षण केल्यावर एकात एक अश्या तिन भागात खोदलेले टाके उजवीकडे वळविलेले आहे, तिथे कातळभिंत दिसते. काळजीपूर्वक त्या अंधाऱ्या बंदिस्त टाक्यातून बाहेर यावे, टाक्याची उंची कमी असल्याने डोक्याला लागणारी टेंगळ टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. गडाच्या सुरुवातीलाच एका विलक्षण बांधनीच्या जागेची पाहणी झाल्यावर गडावर आणखि काय काय पहायला भेटणार याची उत्सुकता मनाला लागते.

सरसगडाच्या माचीवर जाण्यासाठी दोन बुरुजांमधून जाणारा अरुंद कातळी पायऱ्यांच्या मार्ग आहे. हा मार्ग नाळीमधून जाणारा असल्याने दोन्ही बाजूंचे दिसणारे बुरुज अन कातळात खोदलेल्या या ९६ पायऱ्या यांचा एक अप्रतिम देखावा नजरेसमोर दिसतो. डाव्या बाजूला भलीभक्कम कातळभिंत आहे तिच्या आधाराने वरती जावे. उजव्या बाजूला नाळ अन गुढग्याएवढ्या अंतराच्या उभ्या बांधनीच्या पायऱ्या चढताना चांगलीच दमछाक होते. चढताना तोल जाऊन उजव्या बाजूला नाळेत पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नवख्या गडपर्यटकांनी या मार्गातून जाताना उंच व अरुंद पायऱ्यांचा निट अंदाज घेत काळजीपूर्वक जाणे गरजेचे आहे. या पायरयांच्या मार्गातून जाताना आपल्याला एका विलक्षण वास्तुमधे प्रवेश करत असल्याची अनुभूति होते. भरभक्कम बांधनीचा कुशल वापर या ठिकाणी केलेला आढळतो. सरसगडाच्या या नाळेत पायऱ्यांच्या उजव्या बाजूला एक आडवी भिंत बांधलेली असून ही भिंत जनु गडाची रक्षणकर्तीच आहे. पायऱ्यांच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंचे दोन चिलखती बुरुज हे गडाचे खंदे पहारेकरी आहेत. नाळेच्या वाटेवरुन मारा करण्यासाठी त्या काळच्या दुर्गस्थापतीने गडाच्या संरक्षणासाठी या विलक्षण बांधनीच्या बुरुजांची निर्मिती केली असल्याचे नजरेस येते. डाव्या बाजूचा बुरुज शत्रूवर रेकी, पहारे करण्यासाठी असावा. उजव्या बाजूच्या बुरुजावर तोफा-बंदुकांचा मारा करण्यासाठी चर्या किंवा जंग्या आहेत.

कातळी पायऱ्यांच्या खडतर वाटेने वरती आल्यावर डावीकडे खडकातून कोरुन काढलेला छोटा दरवाजा लागतो. या दरवाज्याची बांधणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. दरवाज्याला कमान असून मध्यभागी ट्रायडेंडसारखे दिसणारे चिन्ह आहे. अश्या प्रकारचे चिन्ह रायगडाच्या नानी दरवाजा आणि पालखी दरवाज्यावर आपल्याला पाहायला मिळतात. दरवाज्यातून आतमधे प्रवेश केल्यावर समोर दोन खणांचे लेणे आहे. पुर्वी या लेण्याचा उपयोग दरवाज्यावर पहारे देणाऱ्या पहारेकऱ्यांची विश्रांतीच्या जागेसाठी करण्यात येत असावा. इथुन आत आपण सरसगडाच्या माचीत प्रवेश करतो. माचीवर येताच आपल्या समोर गडाचा गगनभेदी बालेकिल्ला ठाकलेला दिसतो. माचीवरुन वरती जाउन बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा घालता येते. बालेकिल्ल्याचा हा सुळका सुमारे ५० मिटरचा आहे. पूर्वेकडून दक्षिणेला व पश्चिमेकडून उत्तरेकडे येऊन प्रदक्षिणा पुर्ण करता येते. या प्रदक्षिणा मार्गात आपल्याला कातळाच्या पोटाशी असलेली अनेक लेणी व पाण्याची खांबटाकी दृष्टिस पडतात. डाव्या बाजूला चौकोनी बांधनीचा तलाव लागतो, या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे गडाच्या तटाबाजूने दक्षिणेला एक चोरदिंडी लागते. चोरदिंडीच्या बुरुजाजवळ गेल्यावर आतील बाजूने तिन कमानी नजरेस पडतात. चोरदिंडीच्या वरच्या बाजूलाच एका पडक्या वास्तूचे अवशेष आहेत. पुर्वीच्या काळी ही वास्तू बहुदा गडाची कचेरी अथवा सदर असावी.

बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडे उजव्या बाजूला सरसगडाच्या माचीवर येण्यासाठी बांधलेला दुसरा दरवाजा आहे. रामाअळीमार्गे तेलई गावातून गडावर येण्यासाठी बांधलेला हाच तो दुसरा मार्ग. या दरवाज्याला तिन कमानी असून मध्यभागी उठावदार पध्द्तीने कोरलेले एक द्वारशिल्प आहे. यात दोन्ही बाजूंना वर्तुळाकार कमळकृती कोरल्या असून प्रत्येक कमळाला सहा पाकळया आहेत. या मार्गातुन आत प्रवेश करण्यासाठी छोट्या आकाराचे दिंडी दरवाजे आहेत. शिवाय या दरवाज्यावर डाव्या व उजव्या बाजुला डोंगर उतारावर तटबंदी आणि बुरुज बांधलेले आहेत. दरवाज्याच्या बाजूलाच बालेकिल्ल्याच्या पायथ्याला चौरसकृती बांधनीचे पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. गडाच्या बंदिस्त भागात जाण्यासाठी दक्षिणेकडे जाताना आणखी एक दिंडी दरवाजा लागतो. या दिंडीला पुर्वी लाकडी दरवाजा असावा कारण बाजूच्या दोन्ही भिंतीत चौकोनी आकाराचे गाळे आहेत. त्याच्या सहाय्याने दरवाज्यावर कडीसारखा आडवा अडसर लावता येतो. या दिंडी दरवाज्याच्या खालच्या बाजूूला बुरुजाच्या पायथ्याशी अर्धवर्तुळाकार बांधनीचे पाण्याचे टाके आहे.

प्रदक्षिणा मार्गावर बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे येताना काही ठराविक अंतरावर लेणी, खांबटाकी आणि कातळपोटाशी खोदलेली पाण्याची टाकी दृष्टिस पडतात. दक्षिणेकडून सुरु होणाऱ्या या वास्तूंचे प्रमाण पश्चिमेकडे जास्त आहे. पुढे विस्तीर्ण आकाराच एक नैसर्गिक लेणं नजरेस पडते. छताचा प्रस्तार खाली ढासळू नये म्हणून नमिनीपासून छतापर्यंत भिंती बांधून त्याला आधार देण्यात आला आहे. हे बांधकाम हल्लीच्या काळात काही वर्षांपुर्वी केलेले आहे. या वास्तूच्या बाजुलाच कातळपोटाशी सलग बांधलेली विस्तीर्ण आकाराची चार खांबटाकी आहेत. त्यातील डाव्या बाजूचे टाके आकाराने सर्वात मोठे असून एका दगडी खांबावर छताचा भार तोलला आहे. ही खांबटाकी पाहताना जलव्यवस्थापनाच्या एका विशिष्ट पद्धतिचा अभ्यास होतो. खांबटाक्याला लागून चार लेणी आहेत यात देखील जमिनीपासून छतापर्यंत खडकातून खोदलेले खांब आहेत. इथुन पुढे गेल्यावर पिण्यायोग्य पाण्याची तिन टाकी आहेत. कित्येक गडावर उन्हाळयात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आपण अनुभवतो. परंतु, सरसगडावर बारामाही पाण्याचा पुरवठा आसतो त्यामूळे भर उन्हात जरी सरसगडास भेट दिली तरी इथे पाण्याची टंचाई भासणार नाही. पुढच्या मार्गात कातळपोटाशी खोदलेले लांबलचक आणखी एक खांबटाकं आहे. बाजूच्याच टाक्यात एक कबर आहे, या कबरीसमोर देखील एक पाण्याचे टाके दृष्टिस पडते. इथपर्यंत बालेकिल्ल्याच्या सुळक्याभोवतीची प्रदक्षिणा पुर्ण होते.

गडाच्या तटाजवळून खालच्या बाजुस लागून ” L ” आकाराची छोटी खोली लागते. पुर्वी या खोलीचा वापर दारुगोळा वापरण्यासाठी केला जात असावा. माचीच्या या बाजूच्या तटबंदीत तोफा व बंदुकांचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. या सर्व गोष्ठी आपल्याला माचीवरुन बालेकिल्ल्याची प्रदक्षिणा पुर्ण करताना नजरेस पडतात. या सर्व वैशिष्ट्यपुर्ण, सुलभ बांधणींच्या वास्तूंचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्राचीन काळी खोदलेल्या या वास्तूंचा उपयोग मध्ययुगात स्वयंपाकगृहे,

कोठ्या, पागा, तालीमखाने यांसाठी केला जात असे. दोन-तीनशे लोक सहज बसू शकतील अशी प्रशस्त बांधणीची लेणी, जलव्यवस्थापणाचे महत्व पटवूण देणारी इथली सुलभ बांधणीच्या पाण्याची टाकी व खांबटाकी अश्या वैशिष्ट्यपुर्ण बांधकामाने सरगड बनला आहे. इथल्या पिण्यायोग्य टाक्यांतील पाणी अतिशय थंडगार असल्याने उन्हां-तान्हांत सोबत आणलेल्या शिदोरीसोबत इथल्या थंडगार पाण्याने मन तृप्त करुन टाकावं. सह्याद्रीत भटकण्याची हिच खरी गोडी आहे, गडावरील टाक्यांमधल शुध्द, थंडगार पाणी यासारखं सुख कुठे नाही.

सरसगडाच्या बालेकिल्ल्याची प्रदक्षिणा पुर्ण झाल्यावर पुर्वेकडून थेट बालेक्किल्ल्याकडे मोर्चा वळवावा. बालेकिल्ल्याच्या वाटेवरचं एक बुरुज आहे. बुरुजाचे बांधकाम भक्कम असल्याने आजतागायत त्याचा दगड न दगड शाबुत आहे. गडाचा बालेकिल्ला सुमारे ५० मीटर उंचीचा गगनाला बिडलेला आहे. बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट थोडी कसरतीची आहे, त्यामूळे चढताना काळजीपूर्वक जावे. बालेकिल्ल्याला जाण्यासाठी कातळी पायऱ्या आहेत. या वाटेत दोन्ही बाजूस पाण्याची टाकी आहेत. डाव्या बाजूच्या टाक्यात पाणी आहे तर उजव्या बाजूचे टाके भग्नावस्थेत आहे. जिथे माचीवरुन बालेकिल्ल्यात प्रवेश होतो तिथे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार असण्याची दाट शक्यता आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर एक कबर नजरेस पडते. बालेकिल्ल्याच्या परिसरात एक शिवालय आहे, तिथे उजव्या बाजूलाच एक बांधिव तलाव आहे. तलावाची रचना विशिष्ट पध्दतिची असून तलावात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. शिवालयात शिवकालिन पिंड असून त्यावर पाण्याचा कलश आहे. शिवालयाच्या प्रवेशद्वारात एक विरगळ आहे. बाजुलाच जुन्या देवालयाच्या खांबांचे कोरीव दगड पडलेले आहेत. बालेकिल्ल्यावर पुरातन वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. ज्यामध्ये मंदिराचे दगडी खांब व कोरलेले शिल्प तसेच विरगळीचे अवशेष व मंदिराची किंवा बालेकिल्ल्यावरील एखाद्या वास्तूची द्वार गणेश पट्टी पाहायला मिळते. बालेकिल्ल्यावर इमारतींच्या जोत्याच्या बांधनीचे अवशेष आजही पाहायला मिळतात. बालेकिल्ल्यावरुन गडाची माची अन भक्कम बुरुजांची तटबंदी नजरेस पडते. आपल्या सह्याद्रीचं एक खास वैशिष्ट्य आहे की, इथल्या कोणत्याही डोंगररांगेवर जाऊन उभे राहिले की, आजुबाजुला सह्याद्री रांगेतील एखाद तरी दुर्ग रत्न दृष्टिस पडते. सरसगडाच्या बालेकिल्ल्यावरुन पूर्वेला सुधागड्, घनगड व तैलबैला नजरेस पडतात. वायव्येला माणिकगड व मिऱ्या डोंगर दिसतो. सह्याद्रीतले हे सारे सरसगडाचे सोबतीचं जनु!! याशिवाय पश्चिमेला दिसणारे अंबा खोरयाचे सुंदर दृश्य नजरेत भरते. खंडाळा घाट्, नागफणी सुळका, पायथ्याचे पाली गाव, वरदायनी देवीचा डोंगर्, जाभूळपाडा हे सारं दृश्य सरसगडावरुन पहावं. बालेकिल्ल्यावरुन काळजीपुर्वक खाली उतरुन पुनश्चः गडाच्या माचीवर यावे. गडचढाई उत्तरेकडील नाळेच्या वाटेने केली असेल तर उतराई गडाच्या दक्षिणेला तेलई गावाकडे उतरणारऱ्या दरवाज्याच्या मार्गाने करावी. या मार्गात कातळात पाण्याजी टाकी खोदलेली आहेत त्यामूळे उतराई दरम्यान तहान लागल्यास पाण्याची कमतरता भासत नाही.

पंधराव्या शतकातील बहमनी राज्याच्या इतिहासात सरसगडाचा प्रथम उल्लेख पालीचा किल्ला असा केलेला आहे. याचा अर्थ पालीचा किल्ला बहमनी काळात किंवा त्या पुर्वी बांधला गेला असावा. १४८२ मधे मलिक नायबाचा मुलगा अहमदने शिवनेरी, चावंड्, लोहगड, तुंग्, तिकोना, कोंढाणा, पुरंदर्, भोरप्, मुबारदेव ( राजगड ), जीवधन्, कोहोज्, सागरदुर्ग्, मुरंजन्, तुंगी, तोरणा व माहुली हे किल्ले जिंकून मोर्चा पालीकडे वळवला. त्या काळात किल्ल्यावर राज्य करणाऱ्या पाखंड्यांचा नाश करुन अहमदने सरसगड ताब्यात घेतला. पुढे याच अहमदने सरसगडाच्या तडबंदीची व बिरूजांची डागडुजी केली. सय्यद अलीने आपल्या ‘बुरहाने मासीर’ या ग्रंथात बुरहान निजामशहाच्या मृत्यु समयी निजामशाहीत असलेल्या एकूण ५८ किल्ल्यांची नावे दिलेली आहेत. त्यात सरसगडाचा ‘पालीचा किल्ला’ असा उल्लेख आहे. त्यावरुन दि. ३० डिसेंबर १५५३ पर्यंत सरसगड निजामशाहीत होता. इ. स. १६३५ – ३६ मधे मुघल बादसहा शाहजहान व विजापूरचा मुहम्मद आदिलशहा यांच्या संयुक्त सैन्याने निजामशाही काबीज केली. त्यानंतर उभयतांमधे झालेल्या तहानुसार निजामशाहीतील उत्तरेकडील भाग मुघलांना मिळाला आणि दक्षिणेकडील भाग आदिलशहाला मिळाला. त्या वेळी सरसगडाचा आदिलशाहीत समावेश करण्यात आला.

इ. स. १६४७ मधे शाहाजी राजांचे पुणे येथील कारभारी दादाजी कोंडदेव यांच्या मृत्यु नंतर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सरसगड स्वराज्यात आला होता. इ. स. १६७१-७२ मधे शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणकर्त्या गिरिदुर्गांच्या डागडुजीसाठी आणि गडांवर नव्या वास्तू उभारण्यासाठी जे अंदाजपत्रक तयार केले होते, त्यात सरसगडासाठी २००० होन खर्च करण्यासाठी तरतूद करुन ठेवली होती. त्यावरुन शिवकाळात सरसगड स्वराज्यात होता हे ठामपणे सांगता येते. सरसगड पंतसचिवांच्या भोर संस्थानात होता. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर थोड्याच वर्षात भोर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. तेव्हापासून पालीचा सरसगड स्वतंत्र भारताचा एक अविभाज्य घटक बनला.

सरसगडात प्रवेश करण्यासाठी उत्तर व दक्षिणेकडून फक्त दोन मार्ग आहेत. त्यामूळे गडाचे दोन्ही दरवाजे बंद केले की शत्रूला गडावर येण्यास तिसरा मार्ग नाही. शत्रूने उत्तरेकडून गडामधे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास्, माचीवरच्या दोन्ही बुरुजांवरुन दगड-धोंड्यांचा, तोफांचा मारा शत्रूवर करता येतो. शिवाय शत्रुला किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच बालेकिल्ल्यावर जायचे असल्यास प्रथम गडाच्या माचीवर प्रवेश करणे गरजेचे आहे. शत्रूने माची काबीज केली तर बालेकिल्ल्याच्या तटबंधीवरुन माचीवरील शत्रूवर मारा करता येतो. आजतागायत गडाचे बुरुज अन तटबंधीची भक्कम बांधणी कणखरपणे उभी आहे. उत्कृष्ट गडबांधणीचे कौशल्य सरसगडावर पहावयास मिळते. काय तो दिमाखात उभा ठाकलेला गडाचा बालेकिल्ला, काय ती कातळात खोदलेली खांबटाकी व पाण्याची टाकी, विस्तीर्ण व कुशल बांधणीची ती लेणी हे सारं वैभव पाहताना अक्षरशः नजरेचं पारन फिटत.

दैनंदिन जिवनातल्या धावपळीतून वेळात वेळ काढूण प्रत्येकाने कधीतरी या गडकिल्ल्यांना भेटी द्याव्यात. इथल्या गडकिल्ल्यांच्या वाटेवरुन चालताना कधी इतिहासाला साद घालावी. इथल्या मातीत घडलेल्या लढायांचं स्मरण करावं. दुर्गांच्या सानिध्यात स्वराज्यातल्या संस्कारांचे धडे गिरवावे. इतिहास पुस्तकात वाचल्याने अभ्यासता येतो परंतु सह्याद्री मधल्या या गडकोटांंमूळे इतिहासाचं खरं महत्व समजत. स्वराज्यासाठी खास्ता खाल्लेल्या प्रत्येक मावळयाची कामगिरी इथला पराक्रम गाजवून गेलेय्, याची जानिव होते. आणि महत्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात या डोंगर-दरऱ्यांतून चालताना शरिर निरोगी व बळकट करावं. सदर लेखात सरसगडाची लिहिलेली माहिती तुम्हाला या दुर्गरत्नाला भेट देण्यासाठी व अभ्यासण्यासाठी उपयोगास येईल. इतिहासाच्या पाऊलखुणा जपत हा दुर्ग आजतागायत आपलं अस्तित्व टिकवूण निर्धाराने उभा आहे. सरसगडाची भक्कमता, दिव्यता, कणखरपणा, सुंदरता, मजबूती आपल्याला थेट इतिहासातल्या कालखंडात नेते. तर मग सह्याद्रीतल्या या भक्कम दुर्गवैभवाला भेट देताय ना..?? बाकी आपला सह्याद्रीतला हा रांगडा दुर्ग नावाप्रमाणेचं सरस आहे बरं..!!

श्रद्धा अनंत उतेकर

सह्याद्री संजीवनी

पगडीचा किल्ला(सरसगड),पगडीचा किल्ला(सरसगड),पगडीचा किल्ला(सरसगड),पगडीचा किल्ला(सरसगड),पगडीचा किल्ला(सरसगड)

Leave a comment