महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन

By Discover Maharashtra 6 Min Read

महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन –

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. याच लढ्यात 107 हुतात्म्यांनी प्राण अर्पण केले. त्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा चौक उभारण्यात आला.(हुतात्मा दिन)

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन : सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाच्या आधारावर एक राज्य स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा चळवळ असे म्हणतात. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ती समाप्त झाली. १९५० ते १९६० या काळामधील महाराष्ट्रातील हे सर्वांत व्यापक असे जनआंदोलन होते आणि त्यात एकूण १०५ लोकांचा मृत्यू झाला.

हैदराबाद  राज्यातील मराठी भाषिकांची त्या राज्यात राहण्याची इच्छा नव्हती. आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य केली आणि कन्नड भाषिक जिल्हे वगळून, मराठवाडा धरून, गुजराती प्रदेशासह मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. सौराष्ट्राचा गुजरातेत समावेश करावा व मुंबईस राजधानी करून गुजरात व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे, असे आयोगाचे म्हणणे होते. आयोगाच्या शिफारशींच्या विरोधात महाराष्ट्रात मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला. या अवधीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची चळवळ अधिक आक्रमक बनली. मुख्य प्रश्न मुंबईच्या भवितव्याचा होता व ते शहर महाराष्ट्रास देण्यास गुजराती भाषिकांचा विरोध होता.

महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत लोकांचा असंतोष वाढू लागला. या घटना ऑक्टोबर १९५५ नंतर घडल्या.  शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त केली. सेनापती बापट यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यानंतर संप, बंद व मोर्चे यांचे सत्र सुरू झाले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १०५ माणसे ठार झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ या गोळीबारानंतर उग्र झाली.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची ६ फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्षाचे नेते एस्. एम्. जोशी त्याचे प्रमुख होते. यांत प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदु महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ हे पक्ष सामील झाले. नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांच्या संमतीने शेडयूल्ड कास्ट्स फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांत सामील झाला. एस्. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते.

१७ जानेवारी ते २२ जानेवारी या काळात मुंबईत मोठा हिंसाचार झाला. पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात ७६ लोकांचा बळी गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी २३ जानेवारी रोजी आपला राजीनामा पंतप्रधानांना दिला पण त्यांनी तो स्वीकारला नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत संप व चळवळी सुरू झाल्या. नेहरू व इतर नेत्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय समितीने घेतला व हजारो लोकांनी त्यात भाग घेतला. ३ जून १९५६ रोजी चौपाटीवरील सभेत नेहरूंनी अशी घोषणा केली, की मुंबई पाच वर्षांसाठी केंद्रशासित प्रदेश राहील. पाच वर्षांनंतर तिच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल. या तिन्ही राज्यांसाठी मुंबई राज्याचे एकच उच्च न्यायालय लोकसेवा आयोग असेल. नेहरूंच्या या घोषणेनंतर वातावरण जास्त तापले.

सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्यावर जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-दीडशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघणार, असा अंदाज होता.

पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून उत्तुंग घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे गोळा होऊ लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली गेली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचा निरोप होता. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडायला सुरुवात झाली. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात येऊ लागला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आले. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घाला असे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०७ आंदोलक हुतात्मे झाले .

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी संयुक्त महाराष्ट्र लढ्याला सुरुवात होऊन १ मे, इ.स. १९६० ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा यशस्वी झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला. तेव्हापासून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ही स्वातंत्र्य चळवळीनंतरची महाराष्ट्रातील व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ होती. हे राज्यातील पुरोगामी चळवळीचे सर्वांत मोठे व व्यापक आंदोलन होते. या चळवळीत महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, विचारवंत आदी समाजातील सर्व स्तर एकत्र आले होते. याशिवाय शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक, आत्माराम पाटील वगैरे शाहिरांनी उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला. या लढ्याची परिणीती म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली हा चळवळीचा इतिहास झालेला आहे.हुतात्मा दिन.

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a comment