महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,957

सिंहनाद होणारे संगनातेश्वर

By Discover Maharashtra Views: 2491 3 Min Read

सिंहनाद होणारे संगनातेश्वर –

कोकण जसे निसर्गाने समृद्ध आहे, तसेच विविध नैसर्गिक चमत्कारांनीसुद्धा भरलेले आहे. राजापूरची गंगा, तिवरे इथली गंगा, पाण्यातून बुडबुडे येणारे ‘उमाड्याचो महादेव’ असो किंवा ‘बोंबडेश्वर’ असो. उन्हाळ्यात ओसंडून वाहणारे ‘श्रावण गावचे’ तळे असो. एकापेक्षा एक भन्नाट निसर्गाच्या लीला कोकणात बघायला मिळतात. याच शृंखलेत बसणारे अजून एक ठिकाण राजापूरच्या जवळ एका बाजूला वसलेले आहे.(सिंहनाद होणारे संगनातेश्वर)

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा आणि राजापूरच्या मधे ओणी नावाचे गाव आहे. इथून एक रस्ता पाचल मार्गे अणुस्कुरा घाटाकडे जातो. आणि अणुस्कुरा घाटातून पुढे तो रस्ता मलकापूर किंवा कळे या कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना जातो. तर याच पाचल गावापाशी अर्जुना नदीच्या तीरावर संगनातेश्वराचे प्राचीन मंदिर उभे आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार माघ शुद्ध १५ शके १६६४ म्हणजेच इ.स. १७७२ मधे झाल्याची नोंद तिथेच असलेल्या एका शिलालेखावरून मिळते. “ श्री शके १६६४ दुदुभि सवत्सर माघ सुध, १५ जीर्णोद्धार..” असे या शिलालेखावर नोंदलेले आहे. हा शिलालेख दर्शनी भागात उजव्या बाजूला कोरलेला आहे.

या शिवमंदिरात ऐकू येणारा सिंहनाद हे याठिकाणचे वैशिष्ट्य आणि गूढ म्हणावे लागे. शेजारीच असलेल्या नदीतून घागरीने पाणी आणून ते मंदिरातील अभिषेकपात्रात ओतले की त्यातून शिवपिंडीवर ५ धारा पडू लागतात. त्या पडू लागल्या की शिवपिंडी मधून कू SSSS असा, जुन्या रेडीओच्या व्हॉल्वमधून यायचा असा स्पष्ट आणि तीव्र आवाज यायला लागतो. याला सिंहनाद असे म्हणतात. परिसर शांत असल्यामुळे हा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतो. हेच अभिषेकपात्र जर नदीपात्रात घेऊन गेले आणि त्यात पाणी ओतले तर त्यातून पडणाऱ्या धारा नदीपात्रातील खडकावर पडू लागतात. तिथे सुद्धा असाच आवाज यायला लागतो. हा नक्कीच एक नैसर्गिक चमत्कार म्हणायला हवा. नदीपात्रातील कोणत्याही दगडावर धारा पडू लागल्या की हा सिंहनाद येतो. चिपळूण इथे असलेल्या गौतमेश्वर मंदिरातसुद्धा असाच सिंहनाद ऐकता येतो. यामागे असलेले भूवैज्ञानिक तथ्य तज्ञांनी शोधायला हवे. पर्यटकांना मात्र हा एक आगळावेगळा प्रकार नक्कीच अनुभवता येईल.

कोकणातल्या बऱ्याच मंदिरात लाकडी कामात केलेली कलाकुसर हा एक अजून एक कोकणचा अलंकार म्हणावा लागेल. संगानतेश्वर इथल्या मंदिरातसुद्धा लाकडी कामात केलेली कलाकुसर फारच देखणी आहे. मंदिराच्या सभामंडपात केलेली ही कलाकुसर वेळ काढून पहावी अशी आहे. विविध फुले, नाग, तसेच काही भौमितिक रचना या लाकडात कोरलेल्या इथे बघायला मिळतील.

कोकणातल्या अनेक आडवाटेवर वसलेल्या ठिकाणांसारखेच हे ठिकाणसुद्धा लोकांची वाट बघत निवांत वसले आहे. राजापूरपाशी गेल्यावर मुद्दाम आडवाट करून सिंहनादाचा हा  एक दुर्मिळ निसर्गचमत्कार आवर्जून अनुभवला पाहिजे.

– आशुतोष बापट

Leave a comment