महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,98,943

रायगडावर काशीबाईसाहेबांची समाधी….!

By Discover Maharashtra Views: 1448 4 Min Read

रायगडावर काशीबाईसाहेबांची समाधी….!

रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. इंग्रजांच्या वतीने तहाची बोलणी करायला नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुभाषा मुंबईहून रायगडाकडे निघाला. २४ मार्च १६७४ रोजी तो न्यायाधीश निराजीपंतांची भेट घेण्यासाठी पाचाडला आला. निराजीपंत रायगडावर होते. नारायण शेणवीच्या आगमनाची वर्दी मिळताच त्यांनी गडावरून निरोप धाडला की, शिवाजीराजांची एक भार्या नुकतीच निर्वतली असल्यामुळे राजे सुतकात आहेंत. सुतक फिटेपर्यंत गडावर न येता पाचाडास माझ्या घरी थांबा. नारायण शेणवी पाचाडला पाच दिवस राहिला. २८ मार्च रोजी पाडव्याच्या निमित्ताने निराजीपंत गडावरून घरी आले. नारायण शेणवीची भेट घेतली व दुसऱ्या दिवशी त्याची एका स्वतंत्र, प्रशस्त घरात व्यवस्था केली. तेथे शेणवी अजून पाच दिवस राहिला. मग ३ एप्रिलला निराजीपंतांच्या सांगण्याप्रमाणे गडावर गेला आणि दरबारात शिवछत्रपतींची भेट घेतली व तहाची बोलणी केली.

महाराजांना असे कोणाचे सुतक होते की ज्यामुळे इंग्रजांच्या वकीलाला गडाखाली दहा दिवस थांबावे लागले. सुतक होते राणीसाहेब सकलसौभाग्यसंपन्न काशीबाईसाहेबांच्या दुःखद मृत्यूचे. राज्याभिषेकाचे वेध लागले असतां १९ मार्च १६७४ रोजी शिवपत्नी काशीबाईसाहेबांचे रायगडावर निधन झाले. महाराजांना फार मोठें दुःख झाले. काशीबाईसाहेब जिजाऊसाहेबांच्या घराण्यातल्या. जिजाबाईसाहेबांचे बंधू अचलोजी जाधवराव यांच्या त्या नात. १६४८ साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी ८ एप्रिल १६५७ रोजी राजगडावर शिवरायांशी त्यांचा विवाह झाला. त्या निपुत्रिक होत्या.

रायगडावर कोंडेखळीच्या खळग्यांत, वाघदरवाजाच्या उत्तरेस एके ठिकाणी झाडांनी झाकलेले एक अतिशय देखणे आणि कळाशीदार वृंदावन आहे. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांनी सर्वप्रथम तें प्रकाशात आणले. २६ फेब्रुवारी १९६४ ला ‘दहा दुर्ग दहा दिवस’ करून गोनीदा रायगडावर आले होते. गडावरच्या धर्मशाळेचा राखणदार तुकाराम शेडगे याने त्यांना कोंडेखळीच्या खळग्यांत एक समाधी आहे हे सांगितले. तेव्हा तें त्याच्याबरोबर त्या ठिकाणी गेले आणि समाधी बघितली. समाधीची नाजूक, सुबक बांधणी पाहता ही समाधी कुण्या राजघराण्यातल्या व्यक्तीचीच असली पाहिजे असे गोनीदांचे ठाम मत झाले. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरेही गडावरच होते. त्यांना गोनीदांनी बोलावून इथे आणले. दोघांनी अनेक तर्क केले. रायगडावर कोणकोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती निधन पावल्या याची उजळणी केली. मग अनेक तर्क मांडून हे वृंदावन शिवपत्नी काशीबाईसाहेबांचे ‘असावें’, यावर शिक्कामोर्तब केले.

विशेष म्हणजे गोनीदांना दाखवायच्या आधी तुकाराम शेडगेनी पुरातत्व खात्याच्या माणसांना या समाधीविषयी सांगितलं होतं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. गोनीदांनी ती प्रकाशात आणली. त्यापूर्वी रायगडाविषयीच्या कोणत्याच पुस्तकात अथवा इतर ठिकाणी या समाधीचा उल्लेख नव्हता. ‘दुर्गदर्शन’, ‘दुर्गभ्रमणगाथा’ या पुस्तकांत गोनीदांनी ही समाधी कशी गवसली, त्या प्रसंगाबाबत लिहिलं आहे. तसेच ‘शिवतीर्थ रायगड’ मध्येही समाधी कोणाची असावी याचे विवेचन केले आहे. तें सर्व जरूर वाचा. ‘दुर्गभ्रमणगाथा’मध्ये या प्रसंगाच्या शेवटी बाबासाहेबांनी गोनीदांना ह्या समाधीविषयीचं जाहीर करून भारत इतिहास संशोधक मंडळात त्यावर निबंध वाचायचा असं सांगितलं; इथवरच आहे. पुढचं माहीत नाही.

काहीजणांचे म्हणणे आहे की ही समाधी सोयराबाईंची आहे. गोनीदांनी सोयराबाईंचाही विचार केला आणि ही समाधी त्यांची का नसावी ह्याचे स्पष्टीकरणही केले होते. फक्त हे स्पष्टीकरण गोनीदांनी पंचावन्न वर्षांपूर्वी केलेले आहे याची जाणीव ठेवून ते वाचावे. त्या वादात मला आत्ता पडायचे नाही. मला ते वृंदावन काशीबाईसाहेबांचे वाटते. फक्त गोनीदांनी किंवा बाबासाहेबांनी म्हटले आहे म्हणून नाही तर त्यांनी जे तर्क केले ते मला पटले म्हणून. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. त्या समाधीविषयी नंतर सविस्तर लिहायचा मानस आहे. तूर्तास त्या समाधीविषयी एवढंच सांगणं आहे की त्या ऐतिहासिक वास्तुची जपणूक करूया. अतिभावनिक होऊन संवर्धनाच्या नावाखाली अविचाराने त्या समाधीचा मूळ ऐतिहासिक साजच नका घालवून टाकू.

सदरची दोन्ही छायाचित्रे गोनीदांनी काढलेली आहेंत. समाधीत वाढलेलं ते झाड नंतर पुरातत्त्व खात्याने काढून टाकलं आहे.

प्रणव कुलकर्णी.

Leave a Comment