महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,879

छत्रपती शिवरायांचे पाय लागले तो मुंगी पैठणचा राजे भोसलेंचा वाडा

By Discover Maharashtra Views: 5070 6 Min Read

छत्रपती शिवरायांचे पाय लागले तो मुंगी पैठणचा राजे भोसलेंचा वाडा

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजेंचे इंदापूरच्या युद्धात अकाली निधन झाल्यानंतर बाल शहाजीराजेंची सर्व जबाबदारी मालोजीराजेंचे बंधु विठोजीराजेंनी आपल्या अंगावर घेतली. आणि शहाजीराजेंना घडवून मोठे केले. शहाजी आणि जिजाऊ साहेबांच्यारूपाने छत्रपती शिवराय या विश्वाला लाभले. तर अशा या मूळ असणार्‍या विठोजी राजेंविषयीचा फार काही इतिहास जगाला माहीत नाही.
आपल्या थोर पुर्वजांचा वारसा जपत छञपती शिवरायांनी मात्र आपला धर्म पाळत सर्वांचा आदर केल्याचे दिसून येते. मालोजी राजेंना पुणे सुपे बारामती इत्यादी ठिकाणची जहागिरी होती. त्याचवेळी विठोजी राजेंना मुंगी. पैठण, हिरडी, बेरडी, जिंती, वेरूळ, भांबोरा, वावी या गावांची जहागीर होती.

मालोजी राजेंना शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुले झाली. तर विठोजी राजें व पत्नी रेखाऊ यांना एकूण 8 मुले झाली. संभाजी, खेळोजी, मालबा (मालोजी), मंबाजी, नागोजी, परसोजी, त्रिंबकजी आणि काकजी (मकाजी). शके 1544 च्या फाल्गुन महिन्यात खंडगळेच्या हत्ती प्रकरणात लखोजी जाधवराव आणि शहाजी राजे भोसले यांच्यात मोठा संघर्ष घडून त्यात जाधवरावांकडून संभाजी राजे भोसले मारले गेले.
भोसले घराण्यात सुरुवातीच्या काळात आपापसात किती प्रेम होते पहा. मालोजी राजेंचे निधन झाले म्हणून त्यांचे बंधु विठोजीराजेनी आपल्या एका मुलाचे नाव मालोजी ठेवले. तर आता विठोजी राजेंचा मुलगा संभाजी ठार झाले तेव्हा शहाजी राजेंनी आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले. पुढे कारकीर्द वाढत गेली तसे शहाजीराजे आदिलशाहीच्या दरबारी कर्नाटकात गेले.

विठोजी राजेंचे बहुतेक वारस हे मोगल किंवा आदिलशाहकडे चाकरीस राहिले. ईकडे विठोजीच्या मुलांची परिस्थितीही सधन असल्याचे त्यांच्यातील वाटणी पत्रावरून दिसून येते. त्यात 108 तोळे सोने आणि 2100 होनाचा उल्लेख आलेला आहे. प्रत्येकाला विविध गावची जहागीरही मिळाली होती. पैकी मुंगी ची जहागीरही नागोजीरावांना मिळाली. मुंगी हे गाव पैठणपासून 15- 16 किमी दूर आहे. तेथे ते आपली पत्नी राणूबाई सह मुक्कामाला असून हजारो एकर जमीन आणि गोदावरी काठावर भव्य स्वरुपातील गढी बांधून मुंगी गावाला त्यांनी वैभव प्राप्त करून दिले होते. नागोजीराजे आणि राणूबाईना मुलबाळ झाले नाही. तेव्हा त्यांनी वळसे ( ता. अकोले जि. नगर ) येथील आपल्याच घराण्यातील एक वारस मालोजीला दत्तक घेऊन मुंगीला आणले. पुढे नागोजी राजेंचेही निधन झाले आणि राणूबाईही खूप थकल्यातरी नामस्मरण करत गोदावरीकाठी शांततेचे जीवन जगत होत्या.

ईकडे शहाजी राजे कर्नाटकात राहिले असलेतरी त्यांचे पुत्र छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा डाव मांडून तो पुढे नेत असता 10 ऑक्टोबर 1657 ला आदिलशाही सरदार अफजलखानाने त्यांच्यावर जीवघेणी स्वारी केली. या स्वारीचे वेगळे दुर्भाग्य म्हणजे विठोजी राजेंचे एक पुत्र मंबाजी भोसले हे खांनाकडून लढत होते. या स्वारीत शिवरायांना विजय प्राप्ती झाला. त्यात अफजलखानासह मंबाजी भोसले मारले गेले. राजेंच्या आयुष्यात असले अनेक प्रसंग आले तरी ते नेटाने पुढे चालत राहिले. त्यानंतर पन्हाळ्याचा वेढा, शाहीस्तेखान प्रकरण आटोपल्यावर औरंगजेबाचा सेनापति मिर्झाराजे जयसिंहाने पुरंदरचा तह करण्यास भाग पाडले. त्यातूनच छत्रपती शिवरायांना आग्र्याला जाणे भाग पडले. त्यानुसार फाल्गुन शुद्ध नवमी वार सोमवार दिनांक 5 मार्च 1666 ला शिवरायांनी राजगडावरून आग्र्याच्यादिशेने प्रस्थान केले.
रस्त्यात जात असताना राजे पैठणला गेले. तेव्हा मुंगीस आपल्या काकी राणूबाईसाहेब मुक्कामाला असल्याचे समजताच राजे तसेच तडक सडेस्वारनिशी मुंगीस काकीसाहेबांच्या दर्शनास गेले.

महाराजांनी काकीसाहेबांना आदरपूर्वक विनंती केली की, “ जिंतीस ( ता. करमाळा, जि. सोलापूर ) चलावे.” काकींना गंगातिरीच (गोदावरी काठी ) राहण्याची ईच्छ्या होती. तेव्हा महाराज उतरले की, “ आपले आशिर्वादेकरून संस्थान हातास आलियास कसबे मजकूराचे चौथाईची सनद करून पाठवितो.” याच मुक्कामात राजेंनी आंबेजोगाईच्या दासोपंताना एक आभार पत्र लिहिलेले आहे.
काळ पुढे सरकत गेला. राणूबाईच्या वारसाची चार मुख्य घरे शिल्लक राहिली. सुभाणजी, उमाजी, महादजी आणि संभाजी. त्यांची पुढे 16 घरे आणि शेकडो वंशज तयार झाले. गढी आणि जमीन तेवढीच. त्यामुळे त्याचे तुकडे पडले. माणसाला नदीची वाळू आणि मातीही पुरत नाही ही म्हण इथही लागू पडली. गढी भुईसपाट झाली. राजेंचे वारसदार अल्पभूधारक झाले. तरीपण गोदावरी काठ असल्याने काहींची परिस्थिति बरीय. बाकी दुरावस्थाच….

कधीकाळी बारा बलुतेदारांना वाटली तेवढी जमीन आता दात्यांच्या वारसाकडे नाही. “ राजेंचे वारसदार परिस्थितीमुळे भलेही छोटे झाले असतील परंतु त्यांच्या मनाचे मोठेपण कुण्या चोंग्या सोंग्याला येणार नाही ” परवा दिनांक 8 जूनला आम्ही मुंगीला गेलो तेव्हा बाहेरून राजे भोसलेंची चौकशी केली तर एकच उत्तर.. आता त्यांचे सर्वकाही संपलेले आहे.. वगैरे उत्तर.. भिकारचोट पुढारांच्या मागे पळणारांना राजेंचे मोठेपण काय कळणार ?  राजेंचे पाय लागले त्या मातीत पाय ठेवला. उमाजीच्या बेटातील 70- 75 वयाचे श्रीमान प्रभाकर राजे भोसले आराम करत होते. घर लहान पण बाज तोच. त्यातही झोपाळा म्हटलं की सारंकाही आलाच. भरदुपारची वेळ आणि तशाही वेळी आपल्या धर्मपत्नीला आवाज देवून सांगत होते. “ दुरून आलेत जेवायला वाढ.” ही असते दानत… आणि हे असतात खरे वारस… जेवायला वेळ नव्हता. तेवढ्यातही त्यांनी त्यांच्याकडील एक रंगीत वंशावळ दाखवली. बाकी इतर काही अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत. तरीपण खूप खूप समाधान याचेच की, “ मुंगीत राजेंचा जिथं पदस्पर्श झाला, त्या प्रसंगाला आपल्या कल्पनेतून साकारता आले एव्हढेच.” जय शिवराय ssss …..

माहिती साभार – Dr. Satish Kadam

1 Comment