महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पेमगिरी | Pemgiri Fort | भिमगड उर्फ शहागड

By Discover Maharashtra Views: 4667 8 Min Read

पेमगिरी | Pemgiri Fort

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यापुर्वी शहाजी राजांनी सुद्धा स्वराज्य स्थापनेचा एक प्रयत्न केला होता. हा प्रयत्न जरी अयशस्वी ठरला असला तरी येऊ घातलेल्या हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. स्वराज्य स्थापनेच्या या प्रयत्नांचा साक्षीदार म्हणजे बाळेश्वर डोंगररांगेत वसलेला पेमगिरी(Pemgiri Fort) उर्फ भिमगड उर्फ शहागड किल्ला. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात असणारा हा किल्ला आडबाजूला असल्याने फारसा परिचित नाही.

संगमनेर – अकोले रस्त्यावर कळस नावाचं गाव आहे. या गावातून डावीकडे जाणारा रस्ता थेट १० कि.मी.वरील पेमगिरी गावात जातो. पेमगिरी किल्ल्याचं वैशिष्टय़ म्हणजे या किल्ल्याच्या सभोवती या किल्ल्यासारखेच दिसणारे दोन तीन डोंगर असल्याने किल्ला कोणता ते पटकन लक्षात येत नाही. किल्ल्यावर पंचक्रोशीचे दैवत व गडदेवता पेमादेवीचं मंदिर असल्याने वनखात्याने किल्ल्याच्या माथ्यापर्यंत रस्ता केलेला असुन पायवाटेवर अवघड ठिकाणी शिड्या बसवलेल्या आहेत. किल्ल्यावर पेमादेवीची दोन मंदिर आहेत.

समुद्रसपाटीपासून २७७२ फुट उंचीवर असणारा पेमगिरी किल्ला दक्षिणोत्तर पसरला असून किल्ल्याचे क्षेत्रफळ ५ एकरपेक्षा कमी आहे. किल्याच्या पायथ्याला ग्रामदेवतेचे देऊळ असुन या मंदिराशेजारून पेमगिरी किल्यावर जायची वाट सुरु होते. येथुन पहाताना पेमगिरी किल्ला गोलाकार व तिन्ही बाजूने तासलेला वाटतो. पायवाटेने अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात आपण गडमाथ्यावरती पोहोचतो. या वाटेने जाताना शेवटच्या कातळटप्यात २५ पायऱ्या खोदलेल्या असुन त्यावरील भागात शिड्या आहेत. किल्याच्या विरुद्ध बाजूच्या सोंडेवरून गाडीमार्ग आलेला आहे. या दोनही मार्गाने चढाई करून आपण गडदेवता पेमाई देवीच्या घुमटीवजा जुन्या मंदिरासमोर येतो. या छोट्या देवळात देवीचा शेंदरी तांदळा व त्यामागे ऑईलपेंटने रंगवलेली मूर्ती आहे. या पेमाईदेवी मंदिरासमोरच सातवाहन काळातील चार आयताकृती पाण्याची जोडटाकी खोदलेली असुन त्यामधील दोन टाकी खांबटाकी आहेत. या टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. या टाक्यांना लागून पुढे काही अंतरावर कातळात कोरून काढलेला हौद आहे परंतु यातील पाणी पिण्यायोग्य नाही.

टाकी पाहुन डाव्या बाजुंने पुढे गेल्यावर खालच्या बाजुस एक लांबलचक टाक आहे तेथे बाळंतीणीच टाक असा फलक लावलेला आहे. ते टाक पाहुन किल्ल्याच्या दक्षिण टोकापर्यंत जाता येते. किल्याच्या दक्षिणेकडील टोकावर फक्त एका वास्तुचा उध्वस्त चौथरा पहावयास मिळतो. या ठिकाणी इतर कुठलेही अवशेष नसले तरी किल्ल्याच संरक्षण करणारी बाळेश्वर डोंगररांग पहायला मिळते. गडावर सपाटी खुपच कमी असल्याने जुन्या काळी किल्यावर फारशी बांधकामे असावी असे वाटत नाही. पेमादेवी मंदिरात देवीची संगमरवरी मुर्ती बसवलेली आहे. मंदिराचा कळस लांबुनही नजरेस पडतो.

देवीच दर्शन घेउन किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या टेहळणी बुरुजाकडे जाताना वाटेत दोन ठिकाणी घरांच्या जोत्यांचे अवशेष बघायला मिळतात. येथे कदाचीत मोठा वाडा असावा असे अवशेषांवरून वाटते. येथेही बुरुज अस्तित्वात नाही पण दुरवरचा परीसर दृष्टीस पडतो. या ठिकाणी वनखात्याने लोखंडी शिडी बसवलेली आहे. पायथ्यापासून चालत येताना या मार्गानेच आपला किल्ल्यात प्रवेश होतो. टेहळणी बुरुज पाहुन झाल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडावर किल्लेपणाच्या खुणा सांगणारे तटबंदी,बुरूज,दरवाजा यासारखे इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत.

किल्ल्याचे आकारमान व आवाका पहाता शहाजी राजांनी तीन वर्षे जेथुन राज्यकारभार पाहीला ते नक्की हेच ठिकाण असावे का अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. किल्ल्यावर वनखात्याने दोन ठिकाणी पर्यटकांसाठी निवारा बांधलेला आहे. किल्ल्यावरील जुन्या मंदीरासमोर गावकऱ्यांनी दोन खोल्या बांधलेल्या असुन त्यात सध्या एका हिंदी भाषिक बाबाचा मुक्काम असतो. नवीन मंदीर व जुन्या मंदिरासमोरील शेडमधे १० जणांची राहाण्याची सोय होते पण किल्ल्याचा ताबा बाबाने घेतलेला असुन तो किल्ल्यावर रहायला विनाकारण विरोध करतो पण त्याचा विरोध डावलुन तेथे रहाता येते.

पेमगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमगड किंवा शाहगड इ.स.१२ व्या शतकात यादव राजांनी बांधला. मुर्तजा निजामशहा म्हणजेच बादशहा या किल्ल्यावर वास्तव्यास असल्याने या गडाला शहागड असे नाव पडले तर बखरीमध्ये पेमगिरीचा उल्लेख भीमगड या नावाने येतो पण पेमगिरी किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला तो शहाजीराजांच्या पराक्रमामुळे. गडाचा इतिहास पाहिला असता निजामशाही बुडविण्यासाठी खुद्द शहाजहान दक्षिणेत उतरला होता. त्यासाठी महाबतखान आणि त्याचा मुलगा खानजमान दौलताबाद किल्यावर चालून आले. शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताजमहलचा बुऱ्हाणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला.

१ मार्च १६३३ रोजी महाबतखानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला आणि १७ जून १६३३ रोजी दौलताबाद मोगलांनी जिंकले. निजाम हुसेनशहा आणि त्याचा वजीर फत्तेखान दोघेही कैदेत पडले. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाकडे सरदार होते. या लढाईत शहाजीराजांनी व निजामशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण पराभव झाला. मराठा सत्ता स्थापण्याची ही संधी साधुन शहाजीराजांनी आदिलशाहीतील मुरार जगदेव या सरदाराच्या मदतीने जुन्नर जवळील जीवधन किल्यामधून कैदेत असलेला निजामशाहीचा तीन वर्षांचा दुसरा वारस मुर्तजा निजाम याची सुटका करून पेमगिरी किल्यावर आणले आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी महाराज निजामशहाचे वजीर झाले.

शहाजीराजांनी मुर्तजा निजामशहाला स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या गडावरून ३ वर्ष राज्यकारभार केला. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे ही यामागे भावना होती. पुढे मोगलांनी आदिलशाही बरोबर तह करून निजामशाहीवर चाल केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्याशी शहाजीराजानी ६ मे १६३६ ला तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली. त्यामुळे शहाजी राजांचा हा स्वराज्याचा प्रयत्न असफल ठरला. इ.स.१७३८ ते १७४० दरम्यान पहिले बाजीराव पेशवे व मस्तानी काही काळ या गडावर वास्तव्यास होते. संपूर्ण गड पायी भटकंती करायला दोन तास पुरेसे होतात तर गाडीने वरपर्यंत आल्यास अर्ध्या तासात गड पाहुन होतो.

पेमगिरी गावात गडाच्या खाली एक सुंदर चिरेबंदी चौकोनी बारव असून तिच्या भिंतीवर शके १६२८ म्हणजेच इ.स.१७०६ असे लिहिलेला एक शिलालेख आहे. या बारवमध्ये उतरण्यास पायऱ्या बांधण्यात आलेल्या असुन तळात दोन दगडी खोल्या तसेच दोन ओवऱ्या व सहा देवकोष्टके आहेत पण त्यात मुर्त्या नाहीत. या बारवच्या वरील बाजुस पाणी खेचण्याची मोट बसविण्यासाठी दगडी बांधकाम असुन पाणी वाहुन हौदात सोडण्यासाठी दगडी पन्हाळी बांधण्यात आली आहेत. याशिवाय किल्ल्यापासुन २.५ कि.मी.वर मोरदरा नावाच्या भागात असलेला प्राचिन विशाल वटवृक्षही पाहाण्यासारखा आहे. सुमारे सुमारे दीड एकरपेक्षा जास्त परिसरात हा महाकाय वटवृक्ष पसरलेला असुन आहे त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे तर एकूण पारंब्या ९० पेक्षा जास्त आहेत. झाडाचा उत्तर दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे. या पारंब्यांच्या मधून आपल्याला आतपर्यंत जाता येते. या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची जाखाई-जाकमतबाबा ही स्थानिक दैवते आहेत. या महाकाय वटवृक्षा बाबत गुरं-शेळ्यांची राखण करणा-या रामोशी समाजातील जाकमतबाबा आणि जाखाई यांची दंतकथा पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे.

जाकमतबाबा आपल्या शेळ्या चरण्यासाठी या जागेवर आले असता वाघाने शेळ्यांवर हल्ला केला व शेळ्यां वाचविण्यासाठी जाकमतबाबांनी वाघाला प्रतिकार केला. जाकमतबाबांची ओरड ऐकून त्यांची बहिण जाखाई तेथे आल्या. जाकमतबाबा वाघाच्या तावडीत सापडलेले पाहुन जाखाई यांनी स्वत: वाघाशी लढा दिला. या लढाईत वाघ, जाकमतबाबा व जाखाई मरण पावले. पुढे या जागेवर रामोशांनी जाकमतबाबा व जाखाई यांच्या मूर्तीची स्थापना येथे केली. मूर्तीची स्थापना केल्यानंतर पुढे झाडाचेही दैवतीकरण झाले. यामध्ये एक आख्यायिका येथे सांगितली जाते ती अशी कि कुणी जाणीवपूर्वक या झाडाच्या फांद्या पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना धडा शिकवतो. या श्रद्धेमुळे कुणीही झाड तोडण्यास धजावत नाही. परिणामी झाडाचे रुपांतर विशाल वटवृक्षात झाले. जेव्हा जेव्हा या वट वृक्षाला छाटण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी लोकांना अद्दल घडली असे स्थानिक सांगतात. आज या वटवृक्षाच्या मध्यभागी काही शेंदूर फासलेले दगड वीरगळ ठेवलेले आहेत तसेच जाकमतबाबा व जाखाई यांची मूर्ती पाहायला मिळते. या महाकाय वडावर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment