महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,18,192

पेडका किल्ला | Pedka Fort

Views: 4
8 Min Read

पेडका किल्ला : स्थापत्य व इतिहास

कन्नड तालुक्यातील पेडका किल्ला हा एक महत्वपूर्ण किल्ला आहे. कन्नड पासुन २१ कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. अजिंठ्याच्या डोंगररांगेत असलेला हा गिरीदुर्ग आहे. येथे जाण्यासाठी कन्नड येथून अंधानेर, मुंडवाडी, कोळवाडी, कळंकी या गावापासून साधारण ३ कि.मी. अंतर पायी रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येईल. दुसरा रस्ता कोळवाडी पासून कळंकीकडे जाणा-या रस्त्यावरच जेहुरकडे जाणारा एक मार्ग आहे. जेहुरकडे जाणा-या मार्गावर पेडकवाडी हे गाव असून या गावापासून पायी वाटेने किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. या शिवाय पेडकवाडी गावाच्या समोर याच मार्गावर ठाकरवाडी हे गाव आहे. ठाकरवाडी येथूनही पायी वाटेने किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. कळंकी या गावापासून जाणारा मार्ग पर्यटकांच्या सोईचा ठरतो. कारण या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी कमी कष्ट लागतात.

किल्ल्याचे प्रवेशव्दार
किल्ल्याचे प्रवेशव्दार पुर्वाभिमुख आहे. सद्या किल्ल्याचे प्रवेशव्दार व प्रवेशव्दाराच्या भिंती भग्न अवस्थेत आहेत. या ठिकाणीच किल्ल्याचे प्रवेशव्दार होता हे सांगण्या एवढे प्रवेशव्दाराचे अवशेष शिल्लक आहेत. साधारण ६ फुट रुंदीचे हे प्रवेशव्दार असून त्यासाठीची भिंत साधारण ४ फूट २ इंच रूंद आहे. प्रवेशव्दाराच्या समोर किल्ल्याच्या खाली उतरण्यासाठी दगडामध्येच पाय-या कोरलेल्या आहेत. या पाय-या ठाकरवाडी या गावाच्या दिशेने खाली उतरतात. या पैकी कांही पाय-या आजही पाहावयास मिळतात.

किल्ल्यावरील पाणीसाठा
किल्ला हा छोटेखाणी असला तरी त्याप्रमाणात किल्ल्यावर पाण्याची मुबलक अशी सोय केलेली होती. दगडात कोरलेल्या पाणी टाक्या बरोबरच दोन मोठे तलाव किल्ल्यावरील पाणी किल्ल्यावरच साठवण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. यापैकी एका तलावास पाणी आडवण्यासाठी दगड कोरून भिंत तयार करण्यात आली आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूस तिन स्तंभ टाके कोरण्यात आली आहेत. यापैकी पहिल्या टाक्यामध्ये ४ स्तंभ दिसतात. त्याची खोली व लांबी दिसत नाही परंतु रूंदीने विस्तीर्ण असलेले दिसते. या टाक्यापासून कांही अंतरावरच दोन स्तंभ टाके असून ते एकमेकांना आतिल बाजूने जोडलेले आहेत. या दोन टाक्या पैकी एका टाक्यामध्ये सद्या एकाच स्तंभाचा आधार राहीलेला आहे हे टाके सद्या पुर्ण दिसते परंतु यास जोडुन असलेले दुसरे टाके अर्धेच दिसत असले तरी या टाक्यातून पाणी बाहेर जाणार नाही यासाठी कोरण्यात आलेली भिंत चांगल्या स्थितीत दिसते.

किल्ल्यावर वरील पाणी साठया शिवाय किल्ल्याच्या आतिल बाजूसही पाणी साठवण्यासाठी टाकी कोरण्यात आली आहेत. किल्ल्यामध्ये असलेल्या तलावाच्या दोन्ही बाजूस पाण्याची टाकी कोरण्यात आली आहेत. एका बाजुस असलेले स्तंभ टाके पुर्ण पणे बुजलेले आहे. याचा थोडासा भाग दिसतो पण हे स्तंभ टाके असल्याचे व अलिकडेच ते बुजल्याचे परिसरातील नागरीक सांगतात. या टाक्याच्या समोरच्या बाजुस एक मोठे टाके आहे. हे टाके या ठिकाणी असलेल्या टाक्यापैकी वेगळया स्वरूपाचे आहे. ५३ फुट रूंदी असलेले व दोन भागात विभागलेले हे टाके समोरच्या बाजूने एकच टाके असल्याचे दिसते. या टाक्याच्या मागच्या बाजूस पाच भाग करून त्यांच्या समोरील बाजूच्या भिंती अर्धखुल्या ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असलेला पाणी साठा हा राखीव पाणीसाठा म्हणुन ठेवल्या जात असावा किंवा हे टाके भरलेल्या अवस्थेत असताना त्याचा मागचा भाग दिसत नाही म्हणुन त्याचा उपयोग लपण्यासाठी किंवा सामुग्री ठेवण्यासाठी करण्यात येत असावा.

किल्ल्यावरील बुरूज
किल्ल्यावर सद्या एका बुरुजाचे अवशेष शिल्लक आहेत. पांढरीची माती व दगडांचा वापर करून बांधण्यात आलेल्या या बुरुजाची पडझड झालेली आहे. किल्ल्याच्या मध्येच याची निर्मीती करण्यात आली आहे. उंच डोंगरावर बांधण्यात आलेल्या बुरुजावरून किल्ल्याच्या संरक्षणाची निकड असल्याचे स्पष्ट होते. याबुरुजावरून परिसरावर लक्ष ठेवता येत असे या दृष्टीने हा बुरूज महत्वपूर्ण आहे. किल्ल्यावर या बुरूजा शिवाय किल्ल्याच्या समोरील टोकास दोन्ही बाजुने दोन बुरूज व पश्चिमेस एक असे तिन ठिकाणी बुरूज असावेत परंतु सद्या ते पुर्णपणे नष्ट झालेले आहेत.

इमारतीचे अवशेष
किल्ल्यावर पाण्याची टाकी, बुरूज या शिवाय कांही इमारतींचे अवशेषही आहेत. किल्ल्याच्या एका बाजूस इमारतींचे अवशेष पाहावयास मिळतात तर दुस-या बाजुस रिकामी जागा आहे. किल्ल्याच्या वरच्या बाजूस सद्या असलेल्या बुरुजाच्या पाठीमागच्या बाजुस इमारतींच्या पायांचे अवशेष सद्या शिल्लक आहेत. या इमारती पुर्ण पणे पडलेल्या आहेत. कांही इमारती हया चौकोनी तर कांही आयाताकारामध्ये असल्याचे त्यांच्या मुळव्यांवरून स्पष्ट होते. दुस-या बाजुस रिकाम्या असलेल्या जागेमध्ये सैनिकांच्या छावण्या असाव्यात.

पेडका गाव
किल्ल्याच्या पायथ्याशी पुर्व-उत्तर दिशेस पुर्वी पेडका हे गाव असल्याचे या परिसरातील नागरीक सांगतात. या डोंगराळ भागामध्ये पांढरी मातीचा कांही भाग आहे. या ठिकाणी पूर्वी हे गाव असल्याच्या परिसरातील लोकांच्या मतास त्यामुळे दुजोरा मिळतो. या नष्ट झालेल्या गावामध्ये मध्ययुगिन कालखंडातील हनुमानाचे एक मूर्तिशिल्प या ठिकाणी पाहावयास मिळते. शिवाय म्हसोबा व म्हैसाई या देवता आहेत. श्री सखाराम मेंघाळ यांच्या शेतामध्ये एक जुनी बारव असल्याचे व ती कांही वर्षापुर्वीच बुजल्याचे हे शेतकरी सांगतात. डोंगरावरून येणारे पाणी साठवण्यासाठी सद्या या परिसरात तलावबांधण्यात आला असल्यामुळे या गावाचे स्थलांतर झाल्याचे सांगितले जाते. कारण येथून जवळच पेडकवाडी हे आधुनिक काळात निर्माण झालेले गाव आहे .

कळवंतीनीचा महाल
पेडका या पूर्वीच्या गावाच्या परिसरातच कळवंतीनीचा महाल म्हणुन एक वास्तू परिसरात परिचीत आहे. या संदर्भात अशी माहिती मिळते की, कळवंती नावाची एक नृतीका होती ती किल्ल्यावर भरवण्यात येणा-या दरबारामध्ये नृत्य करित असत येथील राज्यकर्त्यांची तिच्यावर मर्जी असल्याकारणाने तिच्यासाठी हा महाल बांधुन देण्यात आला आहे. सद्या या ठिकाणी असलेली ही वास्तू म्हणजे कळवंतीनीचा महाल आहे. २३ फुट ४ इंच लांबी व रुंदी असलेली ही वस्तू जमिनी पासून ७ फुट उंचीच्या जोत्यावर निर्माण करण्यात आली आहे. या ऐतिहासीक वास्तूच्या भिंतीची जाडी ३ फुट ८ इंच रूंद असून चारही दिशेस प्रवेशव्दारासाठीची जागा भिंतीमध्ये ठेवण्यात आली आहे. यावरून ही वास्तू कळवंतीनीच्या राहण्याचा महाल नसल्याचे स्पष्ट होते.

किल्ल्यावरील इतिहास
किल्ल्याची निर्मिती कोणी व केंव्हा केली या विषयीची माहिती मिळत नसली तरी यादवकाळाच्या पूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी किंवा येथे टेहाळणी नाका तरी असावा. १७ व्या शतकात किल्ल्याचा उल्लेख पदका असा आला आहे. बाद्शाहानामा मध्ये पदका या किल्ल्याचा असलेला किल्ला म्हणजेच पेडका होय. या किल्ल्याचे मूळ नाव पालका असे होते तर पदका चे अपभ्रष्ट रुप म्हणजे पेडका होय असे मत गजानन भास्कर मेहेंदळे यांनी मांडले आहे. या किल्ल्यावरील इतिहासाची बहामनी काळापासूनची अ‍ल्पशी माहिती उपलबद्ध होते. देवगिरीच्या यादवांच्या अस्ता बरोबरच यादवांच्या ताब्यातील प्रदेशावर दिल्लीच्या सुलतानाची सत्ता स्थापन झाली. पुढे दक्षिणेत सुलतानशाही प्रदेशात बहामनीची सत्ता स्थापन झाली. मलिक अश्रफ हा बहामनीचा दौलताबाद येथील सुभेदार होता. त्याच्या काळात अहमद निझामशहाने दौलताबाद घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या मृत्यूनंतर दौलताबाद किल्ल्यावरील सैनिकांनी किल्ला अहमद निझामशहाच्या ताब्यात दिला. त्यानंतर निझामशहाने दौलताबाद परिसरात असलेल्या किल्ल्यांवर ताबा मिळवला. ज्यामध्ये पेडका किल्ल्याचा समावेश होता. निझामशाहीची सत्ता या किल्ल्यावर स्थापन झाली. यामीन अल-दौला, खान खानन यांना दौलताबादपासून १८ कोस अंतरावर असलेले किल्ले ताब्यात घेण्यासाठी सैन्य पाठवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे खलील बेग चाकणी याला ५०० घोडेस्वारासह पाठवण्यात आले होते. त्याने पेडका किल्ला जिंकुन घेतला. अशा प्रकारे निझामशाहीच्या ताब्यात असलेला हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे हा किल्ला मुघलांकडून हैद्राबादच्या निजामाकडे गेला. देवगिरीच्या परिसरातील बहुतेक किल्ले हे निजामाच्या ताब्यात होते. पेडका किल्ल्याची ही फोटो उन्हाळ्यामधील आहेत. डिसेंबर पर्यंत किल्ल्यावर व परिसरात हिरवळ असते.

डॉ. रमेश सुर्यवंशी

Leave a Comment