महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,18,196

१६८३ ची महागिरीची लढाई

Views: 7
7 Min Read

छत्रपती संभाजी महाराजांच्या आरमाराची आणि इंग्रजांच्या ‘प्रेसिडेंट’ महागिरीची लढाई…

२६ फेब्रुवारीला सुरतला बातमी आली की, ‘प्रेसिडेंट’ ४ जानेवारी ला कारवारास जाऊन तेथून सुरतेस येत असता, छत्रपती संभाजी महाराजांच्या राजपुराहून निघालेल्या सहा गलबतांची व त्या महागिरीची गाठ पडली. संभाजी महाराजांच्या लोकांनी महागिरीत चढून ११ लोक ठार व ३५ जखमी केले. शिवाय वाटेत ११ लोक मेले होते व एक पंगू होता. त्यामुळे पुढे प्रवास झेपणे कठीण म्हणून ‘प्रेसिडेंट’ महागिरी गोव्यात शिरली… छत्रपती संभाजी महाराजांच्या ६ गलबतांपैकी ३ बुडली गेली. ही बातमी ‘प्रेसिडेंटच्या’ कॅप्टननेच सुरतेला लिहिली. ही चकमक संगमेश्वराजवळ झाली असेही पूर्वीच्या २६ जानेवारीस कंपनीस लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे..

परंतु सुरतकरांनी या लढ्याचा अहवाल लंडनला १७ एप्रिलच्या पत्रात पाठविला आहे तो असा :

प्रेसिडेंट महागिरी अपेक्षित वेळी सुरतेस येऊन दाखल झाली नाही. कारण वाटेत १६ जानेवारीला ४ गुरब व दोन जहाजांनी आपल्या महागिरीवर हल्ला चढविला. ३ गलबते जवळ आली व त्यातील लोकांनी वर घुसून भांडण केले. कॅप्टन हाइडने त्यातील एक बुडविले व दुसऱ्यास आग लाविली. त्यांच्या आरमारापासून दूर होताच तोफा सोडल्या. त्यात दारूच्या साठ्याने पेट घेतला. १६ ठिकाणी महागिरी पेटली. ती विझविण्यास सक्त मेहनत केली. परंतु महागिरीवरील ‘लॉग बोटी’ बुडविल्या गेलेल्या गलबतातील माणसांनी दोऱ्या तोडून स्वरक्षणार्थ पळवून नेल्या कारणाने महागिरी वरील आग विझविणे जड गेले. शत्रूचे तिसरे गलबतही बुडाले. बाकीची तीन तोफांच्या माऱ्याने जाया झाली. परंतु ती निघून गेली. ‘प्रेसिडेंट’ वरील ११ ठार व ३५ जखमी झाले, राजापुराहूनही अशी बातमी आली की अरबांच्या हाताखाली चाचेगिरी करणारे हे लोक संभाजी महाराजांच्या मुलुखातील होते व या अरबांनी ती पोर्तुगीजांची महागिरी म्हणून हल्ला चढवला. पोर्तुगीजांच्या जहाजासाठी ते तेथे बरेच दिवस टपून बसले होते. असे म्हणतात की, शत्रूच ७०० लोक मारले गेले व ३ गलबते बुडाली. अर्थात हा आकडा ४ गलबतांच्या (गुरबे) मानाने फारच अतिशयोक्तिपूर्ण आहे. तसेच अरब व संभाजीराजे यांचा सहकार झाला नव्हता म्हणून जे इंग्रज सांगत होते त्यातही तथ्य नव्हते, ही गोष्ट त्यांच्याच या पत्रावरून सिद्ध आहे. असो. ‘प्रेसिडेंट’ महागिरी सुरतला गोव्यातून परस्परच गेली व तेथे ७ मार्चला पोहोचली…

हेनरी स्मिथ परत आल्यानंतर संभाजी महाराजांकडून अपेक्षित अशी काहीच हालचाल झाली नाही, सुरतकर प्रथम आशेवर होते. परंतु २७ मार्चला आपल्या फसवणुकीला चांगलेच उत्तर मिळाले हे पाहून खिन्न होऊन ते मद्रासला लिहितात की, “ छत्रपती संभाजी महाराजांच्या निरोपांवरून फारसे यश मिळेल असे आम्हास वाटत नव्हतेच.. आम्ही सही शिक्याच्या फर्मानाची वाट पहात आहोत. राजा पाठवील असे वाटते. स्मिथनेच बरोबर आणले असते तर फार चांगले झाले असते. निदान येतेसमयी मंत्र्यांचा निरोप घेण्याची तरी धूर्तता दाखवावयास पाहिजे होती..” नंतर प्रल्हाद पंताचे पत्र ८ ऑक्टोबर पूर्वी मुंबईस आले. ते मुंबईकरांनी ११ ऑक्टोबरच्या पत्रासोबत सुरतेस रवाना केले…

प्रल्हाद पंताचे पत्र मराठीवरून पोर्तुगीज व पोर्तुगीजवरून इंग्रजीत रूपांतरित केले. त्यातील सारांश असा :
“…इंग्रज वकील व राम शेणवी येथे आल्यावर मान्यतापत्र तयार होऊन इतर पत्रेही तयार झाली. इंग्रजांस द्यावयाचा शिरपाव तयार होता. वकीलाने जाण्याची घाई लाविली. तेव्हा त्याला जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर शिरपाव व पत्रे नेण्यासाठी वकिलाला परत पाठविण्यासाठी पुष्कळ निरोप पाठविले. परंतु कोणी आले नाही. राम शेणव्यास पाठविल्यास आम्ही पत्रे व शिरपाव पाठवू..”

अर्थात हे पत्र रवाना करताना स्मिथला दोष देऊन लिहिले की,
“..यावरून दिसून येईल की स्मिथने केवळ लवकर परतण्याच्या लहरीखातर राजाने पाठविलेले बक्षीस वाया दवडिले. हा अपरमाद घेताना तो चुकीपेक्षा वेड्यासारखेच वागला.. परंतु हेनरी स्मिथने आपली बाजू मांडताना लिहिले की, “मी निघण्यापूर्वी ३ दिवस सर्व कागदपत्रे तयार झाली होती. राजवाड्यात मला रात्री दहा वाजता बोलाविले. तेथे राजांनी मला पोषाख (vaste) दिला व मला जावयास सांगितले. मी त्यांना पत्रे मजजवळ देण्यास सांगितले. त्यांनी उत्तर केले नाही. मी तीनदा विनविले. परंतु राजे रागावत आहेत असे पाहून मी उभा राहिलो. त्यांनी मला जाण्याची आज्ञा केली व आपण कल्याण भिवंडीच्या प्रवासार्थ तातडीने निघाले. मी राम शेणव्यास मागे ठेवण्यास तयार होतो. परंतु राजे ऐकेत ना. फक्त वकिलाने राम शेणव्याचा एक नोकर मागे ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी केले…

डेप्युटी गव्हर्नर त्यास लिहितो, त्याप्रमाणे तो वकील लिहितो, कारण मी प्रल्हाद पंताला मुंबईस पैसे दिले होते ते मी त्याकडे परत मागितले होते. मी तेथे असताना त्याची मी सरबराई करावी अशी त्याने मागणी केली होती. तीही मी नाकारली होती. प्रल्हादपंताने मला चौलास २-३ दिवस राहावयास सांगितले होते हे खरे. तो जमल्यास तेथे कागदपत्रे पाठविणार होता. परंतु मी अद्यापवर तेथेच अडकून पडलो असतो. त्याचा तो दिवस फार उशिरा आला असता. कारण राजा ऐन रात्री रायरीहून निघून पाछापूर (Patchapore) व लगेच तेथून कल्याण टेकडी जवळील मढगढीस (Mur Gur) गेला. खरोखर तो डोंगरीतील ५-६ दिवसांचा प्रवास होता. मी खर्चास खिशात पैसा नसताना पायाने वाट तुडवीत गेलो असतो. शिवाय तसे करण्यात राजांच्या स्पष्ट हुकुमाचे उल्लंघन होऊन राजे नाखूष झाले असते. परंतु चार्लस वार्डने स्मिथच्या लिहिण्याचा इन्कार करिताना १७ नोव्हेंबरला सुरतेस लिहिले की, “राजाचे वकील व प्रल्हादपंत ते दोघेही आरोप करितात की, जरी त्यांनी स्मिथला राहण्यास सांगितले तरी त्यांनी आपण होऊनच राजाची परत जाण्यास परवानगी मागितली आणि माझी खात्री आहे की, त्यास खरे बोलण्यास लाज वाटत आहे…

‘प्रेसिडेंट’ व राजाच्या गलबतांमध्ये जे भांडण झाले त्याची बातमी आम्ही राजाने विचारल्यास उत्तर देण्यास कळविली होती. परंतु ते ती ऐकून भ्याला व मंत्र्याचेही निरोप न घेता पळून आला..’ ‘पुढे सुरतकरांनी कोणातरी प्रभु अगर शेणव्यास पाठवून ‘फर्मान’ आणण्यास सांगितले. १६ फेब्रुवारी १६८४ (आर्मने ‘१६८२ चुकीने नोंदले आहे) च्या पत्रात प्रल्हादपंत मागील पत्रातील मजकूर पुन्हा लिहिताना म्हणतात की, “तुमचा वकील परत जाण्यासाठी इतका घाबरा झाला होता की, त्याला जेमतेम शिरपाव व पोषाख देऊन राजाकडून रजा देवविली. राजांनी राम शेणव्यास दोन दिवस मागे ठेवण्यासाठी सांगितले होते. परंतु त्याने ऐकले नाही. तो कवि कलश किंवा इतर कोणाही सरकारकुनांना न भेटता निघून गेला…”
सारांश, ‘प्रेसिडेंट ’च्या लढ्याची बातमी त्याला वार्डकडून समजली व तिची राजापुरात झालेली बोलवा पाहून, संभाजी महाराजांच्या मारले गेलेल्या लोकांबाबतचे शासन त्यालाच भोगावे लागेल की काय अशी भीति, त्यालाच नव्हे तर राम शेणव्यालाही वाटल्याने तेथे नावाला एक माणूस ठेवून ती सर्व मंडळी जलदीने पळून गेली. परंतु या पुढील पत्रव्यवहाराचा फायदा केजविनने घेतला व सुरतकरांना धाब्यावर बसवून छत्रपती संभाजी महाराजांशी तह केला…

@gadwat_official

Leave a Comment