महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,18,198

जामगाव येथील राजराजेश्वर मंदिराचा शिलालेख

Views: 7
5 Min Read

नागपंचमीच्या दिवशी मंदिर बांधलेल्या पोळ घराण्याचा जामगाव येथील राजराजेश्वर मंदिराचा शिलालेख!!!

जामगाव येथील राजराजेश्वर मंदिर गाभारा प्रवेशद्वार शिलालेख !!!!!!
उपलब्धि व स्थळ :- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मौजे जामगाव येथील मध्यवस्तीत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिराच्या मुख्य मंदिर गाभारा प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कोरलेला आहे. सदर लेख हा उठाव स्वरूपाचा असून पाच ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी संस्कृत मिश्र भाषेत कोरलेला आहे. शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील अक्षरे झिजून पुसट झाली आहेत तर सततची रंगरंगोटी केल्याने त्यावरील मजकूर मुज्ला आहे लेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर स्पष्टपणे सहज वाचता येतो.
====================================
शिलालेखाचे वाचन :
१.श्री गणेशाय नमो पोलोपनामा केशव तत्स्नु
२.ग्रामज्योतिषी ॥ तत्सूनु राज नाम्ना जी
३.वे त्रिंबकावरेण च ॥१॥ शके क्रोधनर्षि
४.षष्टषोडशवर्षशतेन भू श्रुचौ ॥ इंदौ पंचम्यां
५.धर्मार्थमकारीत्सु शिवालयां ॥२॥
अर्थ : श्रीगणेशाला नमन करून पोळ उपनाम घराण्यातील केशव नामक व्यक्तीचा उल्लेख ग्रामज्योतिषी म्हणून करण्यात आला असून . त्यांचा पुत्र राज आणि त्रिंबक यानी शालिवाहन शके १६६७, क्रोधन नाम संवत्सर पवित्र असा श्रावण शुद्ध पंचमी इंदुवार तिथी म्हणजेच २ जुले १७४५ सोमवार या दिवशी. धर्मार्थ म्हणजे धार्मिक पुण्यप्राप्तीच्या उद्देशाने राजराजेश्वर देवाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना करून शिवालयाचे बांधकाम/निर्माण करविण्यात आले, अशी नोंद शिलालेखातून दिसते.{ ,क्रोधन-संवत्सर , र्षि-७,षष्ट-६,षोडश १६ ,शतेन -७ भू –श्रावण शु –शुद्ध ,प-पक्ष ।। इंदौ-सोमवार पंचम्यां-पंचमी = नभ म्हणजे श्रावण. श्रावण, शुद्ध पक्ष, सोमवार, पंचमी, शक १६६७ = सोमवार, २२ जुलै १७४५}

====================================

शिलालेखाचे महत्व :- शिलालेखाची सुरुवात ‘श्रीगणेशाय नमः’ या मंगलाचरणाने होत असून, त्यातून तत्कालीन धार्मिक श्रद्धा आणि शुभारंभाची परंपरा स्पष्ट होते. पुढे पोळ उपनामाच्या घराण्यातील केशव यांचा ‘ग्रामज्योतिषी’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यावरून गावातील धार्मिक विधी, तिथी-वार, शुभमुहूर्त आणि कालगणना यांसारख्या बाबींमध्ये ग्रामज्योतिषीची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे दिसून येते. केशव यांचा पुत्र राज आणि त्रिंबक यांचा उल्लेखही शिलालेखात आढळतो. त्यामुळे स्थानिक कुटुंबाची वंशपरंपरा तसेच पुढील पिढ्यांचा धार्मिक कार्यातील सहभाग स्पष्ट होतो.

शालिवाहन शक १६६७, क्रोधन नाम संवत्सर, श्रावण शुद्ध पंचमी, इंदुवार (सोमवार), म्हणजेच २  या दिवशी धर्मार्थ, अर्थात धार्मिक पुण्यप्राप्तीच्या उद्देशाने राजराजेश्वर देवाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना करून शिवालयाचे बांधकाम करण्यात आले, अशी नोंद या शिलालेखातून मिळते. त्यामुळे हा लेख संबंधित देवालयाच्या स्थापनेचा किंवा निर्मितीचा निश्चित कालसंदर्भ देणारा महत्त्वपूर्ण प्राथमिक पुरावा ठरतो. तसेच शक, संवत्सर, तिथी आणि वार यांची नोंद असल्यामुळे अठराव्या शतकातील कालगणना आणि धार्मिक दिननिश्चितीच्या परंपरेचाही अभ्यास करता येतो.

या शिलालेखातून मंदिरनिर्मिती ही केवळ धार्मिक वास्तू उभारण्याची कृती नसून पुण्यप्राप्ती आणि धर्माचरणाचे कार्य मानली जात होती, हे स्पष्ट होते. त्याचबरोबर देवालयनिर्मितीमध्ये केवळ राजे किंवा सत्ताधारी व्यक्तींचाच सहभाग नसून स्थानिक प्रतिष्ठित कुटुंबे आणि धार्मिक पदाधिकारीही पुढाकार घेत होते, याचे उदाहरण येथे दिसते. त्यामुळे हा शिलालेख तत्कालीन ग्रामीण समाजातील धार्मिक आश्रयव्यवस्था, सामाजिक प्रतिष्ठा आणि स्थानिक कुटुंबांचा मंदिरसंस्थेशी असलेला संबंध यांवर प्रकाश टाकतो.
एकंदरीत, हा शिलालेख पोळ घराण्याची सामाजिक ओळख, केशव यांची ग्रामज्योतिषी म्हणून असलेली भूमिका, राज व त्रिंबक यांचा धार्मिक कार्यातील सहभाग, राजराजेश्वर देवाची प्रतिष्ठापना, शिवालयनिर्मिती, धर्मार्थ कार्याची संकल्पना आणि अठराव्या शतकातील कालगणना यांची एकत्रित माहिती देतो. त्यामुळे स्थानिक धार्मिक इतिहास, सामाजिक-सांस्कृतिक इतिहास, कुटुंबपरंपरा, मंदिरसंस्थेचा विकास आणि स्थापत्य इतिहास यांच्या अभ्यासासाठी हा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा प्राथमिक ऐतिहासिक स्रोत ठरतो.

====================================

गावाचे नाव :- मु. पो . जामगाव ता.पारनेर , जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१९.०६३५९०,E..७४.५२०४४५
शिलालेखाचे स्थान :- गावातील राजराजेश्वर मंदिराच्या मुख्य गाभारा प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भिंतीवर कोरला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , मराठी संस्कृत भाषा
प्रयोजन :- पोळ घराण्याच्या वंशजांनी मंदिराचे बांधकाम करून विधीपूर्वक देवाची प्रतिष्ठा केल्याची स्मृती जपणे.
.मिती / वर्ष :- शालिवाहन शक १६६७ , क्रोधन नाम संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी , इंदुवार
काळ वर्ष :- अठरावे शतक –इ .सन २२ जुले १७४५ सोमवार
राजा /कारकीर्द:- छत्रपती थोरले शाहू महाराज
ग्राम नाम:-
देवता नामः- श्री गणेशायनमा
व्यक्तीनाम :- केशव पोळ,राज पोळ त्रिंबक पोळ .
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे. डॉ. शैलेंद्र भांडारे
संक्षेप :- सके – शके, वद -वद्य पोलोपनामा -, पोळ उपनाम , क्रोधन-संवत्सर , र्षि-७,षष्ट-६,षोडश १६ ,शतेन -७ भू –श्रावण शु –शुद्ध ,प-पक्ष ।। इंदौ-सोमवार पंचम्यां-पंचमी
संदर्भ १.(IE VI -२२२

माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
टीप : सदर शिलालेख संशोधन वाचन कार्यात डॉ.श्रींनंद बापट ,भूषण पोळ ,सवित्र पोळ,प्रसाद मेहर यांची विशेष मदत झाली आहे.

TAGGED:
Leave a Comment