महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,48,176

भास्करचार्यांचे मूळगाव पाटणा

By Discover Maharashtra Views: 3790 8 Min Read

भास्करचार्यांचे मूळगाव चाळीसगाव तालुक्यातील पाटणा…

भास्करचार्यांचे मूळगाव पाटणा – देवगिरीचे यादव घराणे इ.स. 850 ते 1334 याप्रमाणे कारभार करत असताना त्यांचे साम्राज्य नर्मदा ते तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यावेळी संस्थापक भिल्लमदेवपासून सेऊनदेव, जैतुकी, सिंघनदेव आणि कृष्णदेव यांनी आपल्या साम्राज्यात धर्म, कला, स्थापत्य,संगीत, गणित, खगोलशास्त्र यामध्ये उतुंग प्रगती केली. यादरम्यान जैतुकी यादवाच्या अधिपत्याखाली आजच्या खानदेश परिसरात निकुंभ राजा सोन्हदेवचे राज्य होते. या अर्थाने सोन्हदेव हा यादवांचा मांडलिक राजा होता. देवगिरीच्या यादवांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांनी निर्माण केलेली हेमाडपंथी होय. त्यानुसार जैतुकी यादवाच्या कालखंडात शके 1128 म्हणजे इ.स. 1206 मध्ये मौजे पाटण ता. चाळीसगाव जि. जळगाव याठिकाणी चंडिकादेवीचे मंदिर बांधण्यात आले. चाळीसगावपासून फक्त 18 किमी अंतरावर पाटनचा परिसर म्हणजे अजिंठा आणि सह्याद्रि डोंगर रांगाच्या पायथ्याचा भाग असल्याने येथे पितळखोरी लेणी, गौताळ म्हणजे औटरमचे 280 चौरसमैलावर पसरलेले अभायारण्य आणि मराठवाडा व खानदेशाला जोडणारा औटरम – कन्नडचा घाट तसेच कन्हेरगडचा किल्ला इत्यादि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. त्यामुळे पाटण गावही अत्यंत दुर्गम डोंगरात वसलेले आहे.

देवीच्या मंदिरातील शिलालेख –

इतिहासात शिलालेख म्हणजे सर्वात विश्वसनीय संदर्भ मानला जातो. त्यानुसार पाटणच्या चंडिका म्हणजेच पाटणदेवी मंदिरात एक शिलालेख असून इ. स. 1206 रोजी चांगदेवनामक व्यक्तीने कोरलेला आहे. हा चांगदेव म्हणजेच थोर गणिती भास्कराचार्याचा नातू असून चांगदेव हे यादवाच्या पदरी मुसद्दी म्हणून वावरत होते. त्यांनी सिद्धांत शिरोमणी ग्रंथाच्या अध्यायनाकरिता विज्जलगड म्हणजेच पाटण येथील निसर्गरम्य वातावरणात एका मठाची स्थापना केली होती. देवगिरीच्या सेऊनचंद्र यादवाने याच परिसरात चंडिका अर्थात पाटणदेवीचे मंदिर बांधले.75 फुट लांब, 36 फुट रुंद व 18 फुट उंच असणारे पाटणदेवी मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे.यासोबतच महादेव, भैरोबा इत्यादि मंदिराची उभारणी 1206 ला झाली.

तेव्हा यादवाचा मांडलिक निकुंभ राजा सोन्हदेव याने चांगदेवच्या मठाला दानपत्र दिले. या दानपत्राचा उल्लेख देवी मंदिरातील सभागृहात असणार्‍या शिललेखात करण्यात आलेला आहे. शके 1128, प्रभावनाम संवत्सर, श्रावण पौर्णिमा, चंद्रग्रहण याप्रमाणे तारीख आहे. जवळपास 24 श्लोकापैकी 4 श्लोक देवगिरीच्या यादवांविषयी माहिती देणारे आहेत. 7 श्लोक हे भास्कराचार्याच्या मागील 8 पिढ्यांची माहिती देणारे आहेत तर 4 श्लोक हे भास्कराचार्याच्या उपाध्यावर खर्च केलेले आहेत. त्यानुसार त्यात त्यांना विद्वान, लोकांच्या वंदनाला पात्र, गणितात शिवसारखा,वेदविद्या, छंदशास्त्र,कविवृंद, सर्वज्ञ यासारख्या पदव्यांचा समावेश आहे. शिवाय पाटणे बाजारातील व्यापारावर कर बसवून जे उत्पन्न येईल ते मंदिरासाठी दान देण्यात येईल, अशा प्रकारचा उल्लेख या शिलालेखात करण्यात आलेला आहे.

भास्करचार्य –
त्यानुसार विज्जलगड अर्थात पाटण याठिकाणी 1114 ला थोर विद्वान महेश्वराचार्य यांच्यापोटी भास्करा चार्याचा जन्म झाला. त्यानंतर भास्कराचार्याचा मुलगा लक्ष्मीधर व शेवटी चांगदेव. अशा प्रत्येकाने आपल्या बुद्धीची चुणूक दाखविल्याचे दिसून येते.पाटणसारख्या निसर्गरम्य वाटवरणात बसून भास्करचार्य यांनी जगाला गणित आणि खगोल शास्त्रातील अनेक नवीन तत्वाचा उलगडा केला. ‘जगाला शून्याचे महत्व’ महत्व पटवून दिले, गणितातील pells Equation हे समीकरण त्यांनी चक्राकार पद्धतीने सोडविले ज्याकरिता युरोपला 600 वर्षे लागली. गुंज, मासा, तोळा अशा अनेक संकल्पना त्यांनी मांडल्या. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण याविषयी खगोलशास्त्रीय माहिती त्यांनी जगाला दिली. या सर्व गोष्टीवर आधारित त्यांनी 1. सिद्धांत शिरोमणी 2. करण कुतूहल, 3. सर्वोतोभद्र मंत्र 4. वशिष्ठतुला आणि 5. विवाहपटल यासारखे अनमोल ग्रंथ लिहिले.

पाटणा –

पाटणा ता. चाळीसगाव जि. जळगाव हे ठिकाण चाळीसगावपासून फक्त 18 किमी वर असून याठिकाणी अतिशय निसर्गरम्य परिसरात पाटणा देवीचे मंदिर आहे. प्राचीन काळी पाटणा हे गाव तेर पैठण कल्याण सोपारा या महामार्गावरील अतिशय मोक्याचे ठाणे असून येथे मोठी बाजारपेठ होती. याच कुशीत भास्करचार्याचा जन्म झाला. दोनशे वर्षापासून देवीच्या पूजेची व्यवस्था जोशी कुटुंबाकडे असून त्यांना 1861 आणि 1896 ला इंग्रजांनी पूजेच्या मावेजाच्या सनदा दिलेल्या आहेत. पाटनदेवी मंदिर परिसरात राहण्यासाठी अतिशय उत्तम व्यवस्था आहे. जवळच पितळखोरी आणि नागार्जुन लेणी, गौताळा किंवा औटरम अभयारण्या, कण्हेरगडचा किल्ला, हेमाडपंथी शैलीतील आणखी काही मंदिरे तसेच धवलतीर्थ धबधबा व विविध झाडाझुडपानी नटलेला परिसर व त्यातील अनेक प्राणी पक्षी पाहायला मिळतात. शासनाच्यावतीने पाटनदेवी परिसरात भास्करचार्य निसर्ग शिक्षण केंद्र आणि गणित नगरी उभा करण्याचे काम वेगात चालू आहे. नाटककार शेक्सपियरच्या गावात वर्षभर यात्रेचे स्वरूप असते तर जगाला शून्याचे महत्व पटवून देणार्‍या भास्करचार्याच्या गावावर आपणास जनरल नॉलेजवर प्रश्न विचारावा लागतो ही आपली शोकांतिका आहे.

काही संदर्भ..संदर्भ अरविंद कोल्हटकर

शिलालेखाचे वाचन डॉ. भाऊ दाजी ह्यांनी केले आणि ते Journal of the Royal Asiatic Society, New Series, Vol. I येथे प्रकाशित केले. तेच वाचन प्रोफ़ेसर कीलहॉर्न ह्यांनी संपादित केले ते Epigraphia Indica, Vol. I येथे पान ३३८ येथे उपलब्ध आहे. ( जिज्ञासूंना हे पुस्तक DLI मध्ये मिळेल.) २६ ओळींच्या ह्या लेखात पहिल्या २१ श्लोकबद्ध संस्कृतमधे आणि उरलेल्या ५ गद्य मराठीमधे आहेत. संस्कृत श्लोकात चंगदेवाची पूर्ण वंशावळ आहे ती अशी:

शाण्डिल्यवंशे कविचक्रवर्ती त्रिविक्रमोऽभूत्तनयोऽस्य जात:।
यो भोजराजेन कृताभिधानो विद्यापतिर्भास्करभट्टनामा॥ १७.
तस्माद्गोविन्दसर्वज्ञो जातो गोविन्दसन्निभः।
प्रभाकरः सुतस्तस्मात्प्रभाकर इवापरः॥ १८.
तस्मात्मनोरथो जातः सतां पूर्णमनोरथः।
श्रीमान्महेश्वराचार्यस्ततोऽजनि कवीश्वरः॥ १९.
तत्सूनुः कविवृन्दवन्दितपदः सद्वेदविद्यालता-
कन्दः कंसरिपुप्रसादितपदः सर्वज्ञविद्यासदः।
यच्छिष्यैः सह कोऽपि नो विवदितुं दक्षो विवादी क्वचि-
च्छ्रीमान् भास्करकोविदः समभवत्सत्कीर्तिपुण्यान्वितः॥ २०.
लक्ष्मीधराख्योऽखिलसूरिमुख्यो वेदार्थवित्तार्किकचक्रवर्ती।
क्रतुक्रियाकाण्डविचारसारविशारदो भास्करनन्दनोऽभूत्॥ २१.
सर्वशास्त्रार्थदक्षोऽयमिति मत्वा पुरादतः।
जैत्रपालेन यो नीतः कृतश्च विबुधाग्रणीः॥ २२.
तस्मात्सुतः सिङ्घणचक्रवर्तिर्दैवज्ञवर्योऽजनि चङ्गदेव:।
श्रीभास्कराचार्यनिबद्धशास्त्रविस्तारहेतोः कुरुते मठं यः॥ २३.
भास्कररचितग्रन्थाः सिद्धान्तशिरोमणिप्रमुखाः।
तद्वंश्यकृताश्चान्ये व्याख्येया मन्मठे नियमात्॥ २४.

ही वंशावळ (कविचक्रवर्ती) त्रिविक्रम – (भोजराजाश्रय – विद्यापति) भास्कर – गोविंद – प्रभाकर – मनोरथ – (कवीश्वर) महेश्वर – भास्कर (लीलावती इ.) – (जैत्रपालाश्रय) लक्ष्मीधर – (सिंघणाश्रय) चंगदेव मठकर्ता अशी आहे. ह्या श्लोकांवरून असे दिसते की भास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला देवगिरीचा राजा जैत्रपाल ह्याने आपला प्रमुख पंडित म्हणून नेमले होते आणि स्वत: चंगदेव हा जैत्रपालाचा मुलगा सिंघण (सन १२१० – १२३३) ह्याचा ज्योतिषी होता. लेखातीलच अन्य काही माहितीवरून असेहि कळते सिंघणाचा मांडलिक निकुंभवंशीय सोइदेव आणि त्याचा भाऊ हेमाद्रि ह्यांनीहि शके ११२९ (सन १२०७) मध्ये मठाला काही नेमणूक करून दिली होती.

लेखाच्या अखेरीस चंगदेवाच्या मठाच्या निर्वाहासाठी लावून दिलेल्या देणग्यांचा तपशील जुन्या मराठीत आहे. कीलहॉर्न ह्यांचे Epigraphia Indica मधील वाचन सदोष वाटते आणि बरेच शब्द निरर्थक वाटतात पण तुळपुळे-फेल्डहाउसकृत जुन्या मराठीच्या कोषाच्या मदतीने मी बराचसा भाग सुधारून लावू शकतो तो पुढे देत आहे.
श्रीसोइदेवेन मठाय दत्तं हेमाडिना किंचिदिहापरैश्च।
भूम्यादि सर्वं प्रतिपालनीयं भविष्यभूपैर्बहु पुण्य?? ॥२५॥
(सोइदेव, हेमाडि आणि काही अन्य अशांनी मठाला दिलेली जमीन इत्यादि पुढील काळातील राजांनी चालू ठेवावी.)

ह्यापुढील देणग्यांशी संबंधित मराठी भागाचा पुढील छाप मला वि.ल.भावेकृत आणि शं.गो.तुळपुळेसंपादित ’महाराष्ट्र सारस्वत’ ह्या ग्रंथामध्ये मिळाला. औत्सुक्यापोटी तो पुढे दाखवीत आहे. लेखाच्या थोडयाफार निरनिराळ्या वाचनांपैकी वि.ल.भावे ह्यांचे वाचन आणि अर्थ ह्यांवर आधारित अर्थ त्यापुढे देत आहे. येथे आणखी एक लक्षणीय गोष्ट आहे ती अशी. अन्य सर्व लेख प्रतिष्ठादर्शक असा संस्कृत भाषेत असला तरी प्रत्यक्ष दानाचे वर्णन सर्वसामान्यांनाहि कळावे म्हणून मराठी भाषेत दिलेले आहे.

स्वस्ति श्रीशाके ११२८ प्रभवसंवत्सरे श्रावणमासे पौ
र्णमास्यां चंद्रग्रहणसमये श्रीसोइदेवेन (सर्वजनसंनिधौ हस्तोदकपूर्व्वकं निजगुरुमठाय दानं दत्तं तद्यथा॥)
इयां पाटणी जे केणें उघटे तेहाचा जो असिआउ जो राउला
होता ग्राहकापासी तो मठा दीन्हला॥ ब्राह्मणा जे विकतेया
पासी ब्रह्मोत्तर ते ब्राह्मणी दीन्हले॥ ग्राह
कापासी दामाचा वीसोवा आसूपाठी नगरे दीन्हला॥ तुलदाइ
या बैला सिद्धवै॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहका
पासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहि
लेया घाणे आदाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे
वाहति तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते म
ढीचेन मापे मवावे मापाउ मढा अर्द्ध ॥ अर्द्ध
मापहारी ॥ रूपाचे सूंक । तथा भूमि॥ चतुराघाट विशुद्ध

माहिती साभार – Dr. Satish Kadam

Leave a comment