धाराशिव जिल्ह्यातला भुईकोट किल्ला परंडा…
धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहिल्यानगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत. प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी या सर्वांचा नाश करणाऱ्या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड आढळतो. त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे. धारवाड जिल्ह्यातील होन्नती गावातील इ.स.११२४ च्या शिलालेखात पलिखंड नावाचा उल्लेख असून येथे सिंघनदेवाची सत्ता असल्याचे म्हटले आहे…
देवगिरीच्या यादवांकडून बदामीच्या चालुक्याकडे परंडा गेल्यानंतर गावाला परगण्याचा दर्जा मिळाला. चालुक्यांनी सुरुवातीला छोटीशी किल्लेवजा गढी बांधली होती. पुढे बहामनी सुलतानाकडे परंडा आल्यानंतर दिवाण महंमद ख्वाजा गवान याने इ.स.१४७० च्या आसपास परंड्याचा किल्ला बांधलेला आहे. भुईकोट प्रकारातील परंडा किल्ला हा दक्षिणेतील सत्ताधाऱ्यांसाठी केंद्रस्थानी असून परंडा हे विजापूर, हैदराबाद, सह्याद्री परिसरात जाण्यासाठी मध्य भागी होते मुनिमखान संभाजीनगराच्या एका पत्रानुसार मोगल काळात परंडा जिल्ह्यात १९ तालुके व ६२१ गावांचा समावेश होता. तर परंड्याची महसूल वसुली २० लाखांवर होती…
इ.स.१७०० मध्ये मराठा सेनापती धनाजी जाधव यांची जुल्फिकारखाना बरोबर निकराची युद्ध :
१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणाऱ्या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता. असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवांने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी वसुली फस्त केला होता. सेनापती धनाजी जाधव पुढे व जुल्फिकारखान मागे अशा या मोहिमांचा वृत्तांत भीमसेन सक्सेनावेबदिला आहे. तो म्हणतो..,
“जुल्फिकारखान याने तुळजापूर नळदुर्ग आणि गुंजोटी भागात कूच केले. त्यानंतर तो पांढरी, मुंगीपैठण, हिरूकला, आष्टी, परंडा, नांदेड, औसा, उदगीर करीत हैदराबादच्या सुभ्याच्या सरहद्दीपर्यंत त्याने मराठ्यांचा पाठलाग केला. मराठ्यांच्या बरोबर अनेक निकराची युद्धे झाली. सेनापती धनाजी जाधव हे आपल्या सरदारांना बरोबर घेऊन मोगलांच्या विरुध्द होणाऱ्या या युद्धात असे…” अशा रीतीने धनाजींने वारंवार परंडा परिसरात धुमाकूळ घातल्याची नोंद सापडते. एवढेच नाही तर छत्रपती शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनीही परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही…!
इ.स.१६७८ साली मोगलांचा सेनापती दिलेरखान आणि दारूगोळ्याचा एक अधिकारी व ‘तारिखे दिल्कुशा’ ग्रंथाचा लेखक भीमसेन सक्सेना यांचा मुक्काम बरेच दिवस परंडा किल्ल्यात होता. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी किल्ल्या शेजारील तलावाचा गाळ काढून त्याची स्वच्छता केली होती. मध्ययुगातील मोठा सेनापती व तत्कालीन काळातील अंबानी शोभणारा मीरजुम्ला, औरंगजेबाचा सेनापती बहरामंदखान ही राहिला. इंग्लंडच्या राजाचा वकील थॉमस तसेच बादशहाच्या तोफखान्याचा प्रमुख व नामांकित डॉ निकोलस मनुची यांचाही या किल्ल्याने पाहुणचार केलेला आहे…
ऐतिहासिक मराठे आणि निझामाचा उदगीरचा तह येथेच तांदुळजाला झाला होता. राक्षसभुवन आणि खर्डाची लढाईमध्ये नाईक बावणेंच्या अश्वदलातील सरदार होते. इ.स १७९५ च्या खर्डाच्या लढाईत व्यंकटराव बावणे आणि निझामाचा वजीर मशीर उल्मुल्क यांचा सामना झाला होता. मग तांदुळजा गढीत तह झाला व ८२ लाखाचा मुलूख देण्याचे कबूल करून लढाई थांबली पण त्यांने तह पाळला नाही. ११ मार्च १७९५ ला लढाई झाली आणि निझामाचा पराभव झाला. तहात निझामाने परांडा किल्ला ते देवगिरी किल्ला तापी नदीपर्यंतचा मुलूख दिला. तहात “मराठी बोलणाऱ्यांचा वाडा” म्हणून “मराठवाडा” असे नाव पडले…
इतिहासात प्रसिद्ध तांदुळज्याचे सरदार नाईकजी बावणे घराणे :
इ.स.१७४९ मध्ये छत्रपती थोरले शाहूमहाराजांच्या मृत्यूनंतर नाईक बावणे अक्कलकोटकर भोसलें सोबत राहू लागले. फत्तेसिंह भोसलेंच्या सुलतानावरील स्वारीत नाईक बावणेंचे अश्वदळ होते. बावणे घराण्यातील विर पुरुष जानोजी महाराज नाईक बावणे व मालोजी महाराज नाईक बावणे हे छत्रपती थोरले शाहू महाराज कालीन आपल्या पराक्रमाची छाप सोडणारे मराठा सरदार. इतिहासात सरदार नाईकजी बावणे म्हणून प्रसिद्धी व नावारुपाला आले ती इतिहास प्रसिद्ध उदगीरची लढाई, राक्षस भुवनची लढाई व खर्ड्याची लढाई पासून. या तीनही लढाईत आपल्या पराक्रमाची शर्थ करुन हैदराबादच्या निजामाला मानहानी कारक तह करायला भाग पाडते. हैदराबाद निजामाचे सेनापती विठ्ठल सुंदरचा वध या नाईक बावणे बंधू नी केला. हैदराबादचा निजाम शरण आल्यावर जो तह झाला तो तांदुळज्याच्या नाईक बावणे यांच्या गढीतच. तहात खंडनी स्वरुपात जो प्रदेश मराठ्यांना मिळाला तो म्हणजे आजचा “मराठवाडा”….!
सचिन पोखरकर’ गडवाटकरी
