महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पानिपतवीर हैबतराव जाधव भुईंजकर व खंडेराव दरेकर !

By Discover Maharashtra Views: 1438 3 Min Read

पानिपतवीर हैबतराव जाधव भुईंजकर व खंडेराव दरेकर !!!

‘मर के भी जो न हटा वो – मरहट्टा’

हे ब्रीदवाक्य सार्थ करणारा मराठी अस्मितेचा सर्वात मोठा लढा म्हणजे पानिपत.. भारताचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी मराठ्यांनी कोसो दूर जाऊन आपल्या शौर्याची पराकाष्ठा केली. ‘लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही.’ अशा या महाप्रचंड पानिपत शौर्ययज्ञात भुईंजच्या वीरभुमीने आपली समिधा अर्पण केली नसती तरच नवल..! ती समिधा होती.. ‘राजश्री हैबतराव जाधव भुईंजकर’ (पानिपतवीर हैबतराव जाधव भुईंजकर व खंडेराव दरेकर !)

‌      पानिपतचा पत्रव्यवहार वाचत असताना 20-10-1760 रोजीचे एक पत्र हाती लागले. मराठ्यांनी उत्तरेत कुंजपुऱ्यापर्यंत मजल मारली होती. सैन्याला दिवसेंदिवस रसद कमी पडत होती, उत्तरेतील ठिकाणेदार आणि मांडलिक कोणतीही करभरणी करत नव्हते यातच पुण्यास पाठवलेल्या पत्रांनाही प्रतिउत्तर मिळत नव्हते. अशावेळी कुंजपुऱ्यावर विजय मिळवल्यानंतर तेथील वृत्तान्त नानासाहेबास कळवताना राजश्री बाळकृष्णपंत यांनी लिहिलेल्या पत्राचा मजकूर खालीलप्रमाणे..

|| श्री ||

तीर्थस्वरूप राजश्री नाना

वडिलांचे सेवेसी,

आपत्ये बाळकृष्णाने च्यरनावरी मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार. विनंती. येथील क्षेम ता छ १० रबिलोवलपावेतो मु‌ाा कुंजपुरा वर्तमान येथास्थित आसे विशेष. वडिलाकडून बहुत दिवस आसीर्वादपत्र येऊन वर्तमान कळत नवते. त्यास हाली छ १९ मोहरमचे पत्र पाठविले ते पावोन परम समाधान जाहाले. फोजेस रोजमुरा तीन महिने मिळत नाही याप्रमाणे लोकांची हलाकी. याप्रमाणे हलाकी जाहाली आहे. येथे कुंजपुरेयावर आज चार रोज आली…….  त्याउपरी समंधखान येथे दाहा हजार फउजेनिसी होता तो युध्य करून लुटिला. त्याचे सीर कापून भाल्यावर लाऊन लस्करातं फिरविले व कुतुबशा त्याचा सरदार होता तोही त्याप्रमाणेच मारिला…… आपल्याकडील लोक जखमी फार जाहाले. परंतु ठार कोणी मातबर जाहला नाही. खंडेराव दरेकर व हैबतराव जाधव भुईंजकर या दोघाजनास गोलीची जखम जाली आहे परंतु हलकीच आहे….

सदरच्या पत्रानुसार न मिळालेल्या रसदेची आणि पुण्यातून न पावणाऱ्या पत्रांची खदखद व्यक्त केल्यावर बाळकृष्ण पंत यांनी आपल्या कुंजपुऱ्यावरील विजयाचे वर्णन केले आहे. त्यानुसार समंधखान दहा हजार फौजेनिशी कुंजपुऱ्यावर होता त्यास मराठ्यांनी युद्ध करुन हरवले. त्याचे शीर कापून लष्करात फिरवले तसेच त्याचा सरदार कुतुबशहा यालाही ठार केले. कुंजपुऱ्याचा हा विजय खूप फायदेशीर ठरला, फार मोठी लूट आणि दोन-चार हजार घोडी मराठ्यांच्या हाती लागली. मराठ्यांच्या बाजूचा कोणीही मोठा सरदार शहीद झाला नाही फक्त राजश्री हैबतराव जाधव भुईंजकर व खंडेराव दरेकर असे दोघे गोळी लागून जखमी झाले.

राजश्री हैबतरावांविषयी पुढे अधिकची माहिती मिळत नसली तरी पानिपतावरुन थेट नानासाहेबांना पाठवलेल्या पत्रात यांचा उल्लेख येतो यावरुन ही मोठी असामी असावी असे कळते. तसेच या हैबतरावांना औरंगाबाद भागात वतनदारी होती. त्यांच्या नावे गंगापूर तालुक्यात ‘हैबतपूर’ नावाचे गाव वसवल्याची देखील माहिती समोर येते.

पानिपत युद्धसत्रात शौर्य गाजवणाऱ्या हैबतराव जाधव आणि इतर मराठा, ब्राह्मण, धनगर, रामोशी, पठाण अशा महाराष्ट्रभूतील तमाम मराठा वीरांना शतशः वंदन..

स्वप्नील महेंद्र जाधवराव.
फोटो – साभार विशाल बर्गे

Leave a comment