महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

अखंड प्रेरणास्त्रोत

By Discover Maharashtra Views: 1225 5 Min Read

अखंड प्रेरणास्त्रोत –

“……तुम्ही म्हणता की आपले राजकीय स्वातंत्र्य इतरांच्या मदतीशिवाय मिळविणे हे इटली देशास अशक्य आहे. ह्याच मताच्या प्रसुतीने नि उपदेशाने आपल्यातील स्वातंत्र्य संपादनाची ताकद नष्ट केलेली आहे. राजकीय स्वातंत्र्य संपादणे इटलीस अशक्य आहे? अशा रीतीने दोन कोटी साथ लक्ष लोक, ज्या लोकांच्या जवळ आल्प्स पर्वत, अॅपिनाईन्स पर्वत हे आहेत, ज्यांचे संरक्षण करण्यास दोन्ही बाजूंनी समुद्र सज्ज आहे, ज्यांना पूर्व पराक्रमांनी भरलेली तीन हजार वर्षे राष्ट्रीय सामर्थ्याची साक्ष देऊन उत्साहित करण्यास मूर्तिमान उभी राहिलेली आहेत, त्या दोन कोटी साथ लक्ष लोकांच्या राष्ट्राला आपण भागूबाईसारखं नामर्द ठरवीत आहा काय? इटलीमध्ये सामर्थ्याची कमतरता नाही. इटली मध्ये जे नाही ते आत्मावलंबन होय.” आपले स्वत्व विसरून गुलामगिरी पत्करणाऱ्या अडीच कोटी जनतेस गदागदा हलवून त्यांच्या ‘स्व’ची जाणीव करून देणाऱ्या १९व्या शतकातील जॉसेफ मॅझीनीचे हे विधान! ऑस्ट्रीयाच्या जाचातून आपल्या देशाला  स्वतंत्र करण्यासाठी तेथील लोकांमध्ये स्फुल्लिंग चेतविणारा हा व्यक्ति, त्याने सांगितलेली स्वातंत्र्यपूर्व इटलीची ही अवस्था!(अखंड प्रेरणास्त्रोत)

१९व्या शतकातील ही अवस्था इटलीची होतीच, पण कधीकाळी या हिंदुस्थानाची आणि पर्यायाने महाराष्ट्राची स्थिति याहून काय भिन्न होती? इटलीत आल्प्स आणि अॅपिनाईन्स पर्वत होते, तसाच ह्या महाराष्ट्रात बुलंद सह्याद्री होता, हजारो वर्षांपूर्वीचा आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास याही राष्ट्राला लाभला होता. पण मग त्यांनी कितीही मूर्त्या फोडल्या, कितीही देवळं पाडली आणि एतद्देशियांचा कितीही छळ केला, तरी  एतद्देशिय त्यांचेच तळवे चाटण्यास पुन्हा का सिद्ध होत? त्यांनी कितीही बायका भ्रष्टविल्या अब्रुंचे कितीही धिंडवणे काढले तरी एतद्देशिय आपल्या मुली त्यांच्या जनानखान्यात देण्यास का संतुष्ट होत? त्यांनी आमचं कितीही रक्त पीलं तरी त्यांच्याच वतीने आम्ही आमच्या भाऊबंदांच्या नरडीचा घोट घेण्यास का आतुरलेले होतो? याचं उत्तर मॅझीनीने वर उत्घृत केलेल्या शेवटच्या ओळीत दिलेले आहे,”

इटलीमध्ये सामर्थ्याची कमतरता नाही. इटली मध्ये जे नाही ते आत्मावलंबन होय.” हे त्याचे वाक्य विजयनगरच्या सूर्यास्तापासून  ते रायगडावरील सुर्योदयापर्यंतच्या रात्रकालास लागू होते.  एतद्देशिय लोक आपला इतिहास विसरले. आणि मग नशिबी आलं ते पारतंत्र्य! पारतंत्र्य येऊनही आम्ही इतके सत्वहीन झालो होतो की या भूमीवर पुन्हा आमचे राज्य होणे केवळ अशक्य आहे आणि हिंदू हा राजा होऊ शकत नाही, अशी मनोदशा येथील लोकांची झाली.

अशा दु:खप्रद परिस्थितीत फाल्गुन वद्य ३, शके १५५१ रोजी शिवनेरीवर ‘शिवाजी’ नवाचा ‘चमत्कार’ उदयास येतो. ह्या शिवाजीने,” वडिलांनी मेळविले ते खाऊन राहणे योग्य नाही. आपण हिंदू, दक्षणदेश सर्व म्लेंच्छांनी ग्रासिला, देव ब्राह्मण, क्षेत्रे गाई यांस बहुत पीडा जाली. धर्म अगदी बुडाला. हा रक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षावा आणि आपले पराक्रमे नवीन दौलत संपादावी”, हा निश्चय येथील जनसामांन्यात रुजवून, ‘तुमच्या प्रत्येकाचे राज्य साकारण्यास सिध्द व्हा, हे राज्य तुमचे, माझे सर्वांचे असेल’, ह्या निश्चयाचा संकल्प सोडला. ह्याच निश्चयपूर्तिसाठी बहुत लोक मेळवून, त्यांच्यात स्वराज्याचा येकविचार भरुन हा व्यक्ति म्लेंच्छांवर घसरला. येथील जनसामान्यांच्या मनात होणाऱ्या ह्या राज्याविषयी आपुलकी ह्या माणसाने निर्माण केली. त्याचबरोबर स्वातंत्र्याची जाणीव आणि महती पटवून दिली.’तुम्ही जसे बादशहासाठी लढत आहात तसे स्वतःसाठी लढा आणि स्वराज्य निर्माण करा’,ही प्रेरणा त्यांच्यात निर्माण केली. शिवाजी राजांनी ह्या माणसांना स्वातंत्र्याचा असा काही आविष्कार दाखविला, की त्या आविष्काराच्या प्रेरणेने राजे हयात असतांना ही लोक लढलीच,पण १६८१-१७०७ ही २६ वर्ष त्याच प्रेरणेने मराठे लढत राहिले. आपल्या हयातीच्या अर्धशतकानंतरही “आम्ही गनीम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो”,अश्या उद्गारांमागे हीच प्रेरणा आहे.

नरहर कुरूंदकर म्हणतात,” नवे राज्य निर्माण करणारे चांगले राजे भारताच्याही इतिहासात अधूनमधून होऊन गेले. समकालीन आणि उत्तरकालीन पुरुषांनी त्यांची पुण्यवानांमध्ये गणना केली. नल-युधिष्ठिरापासून  भोग-विक्रमादीत्यांपर्यंत आणेक राजे पुण्यश्लोक म्हणून गणले गेले. पण समकालीनांनी आणि उत्तरकालीनांनी मोठ्या श्रद्धेने जो राजा ईश्वरी अवतार मानला, असा एकटा शिवाजीच आहे! समकालीन महाराष्ट्रीयांपासून उत्तरकालीनांपर्यंत  जवळजवळ तीनशे वर्ष हा करता राजा ईश्वरी अवतार होता,अशी श्रद्धा चालत आली आहे.” अगदी कवींद्र परमानंद, कवी भूषणापासून साऱ्यांना हा प्रेरणास्त्रोत आणि ईश्वरी अवतार वाटतो. त्यामागे ह्या माणसाने केलेले उत्तुंग कार्य आणि त्यायोगे दिलेली प्रेरणा कारणीभूत आहे. ही प्रेरणा ह्या लोकांमध्ये एवढी भिनली की आजही ‘शिवाजी’ ह्या नावाने येथील लोकात वीरश्री संचारते आणि येथील प्रत्येक माणूस शिवछत्रपतींनी केलेल्या विलक्षण पराक्रमांची आठवण करून आपली छाती फुगवून घेतो आणि म्हणून श्री राजा शिवछत्रपती हा महामंत्र ह्या राष्ट्राचा अखंड प्रेरणास्त्रोत ठरतो.

ह्याच अखंड  प्रेरणास्त्रोत ठरणाऱ्या कार्याचे वर्णन एकश्लोकी शिवचरित्रातून- (दत्तोपंत आपटे लेखसंग्रहातून)

आदौतातविमुक्तिरफजलवध: पर्णालतो निर्गम:।
पश्चादुम्बरखिण्डी राजपुऱयो:  ताम्राग्लविद्रावणम् ।
शास्ताहस्तनिकृन्तनंच सुरतस्याSSलुण्ठिराग्रापुरान्।
मुक्ति: सिंहगडार्जनं नृपपदाप्तिर्दक्षिणे दिग्जय: ||

©अनिकेत वाणी

Leave a comment