चहाच्या टेबलावरचे जुने अपरिचित पाहुणे !

Old items on the tea table

चहाच्या टेबलावरचे जुने अपरिचित पाहुणे | Old items on the tea table

पूर्वीच्या शालेय पुस्तकात चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन नावाचा विषयुक्त पदार्थ असल्याने ही पेये पिऊ नयेत असे लिहिलेले असे. ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार घाला असे आवाहन केल्यावर, आमच्या काही नातेवाईकांनी त्यावेळी साखर ही मॉरिशसमधून येत असल्याने, चहा- कॉफी पिणेच सोडले होते. आज जगाची परिस्थिती पाहता हे सगळे आठवले तरी हसू येते. आज चहा म्हणजे पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायले जाणारे दुसऱ्या क्रमांकाचे पेय आहे. जगातल्या सर्वात उत्तम प्रतीच्या चहाचे सर्वाधिक प्रमाणात उत्पादन चीन आणि भारतात होते.

चीनमध्ये पूर्वी औषधी काढा म्हणून प्यायला जाणारा चहा नंतर पोर्तुगीज आणि ब्रिटिशांनी जगभर नेला. भारतीय आणि चीनच्या काही भागात तसेच जगात अनेक देशात चहाला आजही चा म्हटले जाते. चहाचे प्रकार, प्रत, भौगोलिक भाग, तयार करण्याच्या पद्धतीं इत्यादींनुसार हळूहळू चहामध्ये अनेक प्रकार आणि बदल आले. वेगवेगळ्या चहा पावडरींची स्वादानुसार मिश्रणे आली. त्यात दूध घातले जाऊ लागले. ब्लॅक टी, ग्रीन टी, प्यूएर टी, ऊलोंग टी अशा असंख्य प्रकारांबरोबरच लेमन टी, जस्मिन टी, रोज टी पासून ते थेट भारतीय मसाला चहा असे चहाही अवतरले.
त्याचबरोबर अवतरली एक शिष्टसंमत “चहा संस्कृती” ! चहाचे कप, बश्या, किटल्या, दूध-साखरेची भांडी, गाळणी,कोस्टर, चमचे, मग्ज असे असंख्य प्रकार टेबलावर अवतरले. त्यांच्या दर्जावर यजमानांचा आणि पाहुण्यांचा दर्जा ठरू लागला.पाहुणचाराचा तो एक महत्वाचा आणि अविभाज्य भाग ठरून गेला. चहासाठी लागणाऱ्या कमीतकमी गोष्टींची ओळख अगदी सामान्य भारतीयालादेखील आहे.

माझ्या संग्रहात असलेल्या आणि हळूहळू अस्तंगत झालेल्या जुन्या काळातील काही गोष्टींची आठवण किंवा ओळख करून देत आहे. यातील “टी स्पून”वर किटलीचे चित्र आहे. एक टी स्पून पावडर आपण या चमच्यातून घालू शकतो. या पावडरचा वास टिकून राहण्यामध्येच चहाची लज्जत दडली असल्याने, चहा पावडरसाठी घट्ट झाकणाचा खास पितळी डबा असून त्यावरील माहिती वेगवेगळ्या फॉन्टमध्ये कोरलेली आहे.
किटलीतील चहा जास्त वेळ गरम राहावा म्हणून विविध उपाय केले जात असत. किटलीला चक्क स्वेटर विणून घातला जाई. पण सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे “टी कोझी” ! जाड रजईसारखी किटलीला घातलेली उंच टोपी म्हणजे “टी कोझी”. याची एक ऐकीव कथा पुन्हा ऐकण्यासारखी आहे. ब्रिटिशांच्या अंमलानंतर मध्य भारतामधिल अनेक संस्थाने खिळखिळी झाली तरी त्यांचा सरंजामशाही आव टिकून होता. तेव्हा तिकडे मुस्लिम समाजात उंच उंच टोप्या वापरात होत्या. एका संस्थानामध्ये खास लोकांसाठी ‘ दावत ‘ आयोजित केली होती. दिवाणजी महालाच्या द्वारातच स्वागत करीत होते. प्रत्येकजण आपले नाव सांगून आत जात होता. ब्रिटिशांकडे काम करणाऱ्या एका खानसाम्याला या दावतमध्ये घुसायचे होते. त्यांनी टोपीऐवजी हा टी कोझी डोक्यावर चढविला. दारावर नाव विचारल्यावर त्याने आपले नाव टिकोझी असे सांगितले. कुणाला कळेना की ” हे कोण टिकोझीराव “? तेव्हापासून पुढेपुढे करणाऱ्या अपरिचित माणसासाठी ” हे कोण टिकोझीराव ” हा वाक्प्रचार अस्तित्वात आला. या किश्श्यात खरे किती – खोटे किती हे सोडले तर हा शब्द लक्षात ठेवायला हा किस्सा नककीच उपयुक्त आहे.

आता आपण डीपडीपवाल्या टी बॅग्ज वापरतो त्याऐवजी ईशान्य भारतात जाळीच्या दोन चमच्यांचा खास चिमटा वापरला जात असे. हा स्प्रिंग असलेला चमचा दाबून उघडल्यावर त्यात आवश्यक तेवढी चहाची पूड ठेवल्यावर चमचा बंद होत असे. उकळत्या पाण्यात हा चमचा ठेवल्यावर चहा तयार होत होई आणि तो गाळायला वेगळ्या गाळण्याची गरज रहात नसे. आजही काही तारांकित हॉटेल्समध्ये असे चमचे वापरले जातात.

माहिती साभार – Makarand Karandikar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here