नारो भगवंत कुलकर्णी यांच्यावर गुदरलेला प्रसंग आणि त्यांची नशीबाने झालेली सुटका

By Discover Maharashtra Views: 1208 5 Min Read

नारो भगवंत कुलकर्णी यांच्यावर गुदरलेला प्रसंग आणि त्यांची नशीबाने झालेली सुटका –

पानीपत युद्धानंतर अफगाणांकडून मराठी लोकांवर जे अत्याचार झाले त्याचे प्रत्यक्षदर्शी आणि स्वानुभव घेतलेल्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील अरळा गावचे नारो भगवंत कुलकर्णी हे गृहस्थ होते. मराठ्यांचा इतिहासकार आणि इंग्रज अधिकारी जेम्स ग्रँट डफ याने पुढे त्यांची मुलाखत घेतली तेव्हा कुलकर्णी यांनी आपल्यावर गुदरलेला हा प्रसंग डफला सांगितला. तो त्याने आपल्या History of the Marathas या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडामध्ये लिहिला आहे. तो प्रसंग पुढील प्रमाणे:-

सदाशिवराव भाऊ दक्षिणेतून हिंदुस्थानात आले तेव्हा त्यांच्या तोफखान्यातील एका अफगाण तुकडीचे कारकून म्हणून नारो भगवंत कुलकर्णी त्यांच्या सोबत होते. मराठ्यांनी अफगाणांवर हल्ला केला तेव्हा या अफगाणांच्या तुकडीचा जमादार म्हणून प्रसिद्ध असलेला हुसेन खान याने भाऊकडे अर्ज केला की, “माझ्या तुकडीतील लोकांना (अफगाणांना) अब्दालीशी लढायला भिती वाटते कारण रोहिल्यांनी आणि अब्दालीने आम्हाला ताकीद दिली आहे की, तुम्ही जर आपल्याच राजाविरुद्ध (अब्दाली) शस्त्र चालवताना दिसलात तर आम्ही तुम्हाला ठार मारु. तेव्हा तुम्ही आम्हाला तुमच्या नोकरीतून मुक्त करा.” असे म्हणून त्याने सदाशिवरावभाऊच्या नोकरीतून आपली सुटका करून घेतली. परंतु जाताना तो भाऊला म्हणाला की, “मी तुमचे मीठ खाल्ले आहे आणि तुमची नोकरी सोडून जाताना मला अतिशय दु:ख होत आहे. परिस्थिती स्थिरस्थावर झाली की मी परत तुमच्या नोकरीत येईन.” या प्रसंगानंतर देखील त्याचा भाऊशी पत्रव्यवहार होत असे आणि नारो भगवंत कुलकर्णी त्याला साक्ष होते.

पुढे पानीपतात मराठ्यांचा पराजय झाल्यानंतर हाती सापडलेल्या लोकांच्या हातावर मुठ मुठ भाजलेलं धान्य देऊन आणि भिस्त्यांकरवी त्यावर पाणी ओतवून या लोकांची मुंडकी उडवायचा खेळ अफगाणांनी सुरु केला. मुंडकी उडवण्यासाठी पुढे आणलेल्या लोकांमध्ये हे नारो भगवंत कुलकर्णी होते. परंतु त्यांचे दैव बलवत्तर असल्याने त्यांचा जीव वाचला.

ज्या भिस्त्याने त्यांच्या हातावर पाणी ओतले तो भाऊकडून नोकरी सोडून आलेल्या हुसेनखानाच्या सेवेत होता. त्याने कुलकर्णींना ओळखले आणि याबाबत त्याने ताबडतोब हुसेनखानाकडे जाऊन सांगितले की, “आपल्या ब्राह्मणाला मारण्यासाठी पुढे आणले आहे !” हे ऐकताच हुसेनखान लगेचच तिथे आला आणि त्याने मुंडकी उडवण्यासाठी तिथे उभ्या असलेल्या अफगाणांना काहीतरी सांगितले. नारो भगवंत कुलकर्णी ग्रँट डफला सांगतात की बहुधा , “हा माणूस मला गुलाम म्हणून हवा आहे” असे त्याने सांगितले असावे, कारण यानंतर लगेचच हुसेनखानाने त्यांना बखोटीला धरून आपल्या तंबूकडे खेचत नेले आणि तिथे ते एक दिवस राहीले.

यानंतर हुसेनखानाने कुलकर्णी यांना आपल्या दुभाषाद्वारे विचारले की, “तुला माझ्या सोबत रहायचे आहे का दक्षिणेत परत जायचे आहे ?” यावर कुलकर्णी यांनी, “मला आपल्यासोबत रहायचे आहे.” असे सांगितले. यावर हुसेनखान जमादार दुभाषाला म्हणाला की, “तो खोटं बोलतोय हे त्याला सांग.” असं म्हणून हुसेनखानाने कुलकर्णींना एका बाजूला घेतले आणि हिंदुस्थानी भाषेत (ही भाषा हुसेनखानाला येत होती आणि आवश्यकता असेल तेव्हा ती तो बोलत असे.) तो त्यांना म्हणाला की, “माझ्या मित्राची घोडदळाची एक तुकडी आहे. तो तुला छावणीपासून वीस कोसांवर सोडेल.” असे म्हणून त्या दिलदार अफगाणाने कुलकर्णी यांना सोन्याच्या पाच मोहरा दिल्या आणि सांगितले की, “या मोहरांबद्दल त्या तुकडीवाल्यांना माहिती नाहीये, तेव्हा त्या सांभाळून ठेव.” असे म्हणून त्याने कुलकर्णींची रजा घेतली.

थोडे अंतर कापल्यावर कुलकर्णी यांना हुसेनखान जमादाराचे शब्द आठवले आणि हे तुकडीवाले सोन्यानाण्यासाठी कदाचित आपली झडती घेतील हे लक्षात आल्यामुळे त्यांनी आपल्याकडच्या मोहरा तोंडात लपवल्या. परंतु त्या तुकडीत इतरांपेक्षा चलाख असा एक मनुष्य होता. त्याने कुलकर्णींना त्या मोहरा लपवताना पाहिले होते. आपले साथीदार थोडे दूर निघून गेल्यावर तो मनुष्य त्या मोहरांसाठी कुलकर्णींच्या मागे लागला.

कुलकर्णी जीव घेऊन पळत होते. मागे वळून पाहतात तर मोठे डोळे आणि लांबलचक दाढी असलेला तो अफगाण माणूस मागून तोडक्या मोडक्या हिंदुस्थानी भाषेत ओरडत होता,

” ए बामणा ! अरे ए बामणा ! तोंडात काय लपवलंयस !”

त्या माणसाने शेवटी त्यांना गाठले आणि त्यांच्याकडच्या मोहरा त्याने काढून घेतल्या, आणि “नरकात जा !” असे कुलकर्णी यांना म्हणून तो आपल्या साथीदारांकडे निघून गेला.

ग्रँट डफ लिहितो की मी म्हाताऱ्या नारो भगवंत कुलकर्णी यांची दोन वर्षांनी पुन्हा एकदा उलटतपासणी घेतली आणि ते सांगतायत ती गोष्ट खरी आहे याची मला खात्री पटली !

संदर्भ:-
१)History of the Marathas, Grant Duff
२) Battle of Panipat in light of rediscovered paintings, Manoj Dani

सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

Leave a comment