महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,49,511

नक्षत्रवाती – कार्तिक महिन्यातील एक अपरिचित व्रत !

By Discover Maharashtra Views: 3603 5 Min Read

नक्षत्रवाती – कार्तिक महिन्यातील एक अपरिचित व्रत !

हिंदू धर्मामध्ये परंपरेने, प्रांतानुरूप, जाती – समुदायनिहाय अनेक चालीरीती, व्रते, पूजा चालत आलेल्या आहेत.
त्यातील बहुतेक सर्व निसर्गाच्या बदलांशी निगडित असलेल्या आपल्याला दिसतात. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फुले, फळे तसेच संबंधित विधींचे स्वरूप हे निसर्गाच्या त्यावेळी असलेल्या स्थितीला अनुरूप असे असते.

पावसाळ्यात प्रत्येक कुटुंबातील जवळपास सर्व माणसे शेती, बागायतीमध्ये अडकलेली असायची. शेते, बागायत
पिकून तयार झाली, उत्पन्न हाताशी आले की ही माणसे जरा निवांत होत असत. त्यानंतरच आपले सगळे महत्वाचे सणवार सुरु होतात. पूर्वी श्रावणापासून मार्गशीर्ष महिन्यापर्यंत केली जाणारी कित्येक आगळीवेगळी व्रतवैकल्ये आता विस्मृतीत गेली आहेत. मात्र त्यातील अनेक प्रथा, रूढी आता खूप वेगळ्या रूपात पुन्हा अवतरतांना दिसतात.

असेच एक पूर्ण विस्मृतीत गेलेले आणि फक्त कार्तिक महिन्यात केले जाणारे एक व्रत म्हणजे ‘ नक्षत्रवाती लावणे ‘. सध्या कार्तिक महिना सुरु आहे. या काळात, दिवस उशिरा उजाडतो आणि लवकर मावळतो. पहाटे खूप वेळ काळोख असतो. थंडी बऱ्यापैकी स्थिरावलेली असते. अशा वातावरणात हे व्रत पूर्ण कार्तिक महिनाभर केले जात असे. जर पूर्ण महिनाभर नाही जमले तर या महिन्यातील चार रविवार किंवा सोमवारी केले जाई. पहाटे गरम पाण्याने स्नान करून याची तयारी केली जात असे. या काळामध्ये पूर्वी आवळ्याला खूप महत्व होते. त्यामुळे एका तांब्याच्या ताम्हनात किंवा केळीच्या पानावर, आवळ्याच्या २९ चकत्या मांडल्या जात असत. त्यावर २७ नक्षत्रांच्या २७ वाती अधिक चंद्र सूर्यासाठी २ वाती अशा शुद्ध तुपातील २९ वाती मांडल्या जात असत.

जोपर्यंत आकाशात नक्षत्र दिसत असतात तोपर्यंत या वाती उजळून ( पेटवून ) त्या अंगणातील तुळशीजवळ ठेवल्या जात असत. यामुळे नक्षत्रदोष, राशींमधील ग्रहांची पीडा दूर होते, स्थैर्य लाभते अशी श्रद्धा होती. किती सुंदर दृश्य असेल ते ! मस्त काळोख आणि थंडी. नुकतीच संपलेली दिवाळी आणि पहाटे या ज्योतींनी उजळलेले अंगण ! धार्मिक व्रत आणि वातावरण यांचा एक सुंदर मिलाप. !!
या कल्पनेशी संबंधित असे दोन सुंदर दिवे माझ्या संग्रहात आहेत. त्याची सोबतची छायाचित्रे जरूर पाहावीत.

अशीच एक प्रथा होती ती म्हणजे ‘ आवळीभोजन ‘ ! याचा पूर्वीच्या मराठी साहित्यात कुठेतरी उल्लेख तरी आढळतो. चिं. वि. जोशी यांच्या चिमणराव – गुंड्याभाऊ यांच्या एका गोष्टीत याचा ओझरता उल्लेख आहे. पूर्वीचे आवळीभोजन आणि वनभोजन म्हणजे आत्ताच्या ट्रेकिंग, हायकिंग, पिकनिकचे पूर्वज म्हणायला हवेत ! कार्तिक महिन्याच्या अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत हा आवळीभोजनाचा कार्यक्रम केला जात असे. भाजून तयार केलेले खाद्यपदार्थ सोबत घेऊन, मंडळी एखाद्या आवळ्याच्या झाडाखाली जमत असत. भगवान विष्णुची आणि आवळ्याची पूजा करून मग गप्पाटप्पा, हास्य- विनोद, बैठे खेळ, उखाण्यांतून कोडी घालणे असे तत्कालीन शिष्टसंमत प्रकारांचे आयोजन केले जात असे. यात लहान मुलांचा सहभाग नसायचा . मुले गेलीच तर ती आपापल्या आईसोबत जात असत.

महिलांमध्ये हे आवळीभोजन अधिक लोकप्रिय होते. त्याकाळी धार्मिक आधारावर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यास, महिलांना घरातून पटकन परवानगी मिळत असे. महिलांच्या कार्यक्रमात मंगळागौरीमध्ये खेळले जात तसे विविध खेळ, बैठे खेळ, नवऱ्याचे नाव घेणे, गाणी म्हणणे असे कार्यक्रम होत असत. खास आवळी भोजनासासाठी रचलेली गीतेही म्हटली जात असत. नंतर सहभोजन केले जात असे. पण महिला आणि पुरुष यांचा एकत्रित कार्यक्रम मात्र होत नसे. त्या काळातील धार्मिक पार्श्वभूमी लाभलेली ही एक छोटीशी ‘ वुमन स्पेशियल ‘ किंवा ‘ माय फेअर लेडी ‘ टूरच म्हणायची !

खरेतर आवळ्याच्या झाडाखाली फारशी सावली मिळत नाही. तरीही या झाडाखाली भोजनाचा कार्यक्रम करण्यामागे आरोग्यासंबंधित पार्श्वभूमी आहे. पित्त होणे, दृष्टी सुधारणे, कांती निरोगी राहणे, केस गळणे – पिकणे याला प्रतिबंध, हृदयक्रिया नीट ठेवणे, कोलेस्टेरॉल नियंत्रण, मधुमेह नियंत्रण, इन्फेकशन प्रतिबंध अशा अनेक गोष्टींसाठी आवळा हा अत्यंत गुणकारी, सहज उपलब्ध आणि स्वस्त आहे. अशा बहुगुणी आवळ्याचा आणि माणसांचा कायम संबंध राहावा म्हणून हे आवळीभोजन असावे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्तिक अष्टमीनंतरच्या पूर्ण वाढ झालेल्या / पिकलेल्या आवळ्यामध्ये सर्वात जास्त सी व्हिटॅमिनचा ( ascorbic acid ) साठा आढळतो. असे हे आवळे वंध्यत्व दूर करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात असे आयुर्वेद मानतो.  म्हणूनच कार्तिक अष्टमीनंतर आवळीभोजन केले जात असावे.

माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]

Leave a comment