महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,49,560

नाईक बावणे गढी, गिरवली

By Discover Maharashtra Views: 1343 3 Min Read

नाईक बावणे गढी, गिरवली –

बीड जिल्ह्यातील आंबेजोगई तालुक्यातील गिरवली गावात २५० वर्षापूर्वीची नाईक बावणे घराण्याची भव्य गढी उभी आहे. नाईक बावणे हे कर्तबगार घराणे सिंदखेडच्या लखुजीराजे जाधवांच्या काळापासून मराठवाडा मुक्ती संग्रामापर्यंत महाराष्ट्राच्या सेवेत कार्यरत होते. मराठवाड्यातील गिरवली आणि तांदुळजा ही सरदार नाईक बावणेंची इनाम गावे. ही गिरवली गावातील महाकाय गढी इतरांपेक्षा भिन्न रचनेची आहे. गढी म्हणजे हा भक्कम भुईकोटच आहे. युद्धनीतीप्रमाणे याचे बांधकाम आहे. घडीव दगड आणि वीटांचे बांधकाम आहे. बुरूज आणि तटबंदी ५० फूट उंचीची आहे. आतमध्ये चौसपी वाडा आहे. वाड्यात आत विहीर आहे जी साधारण १५० ते २०० फूट खोल आणि पूर्ण बांधलेली आहे. वाड्याबाहेर पण एक विहीर आहे तिथे बकुळीची बाग होती. शीतलदास महाराजांची जिवंत समाधी आहे.

श्री शाहूनृपतीस माहित असे जाणोनि बोलाविले |

सन्मानोनि कृपा करोनी बरवी स्वस्थान ग्रामे दिली | जानोनी मग ताततात बसले सा बांब मध्यंतरी |

तद्वशी निज जन्म होऊनि नसे साफल्य केले तरी ||

श्री  शाहूछत्रपतींकडे आल्यावर जानोजीराव इनामाच्या मध्यंतरी येऊन राहिले, म्हणजे वैजनाथ परळी-(ज्योतिर्लिंग) व अंबाजोगाई (अंब) यांच्या मधली ठिकाणे म्हणजे गिरवली व तांदुळजा ही दोन गावे नाईकराव बावणे यांना शाहूमहाराजांकडून इनाम मिळाली. या दोन गावी त्यांनी गढ्या बांधल्या. तेथून ते आपल्या देशमुखीचा कारभार पाहू लागले. मोगलांकडून त्यांच्याकडे पांगरी, पीर पिंपळगाव, मांग देऊळगाव, देवडी देऊळगाव व भाईखेड ही जालना परगण्यातील गावे आली. पांगरी गाव ‘बावणे पांगरी’ या नावाने आजही ओळखले जाते.मालोजी नाइकबावने यांचे भगवंतराव, व्यंकटराव व जगज्जीवनराव हे तीन पुत्र. हे तिघेही मराठ्यांच्या घोडदळाचे सरदार होते. व्यंकटराव बावने हे विशेष कर्तबगार पुरुष होते. ते तलवार बहादूर होतेच, पण लेखणीबहाद्दूरपण होते. त्यांनी मराठी-हिंदीत काव्ये लिहिली. ते फारशी भाषेचे चांगले जाणकार होते.

मालोजी बावने यांनी फारसी काव्यांचा संग्रह केला होता. ‘शाकीहोत्र’ म्हणजे  पशुशास्त्र जाणकार-पशुवैद्य  याच्याप्रमाणे मालोजीरावांनी घोड्यांच्या जाती, रोगोपचार इ. वर काव्यग्रंथ लिहिले. व्यंकटराव बावने यांचे एक चित्र उपलब्ध आहे. यात ते अश्वारूढ झालेले व त्यांच्याजवळ त्यांचे रक्षक आहेत. काही सनदा उपलब्ध आहेत त्यापैकी  १) इ.स. १८४९ मधील इनामकमिशनकडे दिलेली नक्कल. २) दुसरी सनद मधील असून दोन्ही सनदा थोरले माधवराव पेशव्यांच्या

शिक्क्याच्या आहेत. पहिल्या सनदेतून जालना परगण्यातील १) पांगरी, २) मांग देऊळगाव,३) भाईखेड, ४) देवडी देऊळगाव, ५) पीर पिंपळगाव ही गावे मालोजी नाईकबावने यांच्या इनामाची आहेत.

असे हे इतिहासबद्ध नाईक बावणे घराणे त्यांच्या नावाला साजेसे असे त्यांचे आताचे वंशज. गिरवलीचे माणिकराव नाईक बावणे यांनी खूप सुंदर माहिती सांगितली आणि मार्गदर्शन केले. तांदुळजाचे बाबासाहेब नाईक बावणे यांनीही सर्व माहिती देवून अनेक अशा गोष्टी दाखविल्या ज्या आपण कधीही बघू शकत नाही आणि अनुभवू शकत. अशी मनाची श्रीमंती असलेल्या नाईक बावणे घराण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळाला.

टीम – पुढची मोहीम

Leave a comment